सध्या अंधश्रद्धा, श्रद्धा आणि विज्ञान हे तिन्ही विषय फार चर्चेला आलेले आहेत .अंधश्रद्धा निर्मूलन समितीचे मोठे कार्यकर्ते शाम मानव यांनी एका महाराजाला जादू -चमत्कार करण्यासाठी खुले आव्हान दिले आणि देशभर एकच मोठी चर्चा उभय पक्षांकडून सुरू झाली. श्रद्धा, उपासना आणि पूजा ज्याचे पूर्ण स्वातंत्र्य भारतीय संविधान सर्व नागरिकांना देते. श्रद्धा ही अंधश्रद्धा मध्ये परिवर्तित होऊन अघोरी कृत्य किंवा कायद्याच्या विरुद्ध असणारी बाब कुणाच्याही हातून घडू नये, ही अपेक्षा देशातील सर्व नागरिकांकडून सरकार करीत असतो. नागरिक सुज्ञ आणि सुशिक्षित व्हावेत आणि वागताना व्यवहार करताना तात्विक ज्ञान त्यांनी वापरावे ,ही अपेक्षा देशातील सर्व नागरिकांकडून सरकार करीत असते. देशात साडेसहा हजार एवढ्या मोठ्या संख्येने जाती अस्तित्वात आहे .म्हणजेच जाती व्यवस्था फार मोठी आहे .
प्रत्येक जातीचे कुलदैवत आणि उपासना वेगवेगळी असते .धार्मिक चालीरीती परंपरा वेगळ्या वेगळ्या असल्यामुळे सर्व स्वरूपाच्या श्रद्धांना एकाच भिंगातून बघता येऊ शकत नाही .बळी प्रथा, सती प्रथा ,डायन प्रथा या सारख्या वाईट प्रथा धार्मिक परंपरेच्या नुसार पूर्वी मान्य होत्या .आता या धार्मिक परंपरेचे कोणी समर्थन करू शकतो काय ?.या वाईट धार्मिक तथाकथित परंपरांना कोणी योग्य आहे, असं म्हणू शकतो काय ?.जर कोणी म्हणत असेल तर तो भारतीय कायद्याचे उल्लंघन तर करतच आहे . त्यास तर मानव म्हणून घेण्याचा सुद्धा अधिकार नाही. अशाच अनेक गोष्टी आहेत ,की ज्या कायद्याच्या मर्यादेच्या बाहेर आहे, पण त्या प्रथा आणि परंपरा यांचं नाव घेऊन पुढे चालविण्याचा पूर्ण प्रयत्न तथाकथित लोकांकडून केल्या जातो.
अज्ञान आणि शिक्षणाचा अभाव यातून या गोष्टी घडत असतील तर आपण एखाद्या वेळी समजू शकतो, परंतु सुशिक्षित लोक जर अंधश्रद्धेच्या पाठीमागे लागत असतील तर ही बाब देशाच्या विज्ञान मनाला काळीमा फासणारी आहे. भारतीय समाज श्रद्धावान किंवा आध्यात्मिक प्रवृत्तीचा असणे गैर नाही ,उलट मनोशांतीसाठी ,ते गरजेचे सुद्धा आहे .सोबतच भारतीय समाज विज्ञानवादी असावा असा आग्रह धरणे हे मानवाला अधिक प्रगतीच्या दिशेने नेण्याचे कार्य आहे .महाराष्ट्रातील संत परंपरा वेगवेगळ्या स्वरूपाने आध्यात्मिक दृष्टीने मानवाला अधिक समृद्ध करतात यात वाद नाही. बुवाबाजी ,जादूटोणा ,अघोरी कृत्य, नर बळी,पशु बळी ,प्रेत बाधा, लागन जारण ,तांत्रिक मांत्रिक ,इत्यादी सारख्या गोष्टींचे समर्थन खरंच आजच्या युगात करता येऊ शकते काय ? शिक्षण आणि संशोधन ज्या उंचावर आज आहे आणि तरी अंधश्रद्धा पाडली जात असेल तर, आपण मानवी विकास सुचकांकमध्ये मागे पडलो जात आहोत ,असे म्हणता येईल.
[डॉ. हर्षवर्धन कांबळे]
हनुमान नगर, नागपूर.
९८२२५९३७५७