भरकटू न देता त्या त्या विषयातील सखोल माहिती आटोपशीर शब्दात देण्यारं पुस्तक

0
जत तालुक्यातील मुक्त पत्रकार आणि शिक्षक श्री मच्छिंद्र ऐनापुरे यांचे ‘विचारांच्या प्रदेशात’ हे दहावे पुस्तक प्रकाशनाच्या वाटेवर आहे. महाराष्ट्रातील विविध वृत्तपत्रांमध्ये प्रसंगानुरूप लेखन करण्याचा त्यांचा छंद ग्रंथरूप होऊन वाचकांच्यापर्यंत पोहोचतोय याचा आनंद आहे. सर्वसामान्य, तळागाळातील विद्यार्थ्यांपासून शिक्षक, पत्रकार, स्पर्धा परीक्षांचे विद्यार्थी, वक्तृत्व आणि निबंध स्पर्धांचे स्पर्धक, ख्यातकीर्त वक्ते, राजकीय नेते, प्रशासकीय अधिकारी अशा विविध स्तरातील आणि घटकातील लोक ऐनापुरे सरांच्या माहितीचा वापर आपली कामगिरी चांगली घडावी यासाठी करत आहेत यातच त्यांचे यश सामावलेले आहे.

 

तरुण भारत, सकाळ, लोकमत, पुढारी, संचार, केसरी, महासत्ता, ललकार, संकेत टाइम्स या आपल्या भागातील वृत्तपत्रांच्या बरोबरच देशोन्नती, लोकशाही वार्ता, गावकरी या दूरच्या प्रदेशांबरोबरच लोकसत्ता, सामना या राज्यस्तरीय प्रमुख वृत्तपत्रांमध्ये त्यांचे लेख सातत्याने प्रसिद्ध होत असतात. ते लेख आवडल्याची वाचकांची पत्रे हे वृत्तपत्रातून अधून मधून वाचायला मिळतात. ऐनापुरे सर हे पत्रकार आणि शिक्षक अशी आपली दुहेरी भूमिका बजावत असल्याने त्यांना समाजाला नेमके काय हवे आहे याची चांगली जाण आहे. त्यामुळेच केवळ वृत्तपत्रांमध्ये लिहून आपल्या इच्छित वर्गापर्यंत पोहोचता येणार नाही याची त्यांना जाणीव आहे. त्यामुळेच छावा, छोट्यांचा छोटू, किशोर, मुलांचे मासिक,मार्मिक या नियतकालिकांमधून त्यांच्या बालकथा, शेती, सिनेमा, शिक्षण सामाजिक विषयावरील लेखन प्रकाशित होत असते. सुमारे दशक भरापूर्वी त्यांनी स्वतःचा ब्लॉग लिहिण्यास सुरुवात केली आणि आपले क्षेत्र अधिक व्यापक केले.
‘विचारांच्या प्रदेशात’ पूर्वी प्रकाशित झालेले त्यांचे नवे प्रकाशन ‘सामान्यातील असामान्य’ हे मला विशेष भावलेले पुस्तक आहे. या पुस्तकातून त्यांनी ज्या व्यक्तिरेखांची ओळख करून दिली ते जितके महत्त्वाचे कार्य करतात तेवढेच महत्त्वाचे कार्य मच्छिंद्र ऐनापुरे सर आपल्या लेखनातून करत आले आहेत. ‘विचारांच्या प्रदेशात’ या ग्रंथाची प्रेस कॉपी वाचताना माझ्या लक्षात आले की ऐनापुरे सरांनी अनेक महत्त्वाच्या विषयांना हात घातला आहे. पत्रकार म्हणून अशा वैविध्यपूर्ण विषयावर लेखन आणि चिंतन करण्याची गरज प्रत्येक पत्रकाराला भासत असते. वेगवेगळ्या क्षेत्रातील वाचकाला आपल्या मनातील विचार वृत्तपत्राच्या पानात शोधायचे असतात किंवा आपल्याला पडलेल्या प्रश्नांची उत्तरे तो वृत्तपत्रातील विविध स्तंभातून शोधत असतो. गोंधळलेल्या स्थितीतील समाजाला योग्य वेळी योग्य विचार आणि माहिती पोहोचवणे, त्यांची भूमिका स्पष्ट होण्यासाठी सहाय्यक ठरणे वृत्तपत्राचे काम असते.
या कार्याद्वारे पत्रकार लोकशिक्षकाची भूमिका पार पाडत असतो. मच्छिंद्र ऐनापुरे हे या व्याख्येत बसणारे लोकशिक्षक आहेत. त्यांच्या लेखनातून समाजाविषयी तळमळ आणि लोकजागृतीची प्रेरणा नेहमीच दिसून आलेली आहे. आजच्या समाजासमोर असलेल्या अनेक प्रश्नांचा वापर त्यांनी ‘विचारांच्या प्रदेशात’ मध्ये केलेला आहे. जीवन जगण्याचा मार्ग, हिरोशिमाच्या इतिहासातील काळा दिवस, विभक्त कुटुंब संस्कृतीच्या निमित्ताने, डिजिटल अर्थव्यवस्था आणि पायाभूत सुविधा, महिलांवर होणारे सोशल मीडियावरील आभासी अत्याचार, गुन्हेगारीचा फास आपल्याला कुठे नेणार, विज्ञान क्षेत्रात भारत मागे का, दुरावत चाललेली नाती आणि बाजारीकरण, यापुढील काळात रोबोट जगात धुमाकूळ घालणार, भ्रष्टाचारात भारताचा संपूर्ण आशियामध्ये डंका, शैक्षणिक तंत्रज्ञान क्षेत्रात ग्रामीण भाग मागेच, लैंगिक असमानतेचे समांतर प्रश्न, यापुढे बसणार वारंवार चक्रीवादळाचा तडाखा, प्रदूषणामुळे भारतीयांच्या आयुष्यात घट हे यातील लेख मला विशेष करून आवडले. सध्याचे युग हे माहितीचे युग आहे असे म्हटले जाते आणि इंटरनेटवर माहितीचा कचरा प्रचंड प्रमाणात उपलब्ध आहे. एखाद्या विषयावर इंटरनेटवर माहिती घ्यायची ठरवले तर ती माहिती घेता घेता भलत्याच ठिकाणी जाऊन वाचक गुरफटून पडतो.

 

Rate Card
आपल्याला नेमकी माहिती काय हवी होती हेच आणि आपण काय शोधत आहोत आपला वेळ किती वाया गेला? याचा विचार करून अनेकांना पश्चातापाची वेळ येते. त्यामुळे या माहितीच्या महाजालाचे जंजाळात रूपांतर होण्यापूर्वी सुयोग्य माहिती मिळवायचे असेल तर ऐनापुरे यांच्यासारख्या व्यक्तींनी जमा केलेली माहिती आपल्या कार्यासाठी उपयोगात आणणे आवश्यक ठरते. वाचकाला कोठेही न भरकटू देता त्या त्या विषयातील सखोल माहिती आणि आटोपशीर शब्दात देण्याचे काम ऐनापुरे सरांचे लेख करतात. एखादा विषय समजून सांगायचं असेल तर फार पल्हाळीक लिहिण्यापेक्षा परिपूर्ण माहिती सुयोग्य शब्दात जर उपलब्ध झाली तर वाचकांचा केवळ वेळच वाचतो असे नव्हे तर तो विषय समजावून घेणे आणि लक्षात ठेवणे त्यांच्यासाठी सोपे जाते. त्यामुळेच ‘विचारांच्या प्रदेशात’ कोठेही वाचकाला भरकटू न देता त्याला पोहोचायच्या ठिकाणी ऐनापुरे सर व्यवस्थित पोहोचवतात, याची अनुभूती वाचकांना आल्याशिवाय राहत नाही. या ग्रंथाचे कौतुक करतानाच आता ऐनापुरे यांच्याबाबतीत समाजाच्या आणि माझ्यासारख्या माहिती संकलित करून ठेवणाऱ्या एका पत्रकाराच्या अपेक्षा वाढलेल्या आहेत. आतापर्यंत सरांनी संकीर्ण स्वरूपात विपुल लेखन केलेले आहे.
त्यांचे जवळपास 2000 हून अधिक लेख इंटरनेटवर उपलब्ध आहेत. मात्र आता अशा संकीर्ण कार्यातून सरांनी स्वतःला बाजूला केले पाहिजे. यापेक्षा व्यापक क्षेत्र त्यांची वाट पाहत आहे. एखाद्या विषयावर पुरेपूर माहिती देणारे आणि त्या विषयाचे सखोल ज्ञान उपलब्ध करून देणारे पुस्तक त्यांच्याकडून या पुढच्या काळात अपेक्षित आहे. सांगली जिल्ह्यातील अनेक शिक्षकांनी आपल्या व्यासंगातून अशा पद्धतीचे ग्रंथ मराठी सारस्वताला दिले आहेत. ती काळाची गरज आहे. वृत्तपत्रीय लिखाणाला एक मर्यादा असते त्या मर्यादांना पार करून कधी ना कधी समाजाची खरी गरज लक्षात घेऊन परिपूर्ण माहिती देणारे ग्रंथ वाचकांपर्यंत पोहोचण्याची आवश्यकता आहे. तळागाळात काम करणाऱ्या शिक्षकांना, पत्रकारांना राष्ट्रीय आंतरराष्ट्रीय आणि स्थानिक अशा सर्वच प्रश्नांचे प्रत्यक्ष जनमानसावर काय परिणाम होत असतात याची जितकी माहिती असते तेवढी माहिती आकडेवारी आणि दुसऱ्याचा अनुभव ऐकून आपले मत ठरवणाऱ्या व्यक्तींकडे नसते. त्यामुळे मोठ्या मोठ्या व्यक्तींच्या विचारांना आणि ते सुचवत असलेल्या उपायांनाही मर्यादा पडतात.

 

एखाद्या योजनेतील फोलपणा त्याच्या अंमलबजावणीतील त्रुटी किंवा समाजातील एखाद्या प्रथेची मूळ कारणे ती न हटण्यामागची सामाजिक स्थिती आणि प्रत्यक्ष कार्य करताना कोणत्या प्रकारची काळजी घेतली पाहिजे याबाबतचे ज्ञान जितके ‘ग्रास रूट’वर काम करणाऱ्या व्यक्तीला असते तितके समाजातील धुरिणांना सुद्धा असणे मुश्किल अर्थात त्याला काही मान्यवर अपवाद आहेतच. मात्र तरीही आपल्या ज्ञान आणि अनुभवाचा लाभ ऐनापुरे सरांच्या सारख्या विचारी व्यक्तिमत्त्वांनी समाजाला करून द्यायचा असेल तर एखाद्या विषयाला समोर ठेवून एक ग्रंथ अशा पद्धतीचे कार्य त्यांनी यापुढे करावे. त्यांना वाचक मान्यता तर मिळालेली आहेच, समाजातील वेगवेगळ्या क्षेत्रातील वर्ग त्यांच्या विचारांकडे आस्थेने आणि उत्सुकतेने लक्ष देत असतो याचा विचार करून पुढचा ग्रंथ विचारांच्या प्रदेशाच्या पलीकडे अजून भरभरून देणारा होवो याच शुभेच्छा!

Leave A Reply

Your email address will not be published.

कॉपी करू नका.