जयसिंगपूर: घोडावत विद्यापीठाच्या वतीने संजय घोडावत यांच्या वाढदिनी दिल्या जाणाऱ्या ‘एसजीयु आयकॉन 2023’ पुरस्कारांची घोषणा करण्यात आली. यावर्षी पत्रकारितेसाठी पद्मश्री प्रतापसिंह जाधव, कृषी क्षेत्रासाठी डॉ. बुधाजीराव मुळीक,शैक्षणिक क्षेत्रातील भरीव कामगिरीबद्दल डॉ.मंगेश कराड,क्रीडा क्षेत्रासाठी क्रिकेटपटू स्मृती मानधना, वैद्यकीय क्षेत्रातील कामगिरीसाठी डॉ. संतोष प्रभू यांना पुरस्कार जाहीर झाले आहेत.
विद्यापीठाचे संस्थापक, चेअरमन संजय घोडावत यांचा 58 वा वाढदिवस 28 फेब्रुवारी रोजी सकाळी साडेदहा वाजता घोडावत विद्यापीठात साजरा करण्यात येणार आहे. यावेळी हे पुरस्कार मान्यवरांना प्रदान करण्यात येतील अशी माहिती विश्वस्त विनायक भोसले यांनी दिली.
एस.जी.यू आयकॉन हा पुरस्कार दरवर्षी कला,क्रीडा,साहित्य,संस्कृती, कृषी, उद्योग, वैद्यकीय क्षेत्रात अतुलनीय कामगिरी करणाऱ्या नेतृत्वाला देण्यात येतो.
पद्मश्री प्रतापसिंह जाधव यांनी दैनिक पुढारीचे संपादक म्हणून पत्रकारितेद्वारे निर्भीड, निपक्षपातीपणाने केलेल्या लोकसेवेसाठी तर ज्येष्ठ कृषी तज्ञ व भूमाता चॅरिटेबल ट्रस्ट चे संस्थापक डॉ. बुधाजीराव मुळीक यांनी गेली 50 वर्ष शेती, पर्यावरण,राजकारण आणि समाजकारण या क्षेत्रात दिलेल्या योगदानाबद्दल तसेच शैक्षणिक क्षेत्रात भरीव कामगिरी करणारे, ज्ञानदानासाठी झटणारे एमआयटी विद्यापीठाचे कुलगुरू डॉ.मंगेश कराड व सांगलीची महिला क्रिकेटपटू स्मृती मानधना हिने आंतरराष्ट्रीय क्रिकेट विश्वामध्ये फलंदाजी द्वारे केलेल्या अतुलनीय कामगिरीबद्दल तर कोल्हापूर येथील डॉ .संतोष प्रभू यांना वैद्यकीय क्षेत्रात केलेल्या मानवसेवे बद्दल हा पुरस्कार प्रदान करण्यात येणार आहे.
याबद्दल संजय घोडावत, कुलगुरू डॉ.अरुण पाटील कुलसचिव डॉ.विवेक कायंदे, पॉलिटेक्निक चे प्राचार्य विराट गिरी यांनी सर्वांचे अभिनंदन केले आहे.