सांगोला,संकेत टाइम्स : भरधाव कार थेट किराणा दुकानाची भिंत फोडून आत घुसल्याने दुकानासमोर थांबलेल्या चौघा प्रवाशांना धडक दिली.त्यात आजी व नातूचा जागीच मृत्यू झाला आहे.तर पती-पत्नीसह तिघेजण जखमी झाल्याची घटना घडली आहे.सुदैवाने दुकान मालक बाहेर असल्यामुळे थोडक्यात बचावला.
रविवारी सायंकाळच्या सुमारास चिकमहुद- दिघंची रोडवरील शेरेवाडी कटफळ (ता सांगोला) येथे हा भिषण अपघात घडला. द्रोपदी शिवाजी आटपाडकर (वय ५०)व सिद्धेश्वर नामदेव काळेल (वय ७,रा. कटफळ आटपाडकर वस्ती) असे मृतू झालेल्या आजी व नातवाचे नाव आहे. नामदेव सदाशिव काळेल (वय ३५) व रुक्मिणी नामदेव काळेल (वय ३०,दोघेही रा.कटफळ, आटपाडकर वस्ती ता. सांगोला ) तसेच पिकअप चालक विष्णू बळीराम मेंगाने- जाधव (रा. शिंगोर्णी ता. माळशिरस) असे तिघे जखमी झाले आहेत.
दरम्यान स्थानिक नागरिकांनी तात्काळ जखमींना उपचाराकरता दिघंची (ता.आटपाडी) येथील खाजगी रुग्णालयात दाखल केले. अपघाताची माहिती मिळतात सहाय्यक पोलीस निरीक्षक रवी राजुलवार, पोलीस हेडकॉन्स्टेबल बापूसाहेब जवळ, विकास क्षीरसागर, पोलीस नाईक कुंभार पोलीस पाटील प्रभाकर कांबळे यांनी घटनास्थळी धाव घेऊन मृत व जखमींना पुढील उपचारासाठी सोलापूर येथे पाठवण्यासाठी मदत केली.