धक्कादायक | मांत्रिकाच्या अमानुष मारहाणीत इरळीतील मुलाचा मृत्यू
सांगली : कवठेमहांकाळ तालुक्यातून एक धक्कादायक बातमी समोर आली असून मांत्रिकांकडून मारहाण करण्यात आल्याने १४ वर्षीय शाळकरी मुलांचा त्यात मृत्यू झाला आहे.इरळीतील आर्यन दीपक लांडगे असे मृत्यू झालेल्या शाळकरी मुलाचे नाव आहे.
कर्नाटकातील मांत्रिकाने या शाळकरी मुलाला मारहाण केली होती,गंभीर जखमी झालेल्या आर्यनवर मिरजेत शासकीय रुग्णालयात उपचार सुरु होते, मात्र उपचार सुरू असताना शनिवारी दि.२० रोजी त्याचा मृत्यू झाला आहे.
नातेवाईकांकडून सांगण्यात आलेली माहिती अशी की, आर्यनला बऱ्याच दिवसांपासून ताप येत होता. तो बरा व्हावा यासाठी एका नातेवाईक महिलेच्या सांगणेयावरून तिला तो बरा होईल या उद्देशाने कर्नाटकातील एका मांत्रिकाकडे नेण्यात आले. तो या महिलेचा वडील होता. कुडचीजवळ शिरगूर येथे तो राहतो. आर्यनला बाहेरची बाधा झाल्याचे मांत्रिकाने सांगितले. अंगात शिरलेले कथित भूत बाहेर काढण्यासाठी मांत्रिकाने आर्यनला बेदम मारहाण केली.यात त्या गंभीर दुखापत झाली.

त्याच अवस्थेत त्याला मिरजेत शासकीय रुग्णालयात दाखल केले होते.मात्र त्यांचा मृत्यू झाल्याने खळबळ उडाली आहे.यासंबधीची माहिती मिळताच अंनिसचे कार्यकर्ते फारुक गवंडी, सचिन करगणे, दिगंबर कांबळे, भगवान सोनंद यांनी आर्यनच्या कुटुंबियांची भेट घेतली. त्यांना आधार दिला. मांत्रिकावर गुन्हा दाखल करण्यासाठी राजी केले.
सोमवारी कवठेमहांकाळ पोलीस ठाण्याचे सहायक निरीक्षक जितेंद्र शहाणे यांची कार्यकर्त्यांनी भेट घेत निवेदन दिले. त्यानुसार आर्यनच्या आईची फिर्याद पोलीसांनी नोंदवून घेण्याची प्रक्रिया सुरु केली आहे, असे अनिसच्या कार्यकर्त्यांनी सांगितले.हा गुन्हा कुडची पोलिस ठाण्याकडे वर्ग केला जाणार असल्याचे कवठेमहांकाळ पोलिसांनी सांगितले. नागरिकांनी भोंदू मांत्रिकांपासून सावध रहावे असे आवाहन अंनिसचे कार्यकर्त्यांनी नागरिकांना केले आहे.