देशात मोदी नावाची त्सुनामी | केशव प्रसाद मौर्य : 2024 ची निवडणूक देशाला 100 वर्षे पुढे घेऊन जाईल

0

तासगाव : 2014 नंतर देशाचा खऱ्या अर्थाने विकास सुरू झाला. आज जगातल्या प्रमुख देशांमध्ये भारताची गिनती होत आहे. 2024 ची लोकसभा निवडणूक ही देशाला शंभर वर्षे पुढे घेऊन जाईल, असा विश्वास व्यक्त करतानाच देशात मोदी नावाची त्सुनामी आली आहे, असे प्रतिपादन उत्तर प्रदेशचे उपमुख्यमंत्री केशव प्रसाद मौर्य यांनी केले


मोदी सरकारला नऊ वर्ष पूर्ण झाल्याच्या निमित्ताने आयोजित ‘मोदी @9’ या कार्यक्रमाच्या निमित्ताने तासगाव येथील साने गुरुजी नाट्यगृहात आयोजित कार्यक्रमात मौर्य बोलत होते. यावेळी खासदार संजय पाटील, भाजपचे जिल्हाध्यक्ष पृथ्वीराज देशमुख, तासगाव कवठेमंकाळ मतदार संघाचे निवडणुकीचे प्रमुख युवा नेते प्रभाकर पाटील यांच्यासह मान्यवर उपस्थित होते.

 

यावेळी मौर्य म्हणाले, मोदींच्या नेतृत्वाखाली जगभरात भारत देशाचा डंका वाजतो आहे. आपण सर्वांनी बघितलं की रशिया आणि युक्रेंच्या युद्धाच्या दरम्यान केवळ मोदींच्या सांगण्यावरून दोन्ही देशांनी युद्धबंदी केली. ज्यामुळे हातात तिरंगा घेऊन सर्व भारतीय सुखरूप पणे देशात परत आले. हा मोदी नावाचा चमत्कार आहे.

 

सांगली जिल्ह्यामध्ये खासदार संजय पाटील यांच्या माध्यमातून हजारो कोटी रुपयांची विकास कामे झाली आहेत. त्यामध्ये शेतीच्या पाण्याचा प्रश्न सोडवण्यात आला आहे. गरिबांना पक्के घरे देण्यात आले आहेत. प्रत्येकाला पाणी मिळावे, यासाठी देशभरात जल जीवन मिशन या योजनेद्वारे पाईपलाईनने पाणीपुरवठा केला जात आहे. हा केवळ विकासाचा ट्रेलर आहे. यानंतर पुन्हा मोदी सरकार आल्यानंतर विकासाचा खरा पिक्चर आपणा सर्वांना पाहायला मिळेल, असे केशव प्रसाद मौर्य म्हणाले.

ते म्हणाले, मी प्रथम राष्ट्रीय स्वयंसेवक संघाचा स्वयंसेवक आहे. या देशाचा नागरिक आहे. नंतर मी मंत्री, उपमुख्यमंत्री आहे. त्यामुळे आपल्यातून फिरताना वावरताना मी लोकांची मते जाणून घेत असतो. मी दोन दिवस महाराष्ट्रमध्ये आहे. या काळात मला मोदी सरकार आणि स्वतः नरेंद्र मोदी यांच्या बद्दल लोकांच्या मध्ये प्रचंड आकर्षण असल्याचे दिसून आले. देशभर प्रमाणे महाराष्ट्रातही मोदी लाट येणाऱ्या 2024 च्या निवडणुकीत निश्चितपणे दिसून येईल, असा विश्वास त्यांनी व्यक्त केला.

2014 पर्यंत या देशामध्ये निराशेचे वातावरण होते. देशातल्याच नव्हे, तर शेजारील राष्ट्रांच्या समस्यांबाबतही आपणाला अमेरिका, युरोप, चीनकडे पाहावे लागत होते. मात्र आपण मोदी सरकारच्या काळात आत्मनिर्भर झालो आहोत. यापूर्वी देशावरती अतिरेकी दहशतवादी हल्ले झाले तर आपण केवळ निषेध करत होतो. पण, 56 इंच छातीचा नेता असणाऱ्या काळात आपण सर्जिकल स्ट्राइक करून या दहशतवाद्यांना सडेतोड उत्तर दिले आहे.

ते म्हणाले, ‘सत्यमेव जयते’ या उक्तीवर आमचा विश्वास आहे. यापुढील काळातील देशातील कष्टकरी शेतकरी श्रमिक गरिबांचा विकास केवळ मोदीच करू शकतात, असे मौर्य म्हणाले.

Rate Card

खासदार संजय पाटील म्हणाले, गेल्या नऊ वर्षात मोदी सरकारच्या माध्यमातून हजारो कोटी रुपयांचा निधी सांगली जिल्ह्यासाठी मिळाला. जिल्ह्याचा चेहरा मोहरा बदलण्याचा प्रयत्न या निमित्ताने केला. ताकारी म्हैशाळ योजना असेल, इतर योजना असतील या माध्यमातून जिल्ह्यातील शेतीच्या पाण्याचा प्रश्न सोडवला आहे. अजून एक हजार कोटी रुपयांची विस्तारित म्हैशाळ योजना देवेंद्र फडणवीस यांच्या सहकार्याने सुरू केली आहे. पुणे बेंगलोर हायवेच्या माध्यमातून हजारो कोटी रुपये हायवेचे काम सुरू झाले आहे. इथून पुढील काळातील सांगली जिल्ह्यातील नागरिक भाजपच्या बरोबर राहतील, असा विश्वास खासदार पाटील यांनी व्यक्त केला.

तासगाव – कवठेमंकाळ निवडणुकीचे प्रमुख व युवा नेते प्रभाकर पाटील यांनी खासदार संजय पाटील व भारतीय जनता पार्टीच्या माध्यमातून करण्यात आलेल्या विविध विकासकामांचा पाढा वाचला. त्याचबरोबर ज्या पद्धतीने खासदार संजय पाटील यांना साथ दिली त्या पद्धतीने आपल्यालाही या पुढील काळात तालुक्यातील जनतेने आशीर्वाद द्यावेत, असे आवाहन त्यांनी यावेळी केले.

स्वागत व प्रास्ताविक किशोर गायकवाड यांनी केले. आभार माजी नगरसेवक सचिन गुजर यांनी मानले. यावेळी भाजप जिल्हाध्यक्ष पृथ्वीराज देशमुख, भाजपचे तालुकाध्यक्ष सुनील पाटील यांनी मनोगत व्यक्त केले.

 

मोदी हटाओ हाच विरोधकांचा अजेंडा…!

25 जून रोजी बिहारमध्ये काँग्रेससह सर्व विरोधी पक्ष एकत्र येत आहेत. केवळ मोदी हटाओ या एकाच मुद्द्यावर यांचे एकमत आहे. संपूर्ण जगाने मोदींचे नेतृत्व मान्य केलेले असताना, देशातल्या विरोधी पक्षांना केवळ मोदी द्वेशाने पछाडले आहे. देशाच्या विकासाचा कोणताही कार्यक्रम विरोधी पक्षाकडे नाही. जर काँग्रेस परत सत्तेत आली तर 370 कलम परत लागू केले जाईल. मात्र पुढील शंभर वर्ष देशात कमळ फुलेल, असा विश्वास यावेळी मौर्य यांनी व्यक्त केला.

 

राहुल गांधींवर टीकास्त्र…!
यावेळी राहुल गांधी यांच्यावर केशव प्रसाद मौर्य यांनी सडकून टीका केली. ते म्हणाले रामाला कल्पनिक म्हणणारे आता स्वतःला जाणवेधारी ब्राह्मण म्हणत आहेत. केवळ इफ्तार पार्ट्यामध्ये रमणारे देशातल्या मंदिरांसमोर नतमस्तक होत आहेत. ही मोदी नावाची जादू आहे. राहुल गांधी जगात फिरत असताना इंग्लंड अमेरिकेमध्ये जाऊन मोदींच्या वर टीका करतात. देशाची बदनामी करतात. हाच त्यांचा खरा अजेंडा आहे.

Leave A Reply

Your email address will not be published.

कॉपी करू नका.