तासगाव :तासगाव तालुक्यातील कवठे एकंद येथील विद्यार्थिनी, महिलांची छेड काढणाऱ्या टोळक्याला आज दुपारी चांगलाच चोप देण्यात आला. या टोळक्यावर गुन्हा दाखल करण्यासाठी विद्यार्थिनी व महिलांनी पोलीस ठाण्यात गर्दी केली होती. तर टवाळखोरांच्या या टोळीवर कठोर कारवाई व्हावी, या मागणीसाठी उद्या (सोमवार) कवठेएकंद गाव बंद ठेवण्याचा निर्णय ग्रामपंचायत सदस्य चेतन लंगडे यांच्यासह इतरांनी घेतला आहे.
याबाबत माहिती अशी : कवठे एकंद येथील काही टवाळखोरांचे टोळके गावातील महिला व विद्यार्थिनींची सातत्याने छेड काढण्याचा प्रयत्न करत आहे. याबाबत या टोळक्याला वारंवार सूचना देऊनही त्यांच्यामध्ये कोणताही बदल झाला नाही. पालकांनीही या टोळीतील हरामखोरांना सूचना दिल्यानंतरही ही टोळी पालकांना खुन्नस देण्याचा प्रयत्न करीत होती.
गावातील विद्यार्थिनींना मोबाईलवरून मेसेज करणे, त्यांना फोन करून त्रास देणे, असे उद्योग ही टोळी करीत होती. गेल्या काही महिन्यात या टोळीने गावात उच्छाद मांडला आहे. रस्त्यावरून जाणा-येणाऱ्या महिला व विद्यार्थिनींना हे टोळके त्रास देत होते. आठवडा बाजारातही महिला वर्गाला या टोळीचा त्रास होत होता. अनेक प्रयत्न करूनही या टोळीने आपले कारनामे सुरूच ठेवले होते.
दरम्यान आज दुपारी या टोळीचा कारनामा चव्हाट्यावर आला. गावातील नागरिक व महिलांनी एकत्रित येऊन या टोळीतील चार ते पाच जणांना चांगलाच चोप दिला. याबाबत तक्रार करण्यासाठी कवठेएकंदच्या शेकडो नागरिकांनी तासगाव पोलीस ठाण्यात गर्दी केली आहे. दरम्यान गावातील महिला व विद्यार्थिनींना त्रास देणाऱ्या टोळीच्या मुसक्या आवळाव्यात, त्यांच्यावर कडक कारवाई करावी, या मागणीसाठी उद्या (सोमवार) कवठे एकंद गाव बंद ठेवण्यात येणार आहे, अशी माहिती ग्रामपंचायत सदस्य चेतन लंगडे व अन्य सदस्यांनी दिली.