सौरछतासाठी 40 टक्के अनुदान,तुम्ही लाभ घेतला का ?

0

भविष्यातील ऊर्जा सुरक्षिततेच्या दृष्टीने सौरछत हे सुरक्षा छत आहे. विपुल प्रमाणात व सहजपणे सौरऊर्जा उपलब्ध आहे. सौरऊर्जेचा वापर वाढविण्यासाठी केंद्रसरकारकडून घरगुती ग्राहकांसाठी सौरछताकरिता 40 टक्केंपर्यंत अनुदानाची योजना सूरु आहे. महावितरण मार्फत ही योजना राबविली जात आहे. कोल्हापूर व सांगली जिल्ह्यातील 906 घरगुती ग्राहकांनी या अनुदान योजनेचा लाभ घेतला आहे. आपल्या छतावर 3483 किलोवॅट क्षमतेची सौरयंत्रणा बसविली आहे. तर 603 ग्राहकांच्या अर्जावर प्रक्रिया सुरू आहे. तरी इच्छूक घरगुती ग्राहकांनी योजनेचा लाभ घ्यावा, असे आवाहन मुख्य अभियंता मा.श्री.परेश भागवत यांनी केले आहे.

 

कोल्हापूर जिल्ह्यातील 613 (2450 किलोवॅट) तर सांगली जिल्ह्यातील 293 (1033 किलोवॅट) घरगुती ग्राहकांनी या अनुदान योजनेचा लाभ घेऊन सौरछत यंत्रणा बसविली आहे. कोल्हापूर जिल्ह्यातील 381 (1293 किलोवॅट) तर सांगली जिल्ह्यातील 222 (644 किलोवॅट) घरगूती ग्राहकांच्या अर्जावर प्रक्रिया सुरू आहे. केंद्रीय नवीन व नवीकरणीय ऊर्जा विभागाच्या योजनेतून घरगुती ग्राहकांना 1 ते 3 किलोवॅटपर्यंत सौर छत संचास 40 टक्के तर पुढील 3 पेक्षा अधिक ते 10 किलोवॅटपर्यंत 20 टक्के अनुदान आहे. सामुहिक वापरासाठी 500 किलोवॅटपर्यंत मात्र प्रत्येक घरासाठी 10 किलोवॅटमर्यादेत समूह गृहनिर्माण संस्था व निवासी कल्याणकारी संघटना ग्राहकांना 20 टक्के अनुदान आहे. सौरछत संच अनुदानासाठी प्रति किलोवॅटप्रमाणे संचाचे मुलभूत दर पुढीलप्रमाणे निश्चित केले आहेत. 1 ते 3 किलोवॅटकरीता रू.41400/-, 3 पेक्षा अधिक ते 10 किलोवॅटकरीता रू.39600/-, 10 ते 100 किलोवॅट करीता रू.37000/- तर 100 ते 500 किलोवॅटकरीता रू.35886/- असे दर आहेत. या योजनेची संपूर्ण माहिती व ‘ऑनलाईन’ अर्जाची सोय, मार्गदर्शक तत्वे, एजन्सी निवडसुची, शंका-समाधान इ. माहिती महावितरणच्या अधिकृत संकेतस्थळावरील https://www.mahadiscom.in/ismart/ या लिंकवर उपलब्ध आहे.

१ किलोवॅट क्षमतेची सोलर रुफ टॉप यंत्रणा बसविण्यासाठी साधारणपणे १०८ स्क्वेअर फूट, जिथे सावली पडत नाही, अशी जागा उपलब्ध असणे आवश्यक आहे. १ किलोवॅट क्षमतेच्या सोलर रुफ टॉप यंत्रणेचे वजन जवळपास 150 किलो असते.  १ किलोवॅट क्षमतेच्या सोलर रुफ टॉपमधून वार्षिक सरासरीनुसार महिन्याला १२० युनिट वीज निर्मिती होते. सौर पॅनलची कार्यक्षमता व सौर किरणांची उपलब्धता, भौगोलिक स्थान या घटकांचा प्रभाव एकंदरीत वीजनिर्मितीवर पडतो. स्थानिक बाजार मूल्यानुसार १ किलोवॅट क्षमतेच्या सोलर रुफ टॉप यंत्रणेसाठी ५० ते ५५ हजार रुपये दरम्यान खर्च येतो. सोलर पॅनलचा दर्जा, उपलब्ध जागा या घटकांचा दरावर परिणाम होतो.  किलोवॅट क्षमता वाढल्यास खर्च कमी होत जातो. मासिक वीज बिलात बचत होऊन साधारणपणे सोलर रुफ टॉपसाठी गुंतविलेल्या रक्कमेची ४ ते ५ वर्षात परतफेड मिळते. पॅनलची स्वच्छता राखणे, नियमित देखभाल दुरुस्ती मुळे सौरपॅनलची कार्यक्षमता व आर्युमान वाढते.

 

सौरछताव्दारे एप्रिल महिन्यात 2 कोटी 44 लक्ष युनिटची उच्चांकी वीजनिर्मिती

Rate Card

कोल्हापूर व सांगली जिल्ह्यात विविध वर्गवारीतील 5 हजार 126 वीजग्राहकांनी अनुदानीत व विनाअनुदानित तत्वावर आपल्या  छतावर 85 हजार किलोवॅट क्षमतेची सौर यंत्रणा बसविली आहे.  या ग्राहकांनी सौरछताव्दारे गत एप्रिल महिन्यात 2 कोटी 44 लक्ष युनिट वीज निर्मिती केली. मे महिन्यात  1 कोटी 70 लक्ष युनिट तर जून महिन्यात 1 कोटी 15 लक्ष युनिट वीज निर्मिती केली. कोल्हापूर जिल्ह्यातील घरगुती वर्गवारीत 2151, वाणिजिक्य 674, औद्योगिक 273, सार्वजनिकसेवा 188 व अन्य 5 अशा एकूण 3 हजार 291  वीजग्राहकांनी 57 हजार 113 किलोवॅट क्षमतेची सौर छत यंत्रणा बसविली आहे. त्यात उच्चदाब वर्गवारीतील 94 वीजग्राहकांची 28 हजार 584 किलोवॅट क्षमता आहे. कोल्हापूर जिल्ह्यातील सौरछत ग्राहकांनी गत एप्रिल महिन्यात 2 कोटी 8 लक्ष युनिट, मे महिन्यात 1 कोटी 32 लक्ष युनिट तर जून महिन्यात 81 लक्ष 45 हजार युनिट वीजनिर्मिती केली.

सांगली जिल्ह्यातील घरगुती वर्गवारीत 1102, वाणिजिक्य 338, औद्योगिक 129, सार्वजनिक सेवा 254 व अन्य 12 अशा एकूण 1 हजार 835 वीजग्राहकांनी 28 हजार 85 किलोवॅटक्षमतेची सौरछत यंत्रणा बसविली आहे. त्यात उच्चदाब वर्गवारीतील 50 वीजग्राहकांची 14 हजार 49 किलो वॅट क्षमता आहे. सांगली जिल्ह्यातील सौरछत ग्राहकांनी गत एप्रिल महिन्यात 36 लक्ष  38 हजार युनिट, मे महिन्यात 38 लक्ष 11 हजार युनिट तर जून महिन्यात 33 लक्ष 60 हजार युनिट वीज निर्मिती केली.

Leave A Reply

Your email address will not be published.

कॉपी करू नका.