वाहतूक नियम मोडणाऱ्या 35 बसेसवर दंडात्मक कारवाई        

0
सांगली : खाजगी बसेसच्या चालक व मालक यांनी वाहतूकीच्या सर्व नियमांचे काटेकोरपणे पालन करावे व आपल्या बसेस तांत्रिक दृष्ट्या सक्षम असल्याची खात्री करूनच प्रवासी वाहतूक करावी, असे आवाहन सहायक प्रादेशिक परिवहन अधिकारी पी. व्ही. साळी यांनी केले आहे.
गेल्या काही दिवसापूर्वी समृध्दी महामार्गावर झालेल्या बसच्या अपघातानंतर खबरदारी म्हणून उप प्रादेशिक परिवहन कार्यालय, सांगलीच्या वायुवेग पथकांकडून खाजगी ट्रॅव्हल्स बसेसची कसून तपासणी केली जात असून चालक-मालक व प्रवाशी यांना मार्गदर्शन व प्रबोधन केले जात आहे. दोषी असणाऱ्या बसेसवर दंडात्मक कारवाई केली जात आहे. प्रबोधन करत असताना वाहन चालकास लेन कटींग बदलचे नियम, प्रवासी वाहतूक दरम्यान कोणत्याही चुकीच्या ठिकाणी वाहन पार्किंग न करणे, प्रवासी वाहतूकी दरम्यान मद्यप्राशन न करणे, आग विझवणारी उपकरणे व प्रथम उपचार पेटी सुस्थितीत ठेवणे, घाट मार्गामध्ये वाहन चालवताना वाहन न्यूट्रल न करणे, लांब पल्लांच्या प्रवासामध्ये वाहन चालकाने दोन ते तीन तासानंतर पुरेशी विश्रांती घेणे, ठरलेल्या वेग मर्यादेपेक्षा वाहन अती वेगाने चालवू नये, वाहनांमध्ये असणारे आपत्कालीन दरवाजे सुस्थितीत ठेवणे, आपत्कालीन दरवाजे व आग विझवणारी यंत्रणा यांचे बसमध्ये असणारे प्रत्यक्ष स्थान व त्यांचा वापर करण्याची पध्दत प्रवाशांना समजावून सांगणे, तसेच वाहन चालकांनी नियमीत आपली आरोग्य व नेत्र तपासणी करून घेणे इत्यादी विषयी माहिती व मार्गदर्शन केले जात आहे.

उप प्रादेशिक परिवहन कार्यालयाकडून 1 जुलै पासून 75 बसेसची तपासणी केली असून दोषी आढळलेल्या 35 बसेसवर दंडात्मक कारवाई करण्यात आली आहे. यापुढेही बसेसची तपासणी नियमीतपणे केली जाणार असल्याचे श्री. साळी यांनी कळविले आहे.
Rate Card

Leave A Reply

Your email address will not be published.

कॉपी करू नका.