2024 ला सांगली जिल्ह्यात जतसह सर्व आमदार, खासदार भाजपाचेच असतील,या नेत्यांचा दावा

0

जत: भारतीय जनता पार्टीने सर्व विधानसभा मतदारसंघात वाररूम सुरू करण्याचे आदेश दिले होते. त्यानुसार राज्यातील पहिली वाररूम सर्वात शेवटचा विधानसभा मतदारसंघ (२८८) जतमध्ये सुरू करण्याचा बहुमान निवडणूक प्रमुख तम्मनगौडा रवीपाटील यांना मिळाला आहे. मान्यवरांच्या हस्ते वाररूम व निवडणूक प्रमुख कार्यालयाचे उद्घाटन तसेच नूतन जिल्हाध्यक्षांचा सत्कार करण्यात आला.

 

 

नुतन जिल्हाध्यक्ष निशिकांत पाटील यांचा सत्कार, जत विधानसभा मतदारसंघ भाजप वाररूम, निवडणूक प्रमुख कार्यालयाचे उद्घाटन अशा संयुक्त कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले होते. सदर कार्यक्रम प्रसंगी खासदार संजयकाका पाटील, नूतन जिल्हाध्यक्ष निशिकांत भोसले-पाटील, आमदार गोपीचंद पडळकर, जत विधानसभा निवडणूक प्रमुख तम्मनगौडा रवीपाटील, बालगाव आश्रमचे डॉ अमृतानंद स्वामीजी, केंद्रीय सिमेंट कार्पोरेशन ऑफ इंडिया महामंडळाचे संचालक डॉ. रवींद्र आरळी, प्रभाकर जाधव, आरपीआयचे जिल्हाध्यक्ष संजय कांबळे, उद्योजक विजयकुमार चिपलकट्टी, पापा कुंभार, टीमू एडके, विक्रम ताड, विजय पाटील, राजू पुजारी, तेजस्विनी व्हनमाने डॉ. ममता तेली, रमेश देवर्षी, मुत्तूराज तेली, बसवराज तेली, महादेव माळी, रमेश बिराजदार, हिंदकेसरी अफजलखान मुजावर, कामाण्णा बंडगर यांच्यासह तालुक्यातील अनेक गावचे सरपंच, बूथ प्रमुख, पदाधिकारी उपस्थित होते.

 

 

या कार्यक्रम प्रसंगी बोलताना भाजपचे नूतन जिल्हाध्यक्ष निशिकांत भोसले-पाटील म्हणाले की, जत विधानसभा मतदारसंघात पक्षाचे काम कौतुकास्पद झाले आहे. राज्यातील पहिली वार रूम सर्वात शेवटचा मतदारसंघ असलेल्या जत विधानसभा मतदारसंघामध्ये सुरू झाली आहे. याशिवाय सरल अॅप नोंदणीमध्ये जत तालुका पश्चिम महाराष्ट्रात आघाडीवर आहे.
देशाची मान पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्यामुळे जगात उंचावली आहे. नरेंद्र मोदी पंतप्रधान ही काळाची गरज आहे. त्यासाठी स्थानिक पातळीपासून देशपातळीपर्यंत पक्षबांधणी सुरू आहे. आगामी लोकसभा व विधानसभा निवडणुकीत जिल्ह्यातील सर्व आमदार व खासदार हे भाजपचे असतील असा विश्वास निशिकांत पाटील यांनी व्यक्त केला.

खासदार संजयकाका पाटील म्हणाले की, जतच्या पाण्याचा प्रश्न उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्यासमोर मांडला आहे. त्यांनी वारणा धरणातून जतला दोन टीएमसी पाणी दिले आहे. जत तालुक्यासाठी असलेली विस्तारित म्हैसाळ योजना तसेच पाण्याचे सर्व प्रश्न भविष्यकाळात सोडविले जातील.

Rate Card

 

 

निवडणूक प्रमुख तम्मनगौडा रवीपाटील यांचे काम अतिशय कौतुकास्पद आहे. त्यांच्यात व माझ्यात दुरावा नाही. आठवडाभरापूर्वी आम्ही एकत्र बसून चर्चा केली. आता सर्वांनी कामाला लागावे, असे आवाहन खासदारांनी केले.आमदार गोपीचंद पडळकर म्हणाले की, जत विधानसभा मतदार संघ सर्वात शेवटचा मतदार संघ असला तरी कामामध्ये पहिल्या क्रमांकावर आहे. पक्षाची रणनीती व कार्यपद्धती हाताळण्यासाठी राज्यातील पहिली वारू जतमध्ये सुरू होत आहे. ही बाब निश्चितच कौतुकास्पद आहे. निवडणूक प्रमुख म्हणून तम्मनगौडा रवीपाटील यांचे कार्य उल्लेखनीय आहे.
लोकसभा निवडणुकीपूर्वी जिल्हा परिषद व पंचायत समितीच्या निवडणुका होणार आहेत व लोकसभा निवडणुकीनंतर विधानसभेची निवडणूक होत आहे. सर्वच ठिकाणी भाजपची सत्ता निर्विवादपणे येईल. जतची जनता खूप हुशार आहे. कुणाला आणायचं कुणाला पाडायचं हे त्यांना माहीत आहे. 2024 च्या विधानसभा निवडणुकीत जतमध्ये पुन्हा भाजपचाच आमदार असेल असेही आमदार पडळकर म्हणाले.

 

 

प्रारंभी स्वागत व प्रास्ताविक करताना तम्मनगौडा रवीपाटील म्हणाले की, पक्षाने माझ्यावर निवडणूक प्रमुख पदाची जबाबदारी दिल्यानंतर मोदी येत नाही अभियान अत्यंत प्रभावीपणे राबविले आहे व सभासद नोंदणीमध्ये जत तालुक्याने पश्चिम महाराष्ट्रात आघाडी घेतली आहे. जत तालुक्याचे काही महत्त्वाचे प्रश्न आहेत. त्या सर्व प्रश्नांची माहिती प्रदेशाध्यक्ष चंद्रशेखर बावनकुळे व उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्याकडे दिली आहे. येत्या काही दिवसात जत तालुक्याच्या पाणी प्रश्नावर व विकास कामावर लक्ष केंद्रित केले आहे. नूतन कार्यालय हे जनसेवेसाठी समर्पित करण्यात आले आहे. केवळ व्यक्ती म्हणून नव्हे तर तालुक्यातील प्रत्येक कार्यकर्त्याचे हे कार्यालय आहे, या भावनेतून मी काम करीत आहे.याप्रसंगी जत तालुक्यातील अनेक गावच्या सरपंच व उपसरपंच तसेच प्रमुख कार्यकर्त्यांचा सत्कार हे करण्यात आला.

 

 

रवीपाटील यांचे नेत्यांनी केले कौतुक…

भाजप जत विधानसभा निवडणूक प्रमुख म्हणून निवड झाल्यापासून तम्मनगौडा रवीपाटील यांनी कौतुकास्पद कार्य केले आहे. राज्यातील पहिली वाररूम जतमध्ये सुरू केली आहे. याशिवाय सभासद नोंदणीमध्ये पश्चिम महाराष्ट्रात आघाडी घेतली आहे. या कामाचे कौतुक खासदार संजयकाका पाटील, जिल्हाध्यक्ष निशिकांत पाटील, तसेच आमदार गोपीचंद पडळकर यांनी केले.

Leave A Reply

Your email address will not be published.

कॉपी करू नका.