‘जत तालुका दुष्काळग्रस्त जाहीर करावा’ | सभागृह दणाणले ; विक्रम सावंतांचे उपोषण | उपमुख्यमंत्र्यांची तातडीने चर्चा

0
जत : सांगली जिल्ह्यातील जत तालुक्यातील पाणी प्रश्न संदर्भात मंगळवारी जतचे आमदार विक्रमसिंह सावंत यांच्यासह महाविकास आघाडी तर्फे विधिमंडळाच्या पायऱ्यांवर जोरदार घोषणाबाजी करण्यात आली.त्याचप्रमाणे विविध फलक हातात घेऊन आमदार  विक्रमसिंह सावंत यांनी जत तालुक्यातील प्राणी प्रश्न संदर्भात राज्य सरकारचे लक्ष वेधले.याला आ.विश्वजीत कदम,जयंत पाटील यांच्यासह महाविकास आघाडीच्या अनेक आमदारांनी पांठिबा दिला.विधानसभेच्या पायऱ्यावर आमदार सावंत यांनी जतच्या दुष्काळासह,विविध प्रश्नाचे फलक घेऊन उपोषण चालू केले. जत तालुक्याला दुष्काळग्रस्त जाहीर करावे, या मागणीसाठी विधान भवनाच्या पायऱ्यांवर निदर्शन केले.

 

 

याच अनुषंगाने कॉंग्रेस नेते बाळासाहेब थोरात व विश्वजीत कदम यांनी विधान सभागृहात पॉईंट ऑफ इन्फॉर्मेशन मांडला.त्याच्या आधारे अध्यक्ष महोदयांना विनंती करून जत तालुक्याच्या जनतेला न्याय मिळावा याकडे सभागृहाचे लक्ष वेधले.यानंतर उपमुख्यमंत्री तथा जलसंपदामंत्री देवेंद्र फडणवीस यांनी स्वतः लक्ष घालून विधानसभा सदस्य विक्रमसिंह सावंत यांच्या सर्व मागण्या पूर्ण केल्या जातील, असे सभागृहात जाहीर केले.सभागृहातील चर्चेनंतर स्वतः उपमुख्यमंत्री तथा जलसंपदामंत्री देवेंद्र फडणवीस,पालकमंत्री सुरेश खाडे, आमदार विक्रमसिंह सावंत आणि आ.विश्वजीत कदम यांना बोलावून चर्चा केली.यात जत तालुका दुष्काळ जाहीर करावा.जत पूर्व भागास तुबची बबलेश्वर पाणी योजनेचे पाणी कर्नाटक सरकार सोबत करार करुन पाणी मिळावे.जनावरांना चारा व पाणी उपलब्ध करुन द्यावे,विस्तारित म्हैसाळ योजनेचे काम लवकरात लवकर सुरु करावे, लोकांना पिण्याच्या पाण्यासाठी टँकर सुरु करावेत,आदी मागण्यावर चर्चा करत त्यावर तात्काळ कारवाई करण्याचे आश्वासन दिले.

 

 

दरम्यान,जत तालुक्याला दुष्काळी तालुका जाहीर करा अशी मागणी आज विधानभवनाच्या पाऱ्यांवर ठिय्या मांडत आमदार विक्रम सावंत यांनी केली. त्यांच्या मागणीला आ.जयंत पाटील यांनी उपस्थित राहून पाठिंबा दिला. जत हा दुष्काळी भाग आहे, या भागातील ६५ गावांमध्ये पाण्याची तीव्र टंचाई आहे. या गावांत पाण्याचे दुर्भिक्ष असतेच, त्यात यंदा अजूनपर्यंत हवा तसा पाऊस झालेला नाही. पाण्याची तीव्र टंचाई गांभीर्याने घेत या भागात पाण्याच्या टँकरची व्यवस्था केली पाहिजे. तसेच इतरही महत्त्वाच्या उपाययोजना करायला हव्यात. या भागातील काही गावे आम्हाला कर्नाटकात पाठवा अशी मागणी करत आहे. हे अत्यंत दुर्दैवी आहे, शासनाने यात वेळीच लक्ष घालावे.मागच्या काळात मविआ सरकार असताना माझ्याकडे जलसंपदा विभागाची जबाबदारी होती. त्यावेळी या भागातील पाण्याचा गंभीर प्रश्न लक्षात घेता आम्ही म्हैसाळ विस्तारीत पाण्याची योजना आखली होती. या योजनेच्या सर्व गोष्टींची पूर्तता झाली आहे. सरकारने तात्काळ या योजनेचे काम सुरू करायला हवे,असे आवाहन आ.जयंत पाटील यांनी केले.

 

जत तालुका हा कायमचा दुष्काळी तालुका असून सदर तालुका हा आवर्षण प्रवण (प्रजन्य छायेतील)असल्याने मुळातच पाऊस कमी पडतो या वर्षी अवकाळी किंवा खरीपाचा कोणत्याही नक्षत्राचे पाऊस पडला नाही त्यामुळे जत तालुक्यात भीषण असा दुष्काळ पडलेला आहे. त्यामुळे पिण्याचे पाणी टंचाई निर्माण झाली असून जनावरांना कोणत्याही प्रकारचा चारा उपलब्ध नसल्याने जनावरे जगवण्यासाठी शेजारच्या राज्यातून पन्नास रुपये पेंडी या दराने चारा आणुन जनावरे जगवण्याचे काम  शेतकरी करीत आहेत. त्यामुळे दुष्काळी जत तालुक्याच्या शेतकऱ्यांचे हाल होत आहेत. त्याकरीता शासनाने जत तालुका हा त्वरीत दुष्काळी तालुका म्हणून जाहीर करुन दुष्काळाच्या सर्व सोई उपलब्ध करुन दयावे या करीता माझ्या मतदार संघातील शेतकरी गेल्या दिड महिन्यापासून विविध प्रकारे आंदोलने करीत असून त्याकडे शासनाने कोणतीही दखल न घेतल्यामुळे मला आज विधान भवनाच्या पायरीवर बसून आंदोलन करण्याची वेळ आली आहे.

 

 

तरी शासनाने त्वरीत लक्ष घालून दुष्काळ जाहीर करावा.तसेच जत तालुक्यातील दुष्काळ कायमस्वरुपी हटविण्याकरीता गेल्या चाळीस वर्षापुर्वी मंजूर असलेली म्हैसाळ योजना  दोन हजार कोटी  मंजूर केले असून फेब्रुवारी अखेर पाणी उपलब्ध करुन देतो असे आश्वासन दिले होते. त्याची अदयापही कार्यवाही झाली नसून सदर दोन हजार कोटी पैकी रायजिंग मेनसाठी 900 (नऊशे) कोटीचे टेंडर काढल्याचे समजते. उर्वरीत तालुक्यातील पाणी वितरकेचे अदयाप कोणत्याही प्रकारची कार्यवाही केली नाही. त्यामुळे ही योजना रखडलेली जाणार आहे. त्यामुळे सदर योजना कार्यान्वीत होई पर्यंत कर्नाटक राज्याकडे महाराष्ट्र राज्याचे 7.850 टि.एस.सी. पाणी शिल्लक असून त्या पाण्यापैकी कोणताही खर्च न करता कर्नाटक राज्याची तुबची बबलेश्वर या योजनेतून माझ्या तालुक्यात पाणी मिळू शकते, तशी मागणी महाराष्ट्र शासनाने कर्नाटक राज्याकडे मागणी करुन माझ्या दुष्काळी तालुक्यातील शेतक-यांना दयावे, तसेच दुष्काळी जत तालुक्यात म्हैसाळ योजनेचे थोडेफार पाणी आले आहे. त्यासाठी विजेचा विद्युत प्रवार फार मोठया प्रमाणात कमी पडते दिवसातून फक्त चार तास विज मिळते तीही व्यवस्थीत मिळत नाही त्या करीता शासनाने आमच्या तालुक्यास मोठया मेगावॅट समतेची विदयुत उपकेंद्रे उपलब्ध करुन द्यावेत,अशी मागणी निवेदनाद्वारे आ.सावंत यांनी केली आहे.

 

आमदार फलक घेऊन बसले
जतचे आमदार विक्रमसिंह सावंत हे जत तालुक्यातील दुष्काळी स्थितीसह विविध समस्याचे फलक घेऊन विधीमंडळांच्या पायऱ्यावर उपोषण सुरू केले होते.जत तालुक्याच्या इतिहासात असे जतच्या प्रश्नासाठी आक्रमक आंदोलन आमदार सावंत यांनी केले.दोन्ही हातात फलक घेऊन त्यांनी लक्ष वेधून घेतले.
जत तालुक्यात स्वागत
जतचे प्रश्न विधीमंडळांत प्रभावी मांडण्याचे काम आ.सावंत गेल्या साडेतीन वर्षापासून करत आहेत.यंदा पावसाळी अधिवेशनात त्यांनी जतच्या दुष्काळाची दाहकता स्पष्ट करणारे आंदोलन करत जतचे प्रश्न सभागृहांच्या निदर्शनास आणून दिले.त्यांच्या या आंदोलनांचे नागरिकांनी स्वागत केले.
उपमुख्यमंत्री यांच्याकडून तातडीने दखल
दुष्काळी जतच्या प्रश्नावर जतचे आमदार हे उपोषणास बसले आहेत.सरकार त्यांची दखल घेणार आहे का नाही,असे आक्रमकपणे सभागृहात आ.बाळासाहेब थोरात व विश्वजीत कदम यांनी आवाज उठवताच,उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी बैठक घेण्याचे आश्वासन सभागृहास दिले.व तातडीने आमदार सावंत,कदम व पालकमंत्री सुरेश खाडे यांच्या समवेत चर्चा करत,तात्काळ उपाययोजना करण्याचे आश्वासन दिले.
संखमध्ये आंदोलन
आमदार सावंत एकीकडे सभागृहात आंदोलन करत असतानाच जत कॉग्रेसकडून संख येथे तालुकाध्यक्ष बाबासाहेब कोडग यांच्या नेतृत्वाखाली दुष्काळी मागणीसाठी चक्री आंदोलन सुरू केले आहे.यांची दखल सरकारने घेतल्याचे स्पष्ट झाले.
जतसाठी विरोधीपक्षनेत्यासह महाविकास आघाडीचे आंदोलन
जतचे आमदार विक्रमसिंह सावंत यांच्या या आंदोलनात विरोधी पक्षनेते अंबादास दानवेसह माजी मुख्यमंत्री पृथ्वीराज चव्हाण,माजी मंत्री बाळासाहेब थोरात, सतेज पाटील,भाई जगताप,अनिल देशमुख,वर्षा गायकवाडसह अनेक महाविकास आघाडीच्या आमदारांनी आवाज उठवत आ.सावंत यांना पाठिंबा दिला,असे नेते जतसाठी प्रथमच एकवटल्याने सरकारला दखल घ्यावी लागली.
Rate Card

Leave A Reply

Your email address will not be published.

कॉपी करू नका.