तासगाव : येथील बागणे चौकात आज सकाळी केळी विक्रेत्यांमध्ये जागेवरून वाद झाला. हा वाद विकोपाला जाऊन रुपेश पेटकर याच्यावर धारदार शस्त्राने हल्ला करण्यात आला. याप्रकरणी मंगेश अनिल रसाळ याला जेरबंद करण्यात आले आहे. रसाळ याला एलसीबीच्या पथकाने नांद्रे येथून अटक केली.
याबाबत माहिती अशी,तासगाव शहरातील बागणे चौकात केळी विक्रेते बसतात. गेल्या काही दिवसांपासून केळी विक्रेत्यांमध्ये बसण्याच्या जागेवरून वाद सुरू आहे. याच कारणावरून अनेक वेळा हमरी – तुमरी झाली आहे. आज (रविवारी) सकाळी रुपेश पेटकर व मंगेश रसाळ यांच्यात वाद झाला.
हा वाद विकोपाला जाऊन एकमेकांच्या अंगावर धावून जाण्याचा प्रयत्न झाला.यातूनच रसाळ याने पेटकर यांच्यावर धारदार शस्त्राने हल्ला चढवला. यामध्ये पेठकर गंभीर जखमी झाला आहे. त्याला सांगली येथील सिनर्जी हॉस्पिटलमध्ये उपचारासाठी दाखल करण्यात आले आहे.
दरम्यान पेटकर याच्यावर हल्ला केल्यानंतर हल्लेखोर रसाळ हा फरार झाला होता. त्याचा तासगाव पोलीस तसेच एलसीबीचे पथक शोध घेत होते. अखेर एलसीबीच्या पथकाने नांद्रे येथून रसाळ याच्या मुसक्या आवळल्या. त्याला तासगाव पोलिसांच्या ताब्यात दिले आहे.
पेटकर याच्यावरील हा दुसरा हल्ला…!
रुपेश पेटकर याच्यावर यापूर्वी तासगाव – विटा रोडला असणाऱ्या कैलाश लॉजजवळ जीवघेणा हल्ला झाला होता. या हल्ल्यातून पेटकर कसाबसा वाचला होता. आता पुन्हा त्याच्यावर हल्ला झाला आहे. रविवारी सकाळी – सकाळी घडलेल्या या घटनेमुळे शहर हादरले होते.