तासगाव : तासगाव शहरातील बागणे परिसरात भरणारा दैनंदिन व आठवडा बाजार स्थलांतरित करण्याचा निर्णय नगरपालिकेचे मुख्याधिकारी पृथ्वीराज पाटील यांनी घेतला आहे. यापुढे हा बाजार छत्रपती शिवाजी महाराज व्यापारी संकुलमध्ये भरणार आहे. विक्रेत्यांना नेमून दिलेल्या जागेवरच आपल्या मालाची विक्री करावी लागणार आहे. जो व्यापारी नेमून दिलेल्या जागेवर बसणार नाही, त्याच्यावर गुन्हा दाखल करण्याचा इशारा मुख्याधिकारी पाटील यांनी दिला आहे.
याबाबत माहिती अशी : तासगाव शहरात सोमवार आणि गुरुवारी आठवडा बाजार भरतात. हे बाजार बागणे चौक परिसरात भरतात.तर दैनंदिन बाजारही याच परिसरात भरतो.नगरपालिकेने ज्यावेळी छत्रपती शिवाजी महाराज व्यापारी संकुलची निर्मिती केली त्यावेळी भाजी विक्रेते, फळ विक्रेते व अन्य विक्रेत्यांसाठी बाजार कट्टा निर्माण करण्यात आला होता. या बाजार कट्ट्यांचे वाटपही करण्यात आले आहे.
थोडे दिवस या ठिकाणी बाजार सुरूही झाला होता. मात्र पुन्हा सर्वच विक्रेत्यांनी बागणे चौक परिसरात आपले बस्तान बसवले.बागणे चौकात सुरुवातीलाच केळी विक्रेते बसतात. त्यांच्या बसण्याच्या जागेवरून रविवारी जोरदार वादावादी झाली. वादावादीचे पर्यवसान हाणामारीत झाले. यातून एकावर धारदार शस्त्राने जीवघेणा हल्ला करण्यात आला.
ही घटना घडल्यानंतर नगरपालिका ‘ॲक्शन मोडवर’ आली आहे. कोणत्याही विक्रेत्याचा यापुढे लाड केला जाणार नाही. प्रत्येक विक्रेत्याने यापुढे त्यांना नेमून दिलेल्या जागेवर आपल्या मालाची विक्री करावी लागणार आहे.नेमून दिलेल्या जागेवर न बसणारांवर गुन्हे दाखल करण्याचा इशारा देण्यात आला आहे.
उद्या मंगळवार पासून दैनंदिन व गुरुवारचा बाजार छत्रपती शिवाजी महाराज व्यापारी संकुल मध्ये भरणार आहे. तर सोमवारचा बाजार पूर्वीच्याच ठिकाणी बागणे चौक परिसरात भरणार आहे.