सांगली : दारूमध्ये तणनाशक टाकून विषप्रयोग करून खून करणाऱ्या आरोपीला न्यायालयाने जन्मठेपेची शिक्षा सुनावली.सांगली येथील अति न्यायाधीश डी.वाय.गौड यांनी हा निर्णय दिला आहे. काम चालून यातील आरोपी क्र.१ लहू लक्ष्मण मंडले,(वय ४१,रा.हणमंत वाडिये ता.कडेगाव,जि.सांगली)असे आरोपीचे नाव आहे.भा.द.वि.स.कलम ३०२ प्रमाणे सदर आरोपीला दोषी धरून जन्मठेपेची शिक्षा,दंड ४ हजार रूपये व दंड न भरल्यास ९ महिने सश्रम कारावासाची शिक्षा.तसेच,भा.द.वि.स. कलम ३२८ प्रमारे सदर आरोपीला दोषी धरून ७ वर्षे शिक्षा व दंड २ रूपये व दंड न भरल्यास ५ महिने सश्रम कारावासाची शिक्षा.दोन्ही शिक्षा एकत्रीत भोगण्याचे आहेत.भा.द.वि.स.कलम ३२३ प्रमाणे सदर आरोपीला दोषी धरून ६ महिने सक्षम कारावासाची शिक्षा सुनावली आहे.याकामी सरकारतर्फे सहायक सरकारी वकील, सांगली सौ.मेधा प्रविण
पाटील यांनी काम पाहिले.
यात थोडक्यात हकीकत अशी की, मयत सचिनकुमार कांबळे व आरोपी लहू मंडले हे दोघे मित्र होते व मयताची नात्यातील महिलेशी आरोपी क्र.१ याचे अनैतिक संबंध होते.त्यामुळे मयत सचिनकुमार कांबळे हा तिला त्रास देत होता.त्याच्या त्रासाला कंटाळून यातील आरोपी क्र.१ व २ यांनी संगनमताने सचिनकुमार याच्या खुनाचा कट रचला. त्याप्रमाणे आरोपी १ याने दि.२० मे २०२० रोजी सकाळी ९.३० वाजण्याच्या सुमारास मयत सचिनकुमार रामचंद्र कांबळे यास फोन करून दारू पिण्यासाठी बोलावून घेवून तासगाव रोडला शेतजमिनीत बसून दारूमध्ये तणनाशक मिक्स करून मयत सचिनकुमार रामचंद्र कांबळे यास ती पासून, त्याचे नाका तोंडावर,ठोसे मारुन त्याचा गळा दाबून खून केला.
आरोपीने स्वतःहून तासगाव पोलीस ठाणेमध्ये हजर राहून गुन्ह्याची कबुली दिली.त्यानुसार पोलीस उपनिरीक्षक विश्राम मदने यांनी फिर्याद दिली.सदरचा गुन्हा तासगाव पोलीस २०२० मध्ये दाखल झाला होता.त्या अनुषंगाने तपास होऊन दोषारोप मे. कोर्टात दाखल झाले.कोर्टात फिर्यादी, पंच, प्रत्यक्षदर्शी साक्षीदार व तपासी अधिकारी यांचे जबाब नोंदवण्यात आले.सुरुवातीचा तपास सा.पो.नि.पंकज पवार यांनी केला व मयत हा अनुसूचित जाती जमातीचा असल्याने पुढील तपास अंकुश इंगळे,(उपविभागीय पोलीस अधिकारी विटा विभाग) यांनी काम पाहिले. याकामी एकूण २० साक्षीदार तपासण्यात आले.
सरकारी वकीलांनी आरोपीच्या शिक्षेबद्दल युक्तीवाद केला व युक्तीवादामध्ये त्यांनी सदरचा गुन्हा हा गंभीर स्वरुपाचा आहे. आरोपीने केलेला गुन्हा हा समाजविघातक अशा स्वरूपाचा आहे.त्यामुळे आरोपीला जास्तीत जास्त शिक्षा देण्यात यावी व त्यांना कोणत्याही प्रकारची सहानुभुती दाखवण्यात येवू नये, त्याचबरोबर समाजामध्येही त्याचा चांगला संदेश जावा जेणेकरून अशी कृत्ये करणाऱ्या लोकांना आळा बसेल असे सांगितले.
या सर्वांचा विचार करून आरोपीला याकामी दोषी धरण्यात आले व वरीलप्रमाणे शिक्षा सुनावण्यात आली. आरोपी क्र २ हिला पुराव्याअभावी निर्दोष मुक्त करण्यात आले.याकामी पैरवी कक्षातील पोलीस कर्मचारी श्रीमती वंदना मिसाळ,श्रीमती सीमा घोलप, श्रीमती सुप्रिया मोसले, तासगाव पोलीस ठाणेतील कर्मचारी श्री.माळकर व पैरवी कक्षातील सर्व पोलीसांचे सहकार्य लाभले.