जालना : मराठा समाजाला आरक्षण मिळावे यासाठी जालना जिल्ह्यातील आंतरवाली सराटी येथे उपोषण सुरू असताना जमलेल्या गर्दीच्या ठिकाणी पोलिसांवर झालेल्या दगडफेकप्रकरणी गुन्हा नोंदविण्यात आला आहे.
आंदोलकांतील १६ जणांसह अन्य ३०० ते ३५० नावे माहीत नसलेल्या आंदोलनकर्त्यांविरुद्ध गोंदी पोलिसांनी हा गुन्हा नोंदविला आहे.यामुळे राज्यात संतापाची लाट उसळली आहे.जालना जिल्ह्यातील सराटी येथे मनोज जरांगे हे मराठा आरक्षणासाठी उपोषणास बसले होते.उपोषण अधिककाळ चालल्याने त्यांची प्रकृती खालावल्याने तपासणीनंतर त्यांना उपचाराची आवश्यकता असल्याचे वैद्यकीय अधिकाऱ्यांनी सुचविले होते.
त्यामुळे त्यांना समजावून सांगण्यासाठी वरिष्ठ पोलीस अधिकारी गेले होते.परंतु आरक्षण मिळाल्याशिवाय जरंगे यांना उपोषण सोडू देणार नाही असे सांगून आंदोलनकर्त्यांनी पोलीस अधिकारी, पोलीस अंमलदार आणि महसूल अधिकाऱ्यांशी हुज्जत घातली. पोलीस आणि दंडाधिकारी यांनी दिलेल्या कायदेशीर सूचनांचे पालन केले नाही. पोलिसांवर दगडफेक व प्राणघातक हल्ला करून त्यांना गंभीर जखमी केले. तसेच पोलिसांच्या वाहनांवर दगडफेक केली तसेच त्यांचे खासगी वाहन पेटवून नुकसान केले, असे या संदर्भात दाखल केलेल्या फिर्यादित म्हटले आहे.दरम्यान यानंतर राज्यभरातील अनेक नेत्यांच्या तिखट प्रतिक्रिया उमटल्या असून आंदोलनाची वाढणार की काय अशी स्थिती राज्यात निर्माण झाली आहे.