टेंभूच्या सुप्रमासाठी आमदार सुमन पाटील यांच्या समवेत जिल्हाधिकारी कार्यालयावर उपोषण सुरू : शेकडो शेतकऱ्यांची उपस्थिती
सांगली : तासगाव आणि कवठेमहांकाळ तालुक्यातील अनेक गावे टेंभू योजनेच्या हक्काच्या पाण्यापासून वंचित आहेत. या गावांना हक्काचे पाणी मिळावे. टेंभू योजनेत या गावांचा अधिकृतरित्या समावेश करावा. टेंभू योजनेच्या विस्तारित कामांना तृतीय सुधारित प्रशासकीय मान्यता मिळावी, या मागणीसाठी आमदार सुमन पाटील यांच्यासह रोहित पाटील यांनी आजपासून उपोषणास सुरुवात केली आहे. दरम्यान रोहित पाटील कालपासूनच आजारी आहेत. आज त्यांचा ताप आज 102 डिग्रीवर गेला आहे. मात्र तरीही ते उपोषणावर ठाम आहेत.
तासगाव आणि कवठेमहांकाळ तालुक्यातील अनेक गावांचा आजही टेंभू योजनेत अधिकृत समावेश नाही. या गावांना हक्काचे पाणी मिळत नाही. त्यामुळे दोन्ही तालुक्यातील शेती उध्वस्त होण्याच्या मार्गावर आहे. याबाबत शासनाकडे अनेक वेळा पाठपुरावा करूनही टेंभू योजनेच्या माध्यमातून या गावांना हक्काचे पाणी देण्याबाबत चालढकलपणा करण्यात येत आहे. टेंभू योजनेच्या विस्तारित प्रकल्पाला गेल्या अनेक वर्षांपासून मंजुरी मिळालेली नाही.
याबाबत मंत्रालय पातळीवर प्रशासनाचे उंबरे झिजवूनही सुधारित प्रशासकीय मान्यता मिळाली नाही. त्यामुळे तासगाव आणि कवठेमहांकाळ तालुक्यात शेतकरी आक्रमक झाले आहेत. शेतकऱ्यांनी चक्क आपल्या नेतृत्वावरच टीका करण्यास सुरुवात केली आहे. त्यामुळे आमदार सुमन पाटील व रोहित पाटील यांनी आजपासून सांगली येथील जिल्हाधिकारी कार्यालयासमोर आमरण उपोषणास सुरुवात केली आहे. जोपर्यंत तासगाव आणि कवठेमंकाळ तालुक्यातील वंचित गावांचा टेंभू योजनेत अधिकृत समावेश होत नाही, तोपर्यंत उपोषण करू, असा इशारा देण्यात आला आहे.
दरम्यान उपोषणाच्या पूर्वसंध्येला टेंभूच्या विस्तारित प्रकल्पासाठी आठ टीएमसी पाणी मंजूर केल्याचे परिपत्रक शासनाकडून काढण्यात आले. मात्र केवळ पाणी मंजूर करून आमच्या तोंडाला पान पुसण्याचा प्रयत्न सरकारने करू नये. आम्हाला विस्तारित टेंभू योजनेची सुधारित प्रशासकीय मान्यता मिळाल्याचे पत्र द्यावे. त्यानंतर विस्तारित योजनेचे काम तात्काळ सुरू करावे. याबाबतची लेखी हमी द्यावी, अशी मागणी करत आमदार सुमन पाटील व रोहित पाटील यांनी आपण उपोषण करणारच, असे सांगितले होते.
दरम्यान रोहित पाटील यांना कालपासूनच ताप होता. तशाही परिस्थितीत ते शेतकऱ्यांसाठी आजपासूनच्या उपोषणात सहभागी झाले आहेत. आज सायंकाळी शासकीय रुग्णालयाच्या पथकाने रोहित यांची तपासणी केली. त्यावेळी त्यांचा ताप 102 डिग्री असल्याचे दिसून आले. शासकीय रुग्णालयाचे पथक आमदार पाटील व रोहित यांच्या तब्येतीवर लक्ष ठेवून आहे.
दरम्यान आंदोलनाच्या ठिकाणी पालकमंत्री सुरेश खाडे यांनी भेट दिली. उपोषणावर तोडगा काढण्याचा प्रयत्न केला. दिवसभरात माजी पालकमंत्री जयंत पाटील, काँग्रेसचे विशाल पाटील, भाजपचे माजी जिल्हाध्यक्ष पृथ्वीराज देशमुख यांच्यासह अनेकांनी उपोषण स्थळी भेट देऊन आपला पाठिंबा दिला.