तासगाव कॉलेजच्या इमारतीवरून विद्यार्थिनीने घेतली उडी
तासगाव : येथील वसंतरावदादा पाटील महाविद्यालयाच्या इमारतीवरून एका विद्यार्थिनीने उडी घेतली. हा प्रकार आज सकाळी 11 वाजण्याच्या दरम्यान घडला. आरती जगदाळे (रा. सिद्धेवाडी, ता. तासगाव) असे विद्यार्थिनीचे नाव आहे. या घटनेत विद्यार्थिनीचा पाय फ्रॅक्चर झाला आहे.
याबाबत प्राचार्य मिलिंद हुजरे यांनी दिलेली माहिती अशी : आरती जगदाळे ही बारावीच्या वर्गात शिकते. आज सकाळी तिच्या एका मैत्रिणीच्या पोटात दुखू लागल्याने दोघींनी घरी जाण्याचा निर्णय घेतला. आरती ही तिच्या मैत्रिणीची वर्गातील बॅग आणण्यासाठी गेली. मात्र वर्गावर असणाऱ्या प्राध्यापकांनी सुरू असणारा तास संपल्यानंतर बॅग घेऊन जाण्यास सांगितले.
त्यानंतर वर्गातून बाहेर आलेल्या आरती हिने अचानक महाविद्यालयाच्या पहिल्या मजल्यावरून उडी घेतली. तिला महाविद्यालय प्रशासनाने तासगाव येथील खाजगी रुग्णालयात दाखल केले आहे. तिचा पाय फ्रॅक्चर असल्याचे प्राथमिक तपासणीत दिसून आले आहे. तिने नेमकी कोणत्या कारणाने उडी घेतली, हे अद्याप समजू शकले नाही.