कडेगांव : जमिनीची अकृषिक आकारणी करून गुंठेवारी नियमानुकुल आदेश देण्यासाठी येथील उपविभागीय अधिकारी कार्यालयातील लोकसेवक नायब तहसीलदार सुनील जोतिराम चव्हाण (वय 50) यांना 40 हजाराची लाच स्वीकारताना लाचलुचपत प्रतिबंधक विभागाने रंगेहाथ पकडले.ही कारवाई शुक्रवार ( दि 17 ) रोजी लाचलुचपत विभागाने येथे केली.
याबाबत लाचलुचपत प्रतिबंधक विभागाने दिलेली अधिक माहिती अशी की, तक्रारदार यांनी विक्री केलेल्या जमिनीची अकृषीक आकारणी करून गुंठेवारी नियमानुकुल आदेश देणेसाठी नायब तहसीलदार सुनिल जोतीराम चव्हाण यांनी तक्रारदार यांच्याकडे 45 हजार रुपयांची लाचेची मागणी केली असल्याबाबतचा तक्रारी अर्ज तक्रारदार यांनी लाचलुचपत प्रतिबंधक पथकास दिला होता. या अर्जाची पथकाने पडताळणी केली असता त्यामध्ये सुनिल चव्हाण यांनी तक्रारदार यांनी विक्री केलेल्या जमिनीची गुंठेवारी नियमानुकुल आदेश देणेसाठी 45 हजार रुपयांची लाचेची मागणी करून तडजोडीत 40 हजार रुपयांची लाचेची मागणी केल्याचे निष्पन्न झाले.
त्यानंतर तत्काळ लाचलुचपत विभागाच्या पथकाने मध्यवर्ती प्रशासकीय कार्यालय कडेगाव या ठिकाणी सापळा रचला असता नायब तहसीलदार सुनिल चव्हाण यांनी तक्रारदार यांचेकडे लाचेची मागणी करून 40 हजार रूपये लाच रक्कम स्विकारताना त्यांना रंगेहात पकडले. सुनिल चव्हाण यांच्या विरुद्ध कडेगाव पोलीस स्टेशन येथे भ्रष्टाचार प्रतिबंध अधिनियमाखाली गुन्हा दाखल करण्याची कार्यवाही रात्री उशिरा पर्यंत सुरु होती.
सदरची कारवाई लाचलुचपत प्रतिबंधक विभाग पुणे पोलीस उप आयुक्त, अधीक्षक अमोल तांबे ,अपर पोलीस अधीक्षक विजय चौधरी यांच्या मार्गदर्शनाखाली पोलिस अधीक्षक संदीप पाटील, पोलीस निरीक्षक विनायक भिलारे, दत्तात्रय पुजारी , पोलीस अंमलदार ऋषीकेश बडणीकर, अजित पाटील, सुदर्शन पाटील, रामहरी वाघमोडे, पोपट पाटील, धनंजय खाडे, अतुल मोरे, सिमा माने, चालक वंटमुरे यांनी केली आहे.