दुष्काळसदृश्य यादीतून वायफळे सर्कल वगळले | सरकारी बाबुंचा अनागोंदी कारभार : शेतकऱ्यांवर ऐन दिवाळीत शिमग्याची वेळ

0

यावर्षी राज्यात अतिशय कमी पाऊस पडला. मात्र शासनाने केवळ ४० तालुक्यांमध्ये दुष्काळ जाहीर केला. शासनाच्या या निर्णयामुळे उर्वरित दुष्काळी भागात संतापाची लाट उसळली. त्यानंतर शासनाने फेरसर्वेक्षण करुन सुमारे १०२१ महसुली मंडलांमध्ये दुष्काळसदृश्य परिस्थिती घोषित केली. मात्र यामध्ये तासगाव तालुक्यातील वायफळे सर्कलचा समावेश नाही. वास्तविक वायफळे सर्कलला यावर्षी सर्वाधिक दुष्काळाच्या झळा सोसाव्या लागल्या आहेत. मात्र एसीमध्ये बसणाऱ्या सरकारी बाबुंच्या अनागोंदी कारभारामुळे वायफळे सर्कलमधील शेतकऱ्यांवर ऐन दिवाळीत शिमगा साजरा करण्याची वेळ आली आहे.

तासगाव तालुक्यात यावर्षी अत्यल्प पाऊस पडला. तालुक्यातील सर्वच गावात भीषण दुष्काळी परिस्थिती निर्माण झाली आहे. द्राक्षबागा व रब्बी हंगामातील पिकांना शेवटपर्यंत पाणी मिळण्याची शाश्वती नाही. त्यामुळे यावर्षीचा द्राक्ष व रब्बी हंगाम धोक्यात आला आहे. सर्वच गावांमध्ये द्राक्ष हंगामाच्या अंतिम टप्प्यात पाणी कमी पडणार आहे.

याशिवाय चाऱ्याचीही भीषण परिस्थिती आहे. पाऊसाच्या अभावामुळे चाऱ्याची उपलब्धता आवश्यक प्रमाणात झाली नाही. काही गावात सद्यस्थितीलाच चाऱ्याची टंचाई आहे. त्यामुळे आगामी काळात पशुधन वाचवणे अवघड होणार आहे.

 

शासनाने यावर्षी सुरुवातीच्या टप्यात राज्यातील ४० तालुक्यांमध्ये दुष्काळ जाहीर केला होता. त्यामध्ये तासगाव तालुक्याचा समावेश नव्हता. वास्तविक तासगाव हा कायमस्वरुपी दुष्काळी तालुका आहे. मात्र या तालुक्याचा दुष्काळी यादीत समावेश नसल्याने संतप्त प्रतिक्रिया उमटल्या.

 

दरम्यान, शासनाने नव्याने राज्यातील १०२१ महसुली मंडळांमध्ये दुष्काळी परिस्थिती घोषित केली. मात्र यामध्ये तासगाव तालुक्यातील वायफळे सर्कलचा समावेश नाही. तालुक्यातील इतर ६ सर्कलचा या यादीत समावेश आहे. मात्र वायफळे सर्कलचा समावेश नसल्याने सरकारबद्दल तिखट प्रतिक्रिया उमटत आहेत. शासनाने वायफळे सर्कलचा दुष्काळी यादीत समावेश करावा, अशी मागणी होत आहे.

Rate Card

दुष्काळी भागाला मिळणाऱ्या सवलती…!

■ जमीन महसुलामध्ये सूट ■ सहकारी कर्जाचे पुनर्गठन ■ शेतीशी निगडीत कर्जाच्या वसुलीस स्थगिती ■ कृषी पंपांच्या चालू वीज बिलात ३३.५ टक्के सूट ■ शालेय, महाविद्यालयीन विद्यार्थ्यांचे परिक्षा शुल्क माफ ■ रोहयोंतर्गत कामाच्या निकषात काही प्रमाणात शिथिलता ■ आवश्यक तेथे पिण्याचे पाणी पुरवण्यासाठी टँकर्सचा वापर ■ टंचाई जाहीर केलेल्या गावात शेतकऱ्यांच्या शेती पंपाची वीज जोडणी खंडीत न करणे

वायफळे सर्कलबाबत शासनाकडे अहवाल पाठवला : तहसीलदार

तासगाव तालुक्यातील वायफळे सर्कलचा दुष्काळसदृश्य यादीस समावेश नाही. याबाबत तहसीलदार रवींद्र रांजणे यांना विचारले असता ते म्हणाले, वायफळे सर्कलमधील दुष्काळबाबत शासनाकडे तातडीने अहवाल पाठवला आहे. या सर्कलचा नव्याने दुष्काळसदृश्य यादीत समावेश होईल. यासाठी शासनस्तरावर प्रयत्न सुरू आहेत.

Leave A Reply

Your email address will not be published.

कॉपी करू नका.