ढिम्म नगरपरिषदेला दिसेना,या उद्यानाची दुरावस्था
जत,संकेत टाइम्स : जत सांगली मार्गावरील नगरपरिषदेच्या जलशुध्दीकरण केंद्राजवळ असलेल्या जत नगरपरिषदेच्या छत्रपती शिवाजी महाराज उद्यानाची दुरावस्था झाल्याने नागरिकांतून संताप व्यक्त करण्यात येत आहे.
शहरातील अबाल वृध्दांना विरंगुळ्याचे साधन म्हणून जत नगरपरिषदेने जत सांगली मार्गावरील नगरपरिषदेच्या मालकिच्या जागेवर लाखो रूपये खर्च करून चांगल्या प्रकारे छत्रपती शिवाजी महाराज उद्यानाची उभारणी केली होती.या उद्यानात नगर परिषदेने विविध प्रकारची शोभिवंत अशी झाडे लावली होती.या झाडांना संरक्षण म्हणून उद्यानासभोवती लोखंडी खांब उभे करून तारेचे कंपाउंड ही घातले होते.
जत येथिल काही दानशूर व्यक्तीनी या उद्यानात अबालवृद्धांना बसण्यासाठी सिमेंट बाकडी ही भेट दिली होती.तसेच लहान मुलांसाठी खेळणी ही उपलब्ध करून दिली होती.परंतु सद्या या उद्यानाकडे जत नगरपरिषदेचे दुर्लक्ष झाल्याने या उद्यानाची दुर्दशा झाली आहे. उद्यानासभोवती असलेले तारेचे कंपाऊंड नाहिसे होत चालले आहे. उद्यानातील लहानमुलांची खेळणी मोडकळीस आली आहेत.तर काही ठिकाणची खेळणी गंजून चालली आहेत.दानशूर व्यक्तीनी जत नगरपरिषदेस भेट म्हणून दिलेली सिमेंटची बाके फुटली आहेत.

उद्यानातील विद्धूत यंत्रणा बंद आहे.कंपाउंड नसल्याने उद्यानातील झाडांची कत्तल झाली आहे.नगरपरिषदेच्या दुर्लक्षामुळे उद्यानाची बकाल अवस्था झाली आहे. उद्यानाच्या सकृतदर्शनी भागात असलेल्या छत्रपती शिवाजी महाराज उद्यानाची फलकाची ही दुर्दशा झाली आहे.
या ठिकाणी रात्रीच्या वेळी लाइटची व्यवस्था नसल्यामुळे अबालवृद्धांची गैरसोय होत आहे.जत नगरपरिषद नगरोत्थान योजनेतून जत शहरातील विद्यानगर, मोरे काॅलनी आदी ठिकाणी नविन उद्यानाची उभारणी करण्यासाठी लाखो रूपये खर्च करत असताना दुसरीकडे मात्र पूर्वीच्या उभारण्यात आलेल्या उद्यानाकडे जाणीवपूर्वक दुर्लक्ष करताना दिसत आहे.जत नगरपरिषदेने छत्रपती शिवाजी महाराज उद्यानाची त्वरीत दुरूस्ती करावी व उद्यानाला पूर्वीचे स्वरूप प्राप्त करून द्यावे अशी मागणी अबालवृद्धांकडून करण्यात येत आहे.
जत येथील छत्रपती शिवाजी महाराज उद्यानाची दुर्दशा झाली आहे.
