२२ जानेवारी २०२४ हा दिवस भारताच्या इतिहासात सुवर्णाक्षरांनी नोंदवला जाणार आहे. ५५० वर्षांच्या प्रदीर्घ प्रतीक्षेनंतर श्रीरामजन्मभूमी अयोध्येत बांधण्यात आलेल्या श्रीरामाच्या भव्य-दिव्य मंदिराचे उद्घाटन होणार आहे. मंदिराच्या गर्भगृहात श्रीरामलल्ला विराजमान होणार आहेत. हा स्वर्गीय सोहळा याची देही याची डोळा पाहण्यासाठी जगभरातील हिंदूंची उत्सुकता शिगेला पोहोचली आहे. सध्याचा पिढीचे खरोखर अहोभाग्य आहे कि हा अद्वितीय सोहळा त्यांना पाहायला मिळणार अनुभवायला मिळणार आहे. या सोनेरी क्षणाचे सर्वांना साक्षीदार होता येणार आहे.
२२ जानेवारीला अयोध्येत होणाऱ्या अभूतपूर्व सोहळयाचे वेध जगभरातील रामभक्तांना लागले आहेत, त्यामुळे आतापासूनच सर्वत्रचे वातावरण राममय होऊ लागले आहे. सध्या तरुणवर्गाच्या स्टेटसला विविध रिल्सच्या माध्यमातून अयोध्येतील श्रीराममंदिराचेच दर्शन प्रतिदिन घडत आहे. मोबाईलच्या रिंगटोन, कॉलर ट्यून सुद्धा श्रीरामप्रभुंच्या स्वागताच्या च ठेवल्या जात आहेत. बाजारात श्रीरामप्रभूंचे चित्र असलेले ती शर्ट, भगवे ध्वज विक्रीसाठी आले आहेत. शोभेच्या आणि भेट वस्तूंच्या दुकानात श्रीरामप्रभुंची छायाचित्रे, मुर्त्या आणि श्री राम मंदिराची प्रतिकृती दर्शनी भागांत विक्रीसाठी ठेवण्यात आली आहेत. ठिकठिकाणी काढण्यात येणाऱ्या अक्षत कळस यात्रांतून श्रीरामभक्तांचा सळसळता उत्साह दिसून येत आहे. अयोध्येतील दिव्य सोहळ्याची निमंत्रणे वाटली जाऊ लागली आहेत.
घरोघरी अक्षतांचे वाटप होऊ लागले आहे. २२ जानेवारीला अयोध्येत न येता श्रीरामभक्तांनी घरोघरी दीप लावून दिवाळी साजरी करण्याचे आवाहन करताना माननीय पंतप्रधानांनी ‘श्रीरामाला त्रास होईल,असे काही करू नका’ असे भावनिक आवाहन सुद्धा केल्याने श्रीरामाचे स्वागत घरोघरी करण्याचा निर्णय देशवासीयांनी घेतला आहे. प्राणप्रतिष्ठापना सोहळ्याचे निमंत्रण कोणाला मिळाले तर कोणाला मिळाले नाही यावरून काही काळ राज्यात मानापमान नाट्य गाजले असले, तरी श्रीरामप्रभुंच्या स्वागतामध्ये कसला आलाय मान आणि कसला अपमान हे लक्षात घेऊन हा वादही आता शमू लागलाआहे. श्रीराम प्रतिष्ठापनेवरून राजकारण केले जात असल्याच्या आरोप काही राजकीय मंडळींकडून केला जात असला तरी सामान्य श्रीरामभक्तांना याचेही काही देणेघेणे नाही. समस्त भारतभूमीचे आराध्य दैवत प्रभुराम केवळ अयोध्येत नव्हे, तर संपूर्ण भारतभूमीत, प्रत्येकाच्या घरात आणि आणि प्रत्येकाच्या हृदय मंदिरात येणार आहेत या भावाने आज सर्वत्र सिद्धता सुरु आहे. काही ठिकाणी मंदिरांत हा सोहळा सार्वजनिकरित्या साजरा केला जाणार आहे, तर काही मंडळांनी श्री रामनवमी प्रमाणे हा महोत्सवही धुमधडाक्यात साजरा करण्याची तयारी केली आहे.
रावणवध केल्यानंतर वनवास संपवून प्रभू श्रीरामचंद्र जेव्हा अयोध्या नगरीत परतले, तेव्हा अयोध्या नगरीतील समस्त नागरिकांनी दारी तोरणे बांधली, दारासमोर रांगोळ्या काढल्या, गुढ्या उभारल्या, सर्वत्र दीप प्रज्वलित केले. सारी अयोध्या नगरी तेव्हा नव्या नवरीप्रमाणे नटली होती. साडेपाचशे वर्षाच्या वनवासानंतर श्रीरामप्रभूंचे पुनश्च आगमन होत आहे या भावाने देशभरातील श्रीरामभक्त घरोघरी श्रीरामाच्या स्वागताची तयारी करत आहेत. ज्यामध्ये घरातील बच्चे कंपनीही उत्साहाने सहभागी होत आहेत. २२ जानेवारीला सार्वजनिक सुट्टी जाहीर करावी अशी मागणी काही सरकारमधील आमदारांकडूनच करण्यात येत आहे. प्रत्यक्षात या दिवशी सुट्टी मिळेल कि नाही माहित नाही; मात्र विविध खासगी कंपन्या आणि कार्यालयांनीही बैठका घेऊन श्रीरामाच्या स्वागतासाठी कामाच्या ठिकाणीच उत्सव साजरा करण्याच्या दृष्टीने नियोजन केले आहे. कंपन्यांचे मालक स्वतः त्यामध्ये हिरीरीने सहभागी होत आहेत. श्रीरामप्रभुंच्या स्वागतार्थ मकर संक्रांतीपासून म्हणजे १४ तारखेपासून विशेष स्वच्छता मोहीम राबवून देशभरातील मंदिरे स्वच्छ करण्याचे आवाहन पंतप्रधान मोदींनी केले आहे. त्यादृष्टीनेही मंदिर विश्वस्त आणि भक्त मंडळींनी नियोजन केले असून १४ तारखेपासून हे अभियान देशभर राबवले जाणार आहे. त्यानिमित्ताने सर्वत्र चैतन्याचे वातावरण निर्माण होणार आहे.
प्रभू श्रीरामांची उच्च कोटीची भक्त शबरी हिला जेव्हा तिच्या गुरूंनी तुझा उद्धार करायला स्वतः श्रीरामप्रभू येणार आहेत असे सांगितले त्या क्षणापासून तिने श्रीरामाच्या स्वागताची तयारी सुरु केली. त्यासाठी प्रतिदिन ती आश्रमाची, आश्रमात येण्याच्या मार्गाची झाडलोट करत असे. ज्या मार्गावरून श्रीराम येणार आहेत त्या मार्गावर फुलांचा गालिचा घालत असे. श्री रामासाठी आसन आणि त्यांच्या पाद्यपूजेची सिद्धता करत असे. त्यांच्या नैवेद्यासाठी भोजन तयार करत असे. रात्री भगवंत आले, तर त्यांच्याशी माझी भेट होणार नाही या भीतीने ती रात्रभर झोपेतही नसे. असा तिचा दिनक्रम वर्षोनुवर्षे चालू होता.
प्रतिदिन अशी तयारी करता करता वार्धक्य कधी आले तिला कळलेही नाही. अखेर तिच्या परीक्षेचा काळ संपला, दारात श्री विष्णूंचा अवतार प्रगटला. सुटले बांध प्रतिक्षेचे. मिलन झाले भगवंताचे. अश्रूंनी केले पाद्यपूजन श्रीप्रभूंचे, रामानेही ओळखले भाव तिच्या अंतरीचे. खाल्ली उष्टी बोरे ती प्रेमाची, साक्ष दिली आपल्या अवतारत्वाची. जेव्हा तुम्ही संपूर्ण शरणागतीने भगवंताच्या भक्तीत लीन होता, जेव्हा त्याला आपले सर्वस्व अर्पण करता तेव्हा त्या जगनियंत्या भगवंतालाही आपले आसन सोडून तुमच्यासाठी यावेच लागते. येत्या २२ जानेवारीला प्रभूश्रीरामांना शबरीच्या भावाने आळवूया. श्री रामभक्तानी साडेपाचशे वर्षांपासून विविध माध्यमातून केलेल्या भक्ती रुपी प्रयत्नांना अखेर यश आले आणि बघता बघता श्रीरामजन्मभूमीत श्रीरामाचे भव्य मंदिर उभे राहिले. २२ जानेवारीला साक्षात श्रीराम आपल्या घरी, जवळच्या मंदिरात, मंडळातील उत्सवात येणार आहेत हा भाव ठेवूनच सर्व सिद्धता करूया.
भगवंत हा भावाचा भुकेला असतो. त्याला अवडंबरापेक्षा अधिक प्रिय असते ते भक्ताचे निर्मल मन. भगवंताच्या चरणी पुष्प वाहताना आपण जसे ते नीट निरखून आणि स्वच्छ करून वाहतो, तसे श्रीरामाचे स्वागत करताना आपले मन स्वच्छ आणि निर्मल करण्याचा प्रयत्न करूया. त्यासाठी २२ जानेवारीच्या दिवशी ‘श्रीराम जय राम जय जय राम’ हा श्रीरामांचा नामजप अधिकाधिक भावपूर्ण रीतीने करूया. श्री रामरक्षा स्तोत्राचे पठण करूया. श्रीरामाच्या अथवा घरातील देवतेच्या प्रतिमेचे पूजन करताना आपल्यासमोर साक्षात श्रीरामप्रभू विराजमान आहेत आणि आपण त्यांचे पाद्यपूजन करत आहोत या भावाने पूजन करूया. आपल्या ऐपतीप्रमाणे भगवंताला मिष्टान्नांचा नैवेद्य अर्पण करूया. दारासमोर रांगोळी काढूया, दिवाळीप्रमाणे दारात पणत्या लावूया. श्रीरामप्रभुंच्या स्वागताची सिद्धता सर्व कुटुंबियांना सहभागी करून करूया. एक दिवसाकरिता का होईना रामराज्याचा प्रत्यक्ष अनुभव घेऊया आणि पृथ्वीतलावर रामराज्य आणण्यासाठी श्रीरामप्रभूंच्या चरणी शरणागत होऊन प्रार्थना करूया !
जगन घाणेकर, घाटकोपर, मुंबई
संपर्क क्रमांक : ९६६४५५९७८०