जत : फेब्रुवारी संपत आला, तरी ग्रामपंचायतींची करवसुली अद्याप पन्नास- साठ टक्क्यांतच घुटमळत आहे. वसुलीसाठी महिनाभराचाच कालावधी हातात आहे. त्यामुळे ग्रामपंचायतींनी वसुली मोहीम तीव्र केली आहे. महिनाभरात उर्वरित कोट्यावधी रुपयांच्या करवसुलीचे आव्हान पेलावे लागणार आहे.
ग्रामपंचायतींकडून ग्रामस्थांना विविध सुविधा पुरविल्या जातात. त्या बदल्यात घरपट्टी व पाणीपट्टीच्या रुपाने ग्रामपंचायतीला कर भरावा लागतो. मात्र, ग्रामस्थांकडून कर भरण्यास टाळाटाळ केली जात असल्याचे चित्र नेहमी पाहायला मिळते. यंदाही वेगळी परिस्थिती नाही.
करवसुलीसाठी मार्च महिनाच शिल्लक आहे. या महिनाभरात उर्वरित रकमेच्या वसुलीचे आव्हान ग्रामपंचायतींना पेलावे लागणार आहे.
त्यादृष्टीने वसुलीची मोहीम तीव्र करण्यात आली आहे.कर्मचाऱ्यांकडून घरोघरी फिरून कर भरण्यासाठी पाठपुरावा केला जात आहे. कराचा भरणा केल्याशिवाय दाखले मिळणार नाहीत, अशा स्पष्ट सूचना केल्या जात आहेत. शिल्लक खातेदार हे करभरणा करण्यास टाळाटाळ करणारेच आहेत. त्यामुळे त्यांच्याकडून करवसुली करणे जिकिरीचे काम आहे.