सांगली : सांगली लोकसभा मतदारसंघातून काँग्रेसची उमेदवारी विशाल पाटील यांना मिळावी या करीता आम्हा सर्वांची भावना आजही आहे. महाविकास आघाडीने घेतलेल्या निर्णयाचा धक्का आम्हा सर्वांनाच बसलेला आहे. या निर्णयाचा फेरविचार करावा आणि काँग्रेसची उमेदवार विशाल पाटील यांना द्यावी असा प्रस्ताव आमचे नेते आमदार विश्वजीत कदम यांनी वरिष्ठांना दिला आहे. सांगलीची हक्काची जागा काँग्रेस कडेच राहावी यासाठी आम्ही सर्वच जिल्हातील नेत्यांनी प्रयत्नाची परकष्टा केली आजही आम्ही प्रयत्न सोडले नाहीत अशा परिस्थितीत काँग्रेसच्या कार्यकर्त्यांनी संयम बाळगणे गरजेचे आहे.
आपल्या मनात कितीही संतापाची भावना असली तरी जिल्हा काँग्रेस कमिटीच्या बोर्डावरील काँग्रेस या शब्दाला रंग फासण्याची कृती कदापी समर्थन करण्यासारखी नाही. गेल्या 75 वर्षात काँग्रेसच्या अनेक विजयाची ही इमारत साक्षीदार आहे. काँग्रेस हा शब्द तिथे सन्मानाने मिरवत आला आहे. तो केवळ एका शब्दाचा नव्हे तर संपूर्ण काँग्रेसही विचाराचा अपमान ठरेल. त्यामुळे कोणतीही कृती करताना कार्यकर्त्यांनी संयम ढळू देऊ नये.