जत : उन्हाच्या झळा भाजीपाला बाजारात जाणवत आहेत.फळभाज्यांची आवक हळूहळू मंदावताना दिसत असून, मागणी कमी असल्याने दरावर काहीच परिणाम झाला नाही. वांग्याचे दर मात्र कडाडत आहेत. किलोला ३० ते ४० रुपयांची कमालीची वाढ झाली आहे. चटणीच्या हंगामामुळे लसणाला मागणी जोमात आहे. दरात ३० ते ५० रुपयांची वाढ झाली आहे. कोथिंबीरसह अन्य भाज्यांची स्थानिक आवक ठप्प झाल्याने लातूर, कर्नाटक भागांतून बाजार समितीत आवक जास्त आहे.
थंड प्रदेशातील बारमाही गाजराची विक्री वाढली आहे. फळबाजारात आंबा, कलिंगड वगळता इतर फळांची फारशी आवक नाही. दीड महिना आधीच केसर आंबाही दाखल झाला आहे. आंध्रप्रदेशातून तोतापुरी आंब्याची आवक चांगली आहे. फूलबाजारात मागणीनुसार फुलांना दर मिळत आहे. झेंडूचे दर कमी झाले आहेत. खाद्यतेल बाजारात सरकी, सोयाबीन, सूर्यफुलाच्या दरात दिलासादायक घसरण झाली आहे. हरभरा डाळीच्या दरात पुन्हा वाढ झाली आहे. मंदीतही डाळींचे दर वाढत असल्याचे धान्य व्यापाऱ्यांनी सांगितले.
कोकणी तुटवडा, कर्नाटकी फुल्ल
शहरात जिकडे-तिकडे विक्रीला आंबेच दिसत आहेत. काही मोजक्या विक्रेत्यांकडे कोकणातील देवगड, रत्नागिरी असा हापूस विक्रीला आहे, तर ठिकठिकाणी विक्रेत्यांकडे मोठ्या प्रमाणात कर्नाटकी हापूस विक्रीला आहे. सध्या कोकणी हापूस आंब्याचा काहीसा तुटवडा असून, दर चढे आहेत. त्यातुलनेत आवक मोठी असल्याने कर्नाटकातील हापूसचे दर कमी आहेत.