लहानपणी शाळेत मराठी व्याकरण शिकवले जात असे ज्यामध्ये सामान्य नाम आणि विशेष नाम असे नामाचे दोन प्रकार सांगितले जात. एकाच जातीच्या पदार्थातील समान गुणधर्मामुळे त्या वस्तूला मिळालेले नाव म्हणजे सामान्य नाम तर एकाच जातीच्या विशिष्ट व्यक्तीचा, प्राण्याचा किंवा वस्तूचा बोध करते त्या नावाला विशेष नाम असे म्हणतात. ही झाली व्याकरणातील व्याख्या. दैनंदिन जीवनात व्यवहारात उपयोगी पडणारी काही अशी विशेष नाम आहेत जी त्यांच्यातील गुणवत्तेमुळे आणि ग्राहकांच्या पसंतीमुळे सामान्य नाम बनून आज लोकांच्या ओठी रुजली आहेत. उदाहरणच द्यायचे तर ग्रामिण भागात (काही शहरी भागांतसुद्धा) अंगाचा साबण हवा असेल तर ‘लाईफबॉय द्या’ अशी मागणी ग्राहकांकडून केली जाते, अर्थात दुकानदाराला हे ज्ञात असल्याने तो ग्राहकांना त्याच्याकडे असलेला कोणताही अंगाचा साबण ग्राहकाला देतो आणि ग्राहकही तो आनंदाने स्वीकारतो. अशाच प्रकारे टूथपेस्ट म्हणून ‘कोलगेट’ मागितली जाते, भांड्यांचा साबण म्हणून ‘विम बार’ मागितला जातो.
याच विशेष नामांतून सामान्य नाम झालेल्या उत्पादनांच्या यादीत आणखी एक नाव येते ते ‘बिस्लेरी’चे. बिस्लेरी कंपनीने १९८४ मध्ये सर्वप्रथम सीलबंद फिल्टर्ड पाण्याची प्लास्टिक बाटली विक्रीसाठी आणली तेव्हा कोणाला वाटलेही नव्हते कि पाणी बाटल्यांत भरून विकण्याची संकल्पना भविष्यात जनसामान्यांत इतकी रुजेल की त्याहून जगणे मुश्किल होऊन जाईल. आज सीलबंद बाटल्यांची लोकांना इतकी सवय जडली आहे की बाहेर उपहारगृहात जेवताना किंवा काही अन्नपदार्थ खाताना उघड्यावरील विनामूल्य पाणी पिऊन पोटाला त्रास करून घेण्याऐवजी लोक २० रुपयांची एक लिटरची सीलबंद पाण्याची बाटली विकत घेणे पसंत करतात. पूर्वी प्रवासाला जाताना लोक घरातून पाण्याचे कॅन अथवा बाटल्या भरून घेऊन जात. आता असा त्रास कोणी करताना दिसत नाही. हल्ली स्थानकांवरच नव्हे तर तर चालत्या ट्रेनमध्ये आणि बसमध्येही थंडगार फिल्टर पाण्याची बाटली सहज उपलब्ध होऊ लागली आहे. सध्या उन्हाळ्याचे दिवस सुरु आहेत.
गेल्या काही दिवसांत उन्हाचा तडाखा प्रचंड वाढला आहे. शरीरातून घामावाटे जाणाऱ्या पाण्याची कमतरता भरून काढण्यासाठी लोक सीलबंद पाणी मोठ्या प्रमाणात विकत घेऊ लागले आहेत. आजमितीला केवळ शीतपेयाच्या दुकानांत किंवा उपहारगृहांतच नव्हे तर महामार्गाच्या ठिकाणी पानाच्या टपरीवर, फळांच्या आणि भाज्यांच्या दुकानांतूनही सीलबंद पाण्याच्या बाटल्या विकल्या जाऊ लागल्या आहेत. उन्हाने जीव कासावीस झालेला असताना या थंडगार सिंलबंद पाण्याचा एक घोट जरी घशाखाली उतरला तरी स्वर्गीय सुखाचा अनुभव येतो.
सीलबंद पाण्याच्या वाढत्या मागणीमुळे सीलबंद पाणी विकणाऱ्या कंपन्याही गावोगावी तयार होऊ लागल्या आहेत. पारदर्शक प्लास्टिक बाटलीत पाणी भरून त्यावर सील असलेले बूच लावले आणि त्यावर कंपनीचे लेबल चिकटवले कि ती बाटली २० रुपयांना कोणीही विकत घेतात. ज्या बिस्लेरी कंपनीने या सीलबंद पाण्याची संकल्पना लोकांमध्ये रुजवली त्या बिस्लेरी पाण्याच्या बाटल्या आज पाहायला मिळणेही दुरापास्त झाले आहे. बिस्लेरी मागितल्यावर आज दुकानदाराकडून सीलबंद पाण्याची कोणत्याही कंपनीची बाटली हाती थोपवली जाते. या सर्वच कंपन्या शासनमान्य असतात का ? यांच्या पाण्याची गुणवत्ता शासनाच्या अन्न आणि औषध विभागाने तपासलेली असते का ? यांच्याकडे त्याबाबतचे प्रमाणपत्र असते का ? एसटीने प्रवास करताना दर दोन गावांच्या नंतर वेगळ्या कंपनीची सीलबंद पाण्याची बाटली पाहायला मिळते. लांबच्या प्रवासात रेल्वे डब्यात पाण्याच्या बाटल्या विकणाऱ्यांकडेही अशाच वेगवेगळ्या कंपन्यांच्या पाण्याच्या बाटल्या दिसून येतात.
यामध्ये भरले गेलेले पाणी शासनाने नेमून दिलेल्या कार्यपद्धतीनुसार शुद्ध केलेले असते का ? आज भ्रष्टाचार दिल्लीपासून गल्लीपर्यंत मुरला आहे. सीलबंद पाण्याच्या बाटल्या बनवणाऱ्या कंपन्या याबाबतीत मागे राहतील का ? ग्राहकांकडून घेतलेल्या २० रुपयांच्या मोबदल्यात त्यांना दिले जाणारे पाणी शुद्ध नसेल, तर ती केवळ ग्राहकाची फसवणूकच नव्हे, तर ग्राहकाच्या आरोग्यालाही अपायकारक ठरू शकते. सध्याच्या उन्हाळ्याच्या दिवसांत तहान लागल्यावर आपण जवळपास कुठे थंड पाण्याची बाटली विकत मिळते का ते शोधू लागतो. मिळाल्यावर ती कुठल्या कंपनीची आहे, त्या बाटलीवरील लेबलवर ट्रेडमार्क आहे का ? पाणी विकणारी कंपनी शासनमान्य आहे का याबाबत कोणतीही खात्री न करता आपण तिचे बूच उघडून ती तोंडाला लावतो, हे आपण जागरूक ग्राहक नसल्याचेच लक्षण आहे. आरोग्य राखण्यासाठी घेतलेली पाण्याची बाटली आरोग्य बिघडवणारी ठरू नये यासाठी प्रत्येकाने सतर्क राहायला हवे. दिवाळी जवळ आली कि शासनाच्या अन्न आणि औषध प्रशासन विभागाचे अधिकारी ठिकठिकाणी मिठाईच्या उत्पादकांवर धाडी मारून माव्याची तपासणी करतात. नकली मावा तयार करणाऱ्यांवर कारवाई करतात अशाच प्रकारची तपासणी उन्हाळयाच्या दिवसांत सीलबंद पाणी विकणाऱ्या कंपन्यांच्या कारखान्यांमध्येही करायला हवी !
जगन घाणेकर, घाटकोपर, मुंबई
संपर्क : ९६६४५५९७८०