… संधी अजूनही आहे !

0
Rate Card

            महाराष्ट्र राज्यात पाचव्या टप्प्यातले मतदान दि.20 मे, 2024 रोजी पार पडणार आहे. निवडणूक प्रक्रियेचा केंद्रबिंदू म्हणजे मतदार. मतदान करण्यासाठी पात्र असलेला आणि मतदानाची इच्छा असलेला कोणीही मतदार मतदानापासून वंचित राहू नये. हयासाठीची  सर्वात महत्वाची गोष्ट म्हणजे मतदार यादीत नाव असायला पाहिजे. आपण राहतो तिथल्या मतदार यादीत आपले नाव आहे की नाही, हे तपासण्यासाठी उत्तम सुविधा उपलब्ध आहे. त्याचा वापर करुन प्रत्येकच मतदाराने आपले नाव मतदार यादीत असल्याची खात्री करायला हवी. आपल्याला मतदानासाठी कोणत्या ठिकाणी जावे लागेल, ते सुध्दा पाहून ठेवावे. म्हणजे मग ऐन वेळेची धावपळ होणार नाही.

दि.20 मे, 2024 रोजी मतदान होणार असलेले मतदारसंघ

१)    मतदार संघ क्र.2 – धुळे

२)    मतदार संघ क्र.20- दिंडोरी

३)    मतदार संघ क्र.21 – नाशिक

४)    मतदार संघ क्र.22-पालघर

५)    मतदार संघ क्र.23-भिवंडी

६)    मतदार संघ क्र.24- कल्याण

७)    मतदार संघ क्र.25-ठाणे

८)    मतदार संघ क्र. 26- मुंबई उत्तर

९)    मतदार संघ क्र.27- मुंबई उत्तर-पश्चिम

१०)  मतदार संघ क्र.28- मुंबई उत्तर- पूर्व

११)  मतदार संघ क्र.29- मुंबई उत्तर- मध्य

१२)  मतदार संघ क्र. 30- मुंबई दक्षिण- मध्य

१३)  मतदार संघ क्र.31- मुंबई दक्षिण

            निवडणुकीच्या प्रत्येक टप्प्यावर नामांकनाच्या अखेरच्या दिवसाच्या साधारण 10 दिवस आधीपर्यंत मतदार नोंदणीसाठी आलेले अर्ज हे मतदार यादीत नाव येण्याच्या दृष्टीने विचारात घेतले जातात. या अर्जांची आणि पुरावा म्हणून जोडलेल्या दस्तऐवजांची पडताळणी करण्याच्या दृष्टीनेच हा साधारण 10 दिवसांचा कालावधी गृहीत धरला गेला आहे.

             पाचव्या टप्प्यात निवडणुकीत या मतदारसंघासाठी नामनिर्देशन सादर करण्याची अखेरची तारीख 3 मे, 2024 आहे. त्यानुसार या मतदारसंघांमधील पात्र नागरिकांनी म्हणजेच मतदार नोंदणीसाठीची अर्हता दिनांक असलेल्या 1 एप्रिल, 2024 रोजीपर्यंत वयाची 18 वर्षे पूर्ण केलेल्या आणि भारतीय नागरिक असलेल्या व्यक्तींनी मतदार नोंदणीसाठी 22 एप्रिल, 2024 पर्यंत केलेले अर्ज मतदार यादीत नाव येण्याच्या दृष्टीने कार्यवाहीसाठी ग्राहय धरले जाऊ शकतील. अशावेळी सर्व पात्र नागरिकांनी उपलब्ध  कालावधीचा लाभ घेण्याकरिता मतदार यादीत आपले नाव तपासून घेणे आवश्यक आहे. मतदार यादीत नाव तपासताना आपले नाव त्यामध्ये नाही, हे लक्षात आल्यावर दि.22 एप्रिल, 2024 पर्यंत ऑनलाईन किंवा ऑफलाईन पध्दतीने  अर्ज केला पाहिजे.

मतदार यादीत नाव कसे तपासावे

voters.eci.gov.in  हे संकेतस्थळ किंवा Voter Helpline  ॲपचा वापर करुन मतदार यादीत आपले नाव शोधा.

१)    वैयक्तिक तपशीलाच्या पर्यायाअंतर्गत नाव, आडनाव, वडील किंवा पतीचं नाव, वय, लिंग, राज्य, जिल्हा आणि विधानसभा मतदारसंघ या तपशिलाआधारे

                               किंवा

२)     मतदार ओळखपत्र क्रमांक असेल तर त्याआधारे

                               किंवा

३)    मतदार ओळखपत्र क्रमांकासोबत मोबाईल क्रमांक जोडला असेल तर त्याआधारे

                               किंवा

४)     Voter Helpline App  वर मतदार ओळखपत्र क्रमांकावरील किंवा क्यू आर कोडद्वारे

            मतदार नोंदणीसाठी अर्ज करण्याच्या दोन पध्दती आहेत. ऑनलाईन आणि ऑफलाईन – सोईप्रमाणे कोणतीही एक पध्दत वापरली तरी चालेल-

            ऑनलाईन पध्दतीने अर्ज करण्यासाठी voters.eci.gov.in  हे संकेतस्थळ किंवा Voter Helpline   ॲपचा वापर करुन मतदार नोंदणीचा अर्ज भरता येतो. त्यासाठी युजरनेम पासवर्ड तयार करावा लागेल आणि  त्यासाठीच्या सूचना स्क्रीनवर दिसतीलच.

            आपल्या सर्वसाधारण निवासी पत्त्यानुसार आपला विधानसभा मतदारसंघ, जिल्हा आणि राज्य हा तपशील देण्यासाठी ड्रॉपडाऊन मेन्यू उपलब्ध आहे. आपले नाव, लिंग, जन्मतारीख किंवा वय, दिव्यांगत्व, मोबाईल क्रमांक आणि ईमेल (स्वत:चा  किंवा नातेवाईकांचा) यासंबंधीचे वैयक्तिक तपशील भरल्यावर आपल्या सर्वसाधारण निवासाच्या पत्त्याचे तपशिल भरा. आपले छायाचित्र तसेच वय आणि सर्वसाधारण निवासाचा स्वत:ची स्वाक्षरी असलेला पुरावा जोडा, त्यासाठी फाईल अपलोड सुविधा उपलब्ध आहे.

            अर्ज दाखल केल्यावर मिळालेला संदर्भ क्रमांक वापरुन वेळोवेळी आपल्या अर्जाची स्थितीगती जाणून घ्या, थोडक्यात आपल्या अर्जाचे  तुम्ही ट्रॅकींग करु शकता.

ऑफलाईन पध्दतीने अर्ज करण्यासाठी आपल्या  जवळच्या मतदार नोंदणी  कार्यालयात जावे लागेल. आपले छायाचित्र, तसेच वय आणि सर्वसाधारण निवासाचा स्वत:ची स्वाक्षरी असलेल्या पुराव्यासह अर्ज  तिथे सादर करावा लागेल. आपल्या मतदार संघातल्या मतदार नोंदणी कार्यालयाचा तपशील ceo Maharashtra  हया वेबसाईटवर उपलब्ध आहे.

मतदार नोंदणी अर्जासोबतच वयाचा पुरावा म्हणून खाली नमूद दस्तऐवजांपैकी कोणताही एक दस्तऐवज जोडता येईल.

१)    जन्माचा दाखला

२)    भारतीय पासपोर्ट

३)    पॅन कार्ड

४)    ड्रायव्हिंग लायसन्स

५)    आधार कार्ड

६)    दहावी किंवा बारावीचे निकालपत्र

            मतदार म्हणून नोंद करण्यासाठी 18 वर्षाच्या वरती वय असणे  आवश्यक आहे. हया निवडणुकीसाठी 1 एप्रिल, 2024 पर्यंत वयाची 18 वर्षे पूर्ण केलेल्या नागरिकांना मतदानाची संधी मिळू शकते. म्हणजे, हया 1 एप्रिलला वयाची 18 वर्षे पूर्ण झालेला नवमतदार मतदान करु शकतो आणि  आपल्या पहिल्या वहिल्या मतदानाचा आनंद मिळवू शकतो.  “मी मतदान केले” असे  अभिमानाने सांगू शकतो.

मतदार नोंदणी अर्जासोबतच सर्वसाधारण निवासाचा पुरावा म्हणून खाली नमूद दस्तऐवजांपैकी  कोणताही एक दस्तऐवज जोडता येईल.

१)    भारतीय पासपोर्ट,

२)    आधारकार्ड,

३)    राष्ट्रीय,  श्येडयुल्ड बँक किंवा टपाल विभागाचे खात्याचे चालू पासबुक

४)    पाणी, वीज तसेच स्वयंपाकाच्या गॅस जोडणीचे किमान एका वर्षाच्या आतील देयक,

५)    नोंदणीकृत भाडे करार,

६)    नोंदणीकृत विक्री करार

*आपल्याकडे यापैकी कोणतेही दस्तऐवज नसतील तर वय किंवा पत्त्याचा पुरावा म्हणून तुमच्याकडे उपलब्ध असलेला कोणताही दस्तऐवज देता येईल.

 

            निवासाचा पुरावा महत्वाचा ठरतो कारण त्यावर कोणत्या मतदारसंघाच्या कोणत्या भागामध्ये मतदार म्हणून नावाची नोंदणी होणार, ते ठरते.  बेघर, देहव्यवसाय करणारे किंवा तृतीयपंथी या प्रवर्गातील अर्जदाराकडे वय किंवा रहिवासाचा पुरावा म्हणून कोणताच दस्तऐवज नसेल, तर असे अर्जदार पुरावा म्हणून स्वत: स्वाक्षरी केलेलं स्व-घोषणापत्र देऊ शकतात. भारत निवडणूक आयोगाने हया समाजघटकांचा विशेष विचार करुन ही सूट दिलेली आहे.

            जर अर्जदाराकडे, वय आणि सर्वसाधारण निवासाचा पुरावा यापैकी कोणताही दस्तऐवज नसेल, तर ते त्यांच्याकडे वय आणि सर्वसाधारण निवासाचा पुरावा म्हणून उपलब्ध असलेला इतर दस्तऐवजही देऊ शकतात.

            voters.eci.gov.in   हे संकेतस्थळ तसेच Voter Helpline  या ॲपवरुन मतदार नोंदणीचा अर्ज क्र.6 कसा भरावा, मतदार यादीत नाव कसे तपासायचे याचे मार्गदर्शनपर व्हिडिओ मुख्य निवडणुक अधिकारी कार्यालयाच्या  (ceo Maharashtra) युटयूब वाहिनीवर आणि  सर्व समाजमाध्यमांवर उपलब्ध आहेत. उत्साही मतदारांनी जरुर तेथून मार्गदर्शन घ्यावे.

            भारतीय राज्यघटनेने प्रौढ मताधिकाराचे अनमोल देणे आपल्या सगळयांना दिलेले आहे. आपल्या देशाची व्यवस्था आणि भविष्य हयाबाबत निर्णय घेण्याची संधी उपलब्ध करुन दिली आहे.  मतदार यादीमध्ये नाव आहे की नाही, हे तपासण्यासाठी भारत निवडणुक आयोगाने चालू काळाला अनुसरुन तंत्रज्ञानाच्या आधारे सुंदर सुविधा उपलब्ध करुन दिली आहे.  मतदानाच्या दिवशी एखादया मतदान केंद्रावर जाऊन आपले नाव मतदार यादीमध्ये नसल्याचा साक्षात्कार होणे सजग नागरिकाला शोभणारे नाही. आधीच मतदार यादीतले आपले नाव आणि मतदान केंद्र पाहून ठेवणे सहज शक्य आहे. जाणतेपणाचे ते लक्षण आहे. मतदानाच्या दिवशी आपले मतदान केंद्र शोधत सैरावैरा फिरणारे तांडे आणि त्यांच्या यंत्रणेवर पडणारा ताण ह्याची मुळी आवश्यकताच नाही.  मतदान करण्यास पात्र असूनही आपले नाव मतदार यादीत नसेल तर ही बाब भारतीय  नागरिक म्हणूवन घेणाऱ्याला नामुष्कीची वाटायला हवी. मतदार यादीत नाव असूनही मतदानाचा हक्क न बजावणाऱ्या नागरिकांबद्दल काय बोलावे ? स्वत:चे इतर सारे हक्क गाजवायला सतत उत्सुक असा हा वर्ग हया महत्वाच्या हक्क-कर्तव्याला कसा विसरतो ? स्वत:ला आणि आजूबाजूच्या मतदारांना “मतदान करायचे आहे”, अशी आठवण करुन देण्याइतकी सोपी गोष्ट आपल्या साऱ्यांनाच  करता येईल. प्रगल्भ लोकशाहीच्या वाटचालीतले ते एक छोटेसे पाऊल असेल.

– डॉ.किरण कुलकर्णी,

                                                                                      अतिरिक्त मुख्य निवडणूक अधिकारी,

  महाराष्ट्र राज्य.

000

 

 

 

अजूनही मतदार यादीत नाव समाविष्ट करण्याची संधी

            मुंबई, दि. २० : निवडणूक काळात प्रत्येक टप्प्यावर नामांकनाच्या अखेरच्या दिवसाच्या साधारण १० दिवस आधीपर्यंत मतदार नोंदणीसाठी आलेले अर्ज हे मतदार यादीत नाव समाविष्ट करण्याच्या दृष्टीने विचारात घेतले जातात. या अर्जांची आणि पुरावा म्हणून जोडलेल्या दस्तऐवजांची पडताळणी करण्यासाठी व हरकती मागवण्यासाठी हा साधारण १० दिवसांचा कालावधी गृहीत धरला गेला आहे.

            राज्यात पाचव्या टप्प्यात  दि. २० मे रोजी  धुळे, दिंडोरी, नाशिक, पालघर, भिवंडी, कल्याण, ठाणे, मुंबई उत्तर, मुंबई उत्तर-पश्चिम, मुंबई उत्तर-पूर्व, मुंबई उत्तर- मध्य, मुंबई दक्षिण- मध्य आणि  मुंबई दक्षिण या १३ मतदारसंघांसाठी मतदान होणार आहे. या मतदारसंघांसाठी नामनिर्देशन सादर करण्याची अखेरची तारीख ३ मे २०२४ आहे.

            त्यानुसार, या लोकसभा मतदार संघातील ज्या पात्र नागरिकांनी दि. १ एप्रिल २०२४ रोजीपर्यंत आपल्या वयाची १८ वर्षे पूर्ण केलेली असतील व त्यांचे नाव अद्याप मतदार यादीत समाविष्ट झालेले नसेल, अशा नागरिकांनी या मतदारसंघामध्ये नवीन मतदार नोंदणीसाठी दि. २२ एप्रिल २०२४ पर्यंत अर्ज केल्यास (ऑफलाइन तसेच ऑनलाइन पद्धतीने) त्यांची नावे मतदार यादीत (अन्यथा पात्र असल्यास) समाविष्ट होऊ शकतील. यामुळे सर्व पात्र नागरिकांनी मतदार यादीत आपले नाव आहे की नाही, हे तपासून, जर नाव नसल्यास त्वरीत दि. २२ एप्रिल २०२४ पर्यंत मतदार नोंदणीचा अर्ज क्र. ६ भरावा, असे आवाहन राज्याचे मुख्य निवडणूक अधिकारी यांच्याकडून करण्यात आले आहे.

Ø  मतदार यादीत नाव कसे तपासावे

voters.eci.gov.in हे संकेतस्थळ किंवा Voter Helpline अॅपचा वापर करून मतदार यादीत आपले नाव शोधा

वैयक्तिक तपशिलाच्या पर्यायांतर्गत नाव, आडनाव, वडील किंवा पतीचं नाव, वय, लिंग, राज्य, जिल्हा आणि विधानसभा मतदारसंघ या तपशिलाच्या आधारे किंवा मतदार ओळखपत्र क्रमांकाच्या आधारे किंवा मोबाइल क्रमांकाच्या आधारे ( तो जर तुमच्या मतदार ओळखपत्राशी जोडला असेल तर) किंवा Voter Helpline App वर मतदार ओळखपत्रावरील क्यू आर कोड स्कॅन करूनही मतदार यादीत आपले नाव शोधता येते.

Ø  मतदार नोंदणीचा अर्ज कसा भरावा

अर्ज क्र. ६ – नवमतदार नोंदणी

ऑनलाइन पद्धतीने – voters.eci.gov.in हे संकेतस्थळ किंवा Voter Helpline App चा वापर करून मतदार नोंदणीचा अर्ज भरा

ऑफलाइन पद्धतीने- आपले छायाचित्र, तसेच वय आणि सर्वसाधारण निवासाच्या स्वतःची स्वाक्षरी असलेल्या पुराव्यासह आपल्या जवळच्या मतदार नोंदणी कार्यालयाला भेट द्या. अधिक तपशिलांसाठी लिंक:  https://ceoelection.maharashtra.gov.in/SearchInfo/VHCs.aspx

मतदार नोंदणीच्या अर्जासोबतच वयाचा पुरावा म्हणून जन्माचा दाखल, भारतीय पासपोर्ट, पॅन कार्ड, ड्रायव्हिंग लायसन्स, आधार कार्ड, दहावी किंवा बारावीचे निकालपत्र या दस्तऐवजांपैकी कोणताही एक दस्तऐवज जोडता येईल.

मतदार नोंदणीच्या अर्जासोबतच सर्वसाधारण निवासाचा पुरावा म्हणून भारतीय पासपोर्ट, आधारकार्ड,  राष्ट्रीय, श्येड्युल्ड बँक किंवा टपाल विभागाचे खात्याचे चालू पासबूक, पाणी, वीज तसेच स्वयंपाकाच्या गॅस जोडणीचे किमान एका वर्षाच्या आतील देयक,  नोंदणीकृत भाडे करार, नोंदणीकृत विक्री करार या दस्तऐवजांपैकी कोणताही एक दस्तऐवज जोडता येईल.

voters.eci.gov.in हे संकेतस्थळ तसेच Voter Helpline या अॅपवरून मतदार नोंदणीचा अर्ज क्र. ६ कसा भरावा, मतदार यादीत नाव कसे तपासायचे याचे मार्गदर्शनपर व्हिडिओ मुख्य निवडणूक अधिकारी कार्यालयाच्या CEO Maharashtra या युट्यूब वाहिनीवर उपलब्ध आहेत.

मुख्य निवडणूक अधिकारी कार्यालयाच्या समाजमाध्यमांचे दुवे :

फेसबूक: https://www.facebook.com/ChiefElectoralOfficerMaharashtra

युट्यूब: https://www.youtube.com/@ceomaharashtra211

इन्स्टाग्राम: https://www.instagram.com/ceo_maharashtra/

एक्स (ट्विटर): https://twitter.com/CEO_Maharashtra

निवडणूक प्रक्रियेविषयीच्या शंका किंवा प्रश्नांसाठी १८०० २२ १९५० या मतदार मदत क्रमांकावर संपर्क साधावा.

Leave A Reply

Your email address will not be published.

कॉपी करू नका.