वृक्षतोडीमुळे गावरान आंब्याची चव झाली दुर्मिळ

0
14

जत : आजी आजोबांनी लागवड केलेल्या तर कोठे नैसर्गिक उगवण झालेल्या शेतातील गावरान आमवृक्षांची मोठ्या प्रमाणावर तोड झाल्याने गावरान आंब्याच्या आमरसाची चव दुर्मिळ झाली आहे.पूर्वी ‘दादा लगाए आम और खाये पोता’ म्हणीप्रमाणे प्रत्येक गावागावांत नामांकित गावरान आमराया अस्तित्वात होत्या. प्रत्येक शेतकऱ्याच्या बांधावर लागवड केलेली तर काही नैसर्गिक उगवण झालेली गावरान आंब्याची शंभर-पन्नास झाडे उभे होते.मात्र, अलीकडील काळात शेतकऱ्यांनी झाडाखाली पिके वाढत नसल्याने गावरान आंब्याची विस्तीर्ण झाडे तोडून नवीन संकरित, कलमीकरण केलेली विविध जातीच्या आंब्याच्या झाडांची लागवड केली.


त्यामुळे ग्रामीण भागात आता गावरान आंबे दुर्मीळ झाले. क्वचितच एखाद्या ठिकाणी गावरान आंब्याचे झाड दृष्टीस पडते. परिणामी शेंद्र्या, शेप्या, खऊट, दश्या, तोतापरी आदी मौल्यवान गावरान आंब्याची सर्रासपणे सुरू झालेली वृक्षतोड आमराया दुर्मिळ होण्यास कारणीभूत ठरली. फळांचा राजा म्हणून प्रसिद्ध असलेल्या गावरान आंब्याला आता उतरती कळा लागली असून पूर्वी घराघरांमध्ये गावरान आंबे पिकविण्यासाठी लगबग असायची.घरात प्रवेश करण्यापूर्वीच पिकविण्यासाठी टाकलेल्या गावरान आंब्याच्या आढ्यांचा सुगंध जिभेस पाणी आणे. पाहुणे आल्यावर त्यांच्यासमोर बादलीभर पाणी व टोपलेभर आंबे ठेवले जात. आमरस अन् पोळी हा विशेष पाहुण्यांचा पाहूणचाराचा खास मेणू असायचा. मात्र, हे सर्व कालबाह्य झाले. शंभर-दीडशे रुपये किलोप्रमाणे आता बाजारातून आंबे खरेदी करून पाहुण्याची हौस भागवावी लागते.
नीलम, हापूस, केशरला अधिक पसंती कलमीकरण व उत्पन्नाच्या लालसेपायी गरिबांच्या खिशाला भुर्दंड सोसावा लागत आहे. पूर्वी आंबा थोडा जरी आंबट लागला की फेकून दिले जायचा. वादळी वारे आले की लहान मुले सकाळीच पिशव्या घेऊन आमरायाकडे धूम ठोकत.

काही वेळेतच पिशवीभर पाड घेऊन येत. वादळी वाऱ्यामुळे पडलेले पाडात वेगळीच मजा असे. गावागावांत सामायिक आमराया अस्तित्वात होत्या. शेतातील गावरान आंबे पिकवण्यासाठी गव्हाचे काड, भूशाचा वापर होत असे. आठ -दहा दिवसांनंतर पिकू घातलेले आंबे पिवळे धमक होऊन साखरेलाही फिके पाडेल, अशी चव चाखावयास मिळत असे. मात्र अलीकडील काळात उत्पन्नाची वाढती लालसा, वातावरणाचा बदलामुळे निसर्गाचा समतोल बिघडले. एकंदरीत आमराया दुर्मिळ झाल्याने सर्वांचा ओढा तोतापरी, निलम, हापूस, केशरकडे वाढल्याचे पाहावयास मिळते.

Team Sanket Times

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here