राज्यात हवामान बदलाचा टप्पा सुरू झाला आहे. अवकाळी पाऊस ओसरला असून सुर्यनारायणाने आपला प्रकोप दाखवायला सुरवात केली आहे. राज्यात सर्वत्र उकाडा जाणवत असून राज्यातील अनेक शहरांचे तापमान ४० अंशाचर पोहचले आहे. मागील आठवड्यापासून संपूर्ण राज्यात प्रचंड उकाडा जाणवत आहे. विदर्भ मराठवाड्यासह संपूर्ण राज्य उकाड्याने हैराण झाले आहे. दरम्यान हवामान खात्याने महाराष्ट्रासह ( कोकणचा काही भाग ) अकरा राज्यात पुढील तीन दिवस ( २० मे ) उष्णतेची लाट राहील असा अंदाज वर्तवला आहे. महाराष्ट्रासह बिहार, राजस्थान, गुजरात, पश्चिम बंगाल, पंजाब, हरियाणा, उत्तर प्रदेश, मध्यप्रदेश, ईशान्य भागातील काही राज्यात उष्णतेची लाट येण्याची शक्यता आहे. या लाटेमुळे तापमानाचा पारा ४५ ते ४६ अंशापर्यंत पोहचेल असाही अंदाज हवामान खात्याने वर्तवला आहे. महाराष्ट्रातही विदर्भ, मराठवाड्यातील तापमान ४५ अंशाच्या पुढे जाऊ शकते असाही अंदाज हवामान खात्याने वर्तवला आहे. हवामान खात्याने दिलेल्या माहितीनुसार उष्णतेची ही लाट २० तरखेनंतरही कायम राहू शकते त्यामुळे उष्णतेची तीव्रता वाढणार असून नागरिकांना उकाड्याचा सामना करावा लागणार आहे.
या महिन्या अखेर राज्यातील तापमान उच्चांकी पातळीवर पोहचेल असाही अंदाज हवामान खात्याने वर्तवला आहे. यावर्षी उन्हाळा अतिशय कडक असेल असा अंदाज हवामान खात्याने वर्तवला होता तो खरा ठरताना दिसत आहे. मे महिना तर जिकरीचा ठरत आहे. उन्हाने उच्चांक गाठला आहे. उन्हाने उच्चांक गाठला असल्याने उष्माघाताचा त्रास होऊन काही नागरिकांना आपला जीव गमवावा लागला आहे. मागील वर्षी खारघर मध्ये घडलेली दुर्दैवी घटना अजूनही ताजी आहे. राज्यातील तापमान वाढला असल्याने घराबाहेर न पडण्याचा सल्ला तज्ज्ञ देत आहेत असे असले तरी आवश्यक कामासाठी, लग्न, देवधर्म कार्यासाठी लोकांना घराबाहेर पडावेच लागते. ग्रामीण भागात कुलदैवतांच्या यात्रा सुरू झाल्या आहेत. कंदुरीचे कार्यक्रम ठिकठिकाणी सुरू आहेत. महाराष्ट्रात यात्रा महत्वाचा भाग आहे. शाळांना सुट्ट्या लागल्या आहेत. सण समारंभ साजरा करण्यासाठी, ग्राम देवतांचे दर्शन घेण्यासाठी, लग्न कार्यासाठी, नातेवाईकांची भेट घेण्यासाठी लोकांची धावपळ सुरू आहे. त्यामुळे उन्हाळ्यापासून बचाव करण्याची कसरत नागरिकांना करावी लागत आहे. उन्हाळा सुरू झाला की नागरिकांना आरोग्याच्या तक्रारी जाणवू लागतात.
उन्हाळ्याच्या झळा वाढल्या की थकवा येणे, चक्कर येणे, हातापायाला गोळे येणे, उष्माघात आणि मृत्यू असे परिणाम माणसांमध्ये दिसून येतात. काहींना डोळ्यांचे तर काहींना त्वचेचे विकार जडतात. उन्हाळ्यात विविध प्रकारचे श्वसन विषयक, मेंदूचे आणि हृदयाचे आजार होतात. रक्तदाब, मधुमेह सारख्या व्याधी असलेल्या व्यक्तींनी उन्हाळ्यात विशेष खबरदारी घ्यावी. उन्हाळ्यात उष्माघाताने प्रमाण खूप वाढते. उष्माघातामुळे शरीराचे तापमान उच्च पातळीवर पोहचते. योग्य आणि वेळेवर उपचार न मिळाल्यास संबंधित व्यक्ती दगावण्याची देखील शक्यता असते. उष्माघातापासून बचाव करण्यासाठी लोकांनी घराबाहेर पडणे टाळावेच. दुपारी १२ ते ४ यावेळेत घराबाहेर पडूच नये. काही महत्वाचे काम असेल तरच घराबाहेर पडावे. घराबाहेर पडताना टोपी, गॉगल, चपला, बूट यांचा वापर करावा. हलकी, पातळ व सच्छिद्र सुती कपडे वापरावेत. तापमान वाढले की शरीरातील पाण्याचे प्रमाण कमी होते त्यामुळे डिहायड्रेशन होते. डिहायड्रेशन झाले की शरीरातील पाणी झपाट्याने कमी होते त्यामुळे चक्कर येते. त्यामुळे शरीरातील पाण्याची पातळी कमी होऊ नये यासाठी सतत पाणी पीत राहावे. शरीरात दररोज किमान दोन लिटर पाणी जाणे गरजेचे असते उन्हाळ्यात हेच प्रमाण चार ते पाच लिटर इतके असते त्यामुळे घराच्या बाहेर पडताना पाण्याची बाटली सोबत न्यायला विसरू नका. साध्या पाण्याबरोबरच नारळाचे पाणी, फळांचे व भाज्यांचे रस दररोज प्यायले तरी हरकत नाही. उन्हाळ्यात आरोग्याच्या अनेक समस्या निर्माण होतात त्यामुळेच उन्हाळ्यात प्रत्येकाने आपले आरोग्य सांभाळणे गरजेचे आहे. योग्य ती खबरदारी घेऊन आपण उन्हाच्या तिव्रतेपासून बचाव करू शकतो.
श्याम ठाणेदार
दौंड जिल्हा पुणे
९९२२५४६२९५