संख : जत तालुक्यात यंदा मोठा पाऊस पडल्या नसल्यामुळे जत दुष्काळजन्य परिस्थिती निर्माण झाली आहे. या परिस्थितीमुळे जनावरांच्या चाऱ्याचा प्रश्न गंभीर बनला आहे. तेव्हा शासनाने संख व परिसरात चारा छावणी उभी करावी, अशी मागणी भाजप युवा मोर्चाचे जिल्हा उपाध्यक्ष विजय पाटील यांनी केली आहे.पूर्व भागात पाऊस नसल्यामुळे संख मध्यम प्रकल्प तलाव कोरडा ठणठणीत पडला आहे. विहिरी आटल्या आहेत. कूपनलिका १००० ते ११०० फूट खोदूनही पाणी लागेनासे झाले आहे.पाण्याची पातळी खालवल्याने तीव्र टंचाई निर्माण झाली आहे. जनावरांना चारा मिळणे कठीण झाले आहे.
जनावरांची जोपासना कशी करायची, या चिंतेत शेतकरी आहेत. शेतकरी कवडीमोल दराने विक्री करण्याच्या मनःस्थितीत आहेत. जत पूर्वभागातील शेतकरी जोड व्यवसाय म्हणून पशुपालन करत आहेत.दुभत्या जनावरांपासून दुग्ध व्यवसायातून उदरनिर्वाहासाठी व मुलांच्या शिक्षणासाठी चार पैसे हातात मिळतील, या आशेने शेतकरी लाखो रुपये देऊन गाय, म्हैस, जर्सी गायींचे पालन करतात. मात्र दुधाला म्हणावं तसा दर मिळेना, जनावरांना चारा मिळेना.
अशा परिस्थितीत शेतकरी अडचणीत सापडला आहे. तसेच जनावरांच्या खाद्यदरातही वाढ झाल्यामुळे शेतकरी दुभती जनावरे सांभाळणे अवघड झाले आहे. जत पूर्व भागातील पशुधन वाचवण्यासाठी शासनाने तत्काळ चारा छावणी सुरू करावी, अशी मागणी भाजप युवा मोर्चाचे जिल्हा उपाध्यक्ष विजय पाटील यांनी केली आहे.