सांगलीत निकालापूर्वीच चंद्र’हार’ पाटलांनी पराभव स्वीकारला ? | मतमोजणीसाठी प्रतिनिधीच दिले नाहीत : संजय पाटील – विशाल पाटील यांचा मंगळवारी फैसला

0
तासगाव : अमोल पाटील
सांगली लोकसभा निवडणुकीचा निकाल मंगळवार दि. 4 जून रोजी आहे. सांगलीचा खासदार कोण होणार, याचा फैसला मंगळवारी होणार आहे. मात्र मंगळवारी होणाऱ्या मतमोजणीसाठी महाविकास आघाडीचे अधिकृत उमेदवार, डबल महाराष्ट्र केसरी पै. चंद्रहार पाटील यांनी एकही मतमोजणी प्रतिनिधीच दिला नसल्याची धक्कादायक बाब समोर आली आहे. त्यामुळे त्यांनी निकालापूर्वीच पराभव स्वीकारल्याची चर्चा जिल्ह्यात सुरू आहे. तर भाजपचे उमेदवार संजय पाटील व अपक्ष उमेदवार विशाल पाटील यांच्यात कोण विजयी होणार, याचा फैसला मंगळवारी होणार आहे.
      सांगली लोकसभेसाठी 7 मे रोजी चुरशीने मतदान झाले. भाजपचे विद्यमान खासदार संजय पाटील, महाविकास आघाडीचे डबल महाराष्ट्र केसरी चंद्रहार पाटील व अपक्ष उमेदवार विशाल पाटील हे प्रमुख उमेदवार या निवडणुकीसाठी रिंगणात होते. निवडणुकीपूर्वी महाविकास आघाडीमध्ये सुरू झालेला ‘गल्लीत गोंधळ, दिल्लीत मुजरा’ हा प्रकार मतदानापर्यंत सुरूच  होता. सांगलीच्या महाविकास आघाडीच्या उमेदवारीवरून ‘गल्ली ते दिल्ली’पर्यंत चर्चा रंगली. शिवसेना ठाकरे गटाचे नेते, माजी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी कोणालाही विश्वासात न घेता डबल महाराष्ट्र केसरी चंद्रहार पाटील यांची उमेदवारी जाहीर केली. लागलीच त्यांनी मिरज येथे येऊन चंद्रहार पाटील यांच्यासाठी सभाही घेतली.
        कोणालाही विश्वासात न घेता ठाकरे यांनी हा निर्णय घेतला होता. त्यामुळे महाविकास आघाडीतील इतर घटक पक्ष नाराज झाले. त्याचाच परिणाम म्हणून ठाकरे यांच्या मिरजेतील सभेला घटक पक्षातील कोणीही हजर नव्हते. ठाकरे गटाचे राज्यसभा खासदार संजय राऊत यांनी सांगलीची जागा प्रतिष्ठेची केली. महाविकास आघाडीमध्ये उमेदवार निवडताना समन्वयाचा अभाव दिसून आला. संजय राऊत यांनी हट्टाने सांगलीची जागा मागून घेतली.
       तर काँग्रेस – राष्ट्रवादीच्या नेत्यांनी महाविकास आघाडीचे एकदिलाने काम करावे. चंद्रहार पाटील यांना निवडून आणण्यासाठी प्रयत्न करावेत. ‘मविआ’च्या नेत्यांनी नौटंकी करू नये, असा इशारा देत थेट शरद पवार यांना तासगावात आणून चंद्रहार पाटील यांच्यासाठी सभा घेतली. तर माजी राज्यमंत्री अजितराव घोरपडे, माजी आमदार विलासराव जगताप यांची भेट घेऊन चंद्रहार पाटील यांना मदत करण्याचे आवाहन संजय राऊत यांनी केले.
       मात्र प्रत्यक्षात मतदानापर्यंत महाविकास आघाडीमध्ये समन्वय दिसून आला नाही. महाविकास आघाडीच्या नेत्यांमध्ये आ. सुमन पाटील, आ. विश्वजीत कदम, आ. विक्रम सावंत, आ. अरुण लाड यांच्या हातात ‘मशाल’ दिसत असली तरी मनात मात्र ‘विशाल’च होता, हे वेळोवेळी स्पष्ट झाले. महाविकास आघाडीच्या घटक पक्षातील सर्व नेते दिवसभर चंद्रहार पाटील यांच्या व्यासपीठावरून प्रचारात दिसत होते. तर रात्री मात्र अपक्ष उमेदवार विशाल पाटील यांच्यासाठी नियोजन करत असल्याचे दिसून आले.
Rate Card
      महाविकास आघाडीतील नेत्यांनी चंद्रहार पाटील यांना सुरुवातीपासूनच अंधारात ठेवले. अनेकांनी जवळ राहून चंद्रहार पाटील यांचा ‘गेम’ केला. त्यांच्याशी गद्दारी केली. त्यांचा घात केला. त्यामुळेच जिल्ह्यातील अनेक गावात चंद्रहार पाटील यांचे साधे बुथही लागले नाहीत. पै. पाटील यांच्याकडून आणलेले बुथचे पैसे अनेकांनी खिशात घातले. निवडणूक काळात चंद्रावर यांना जवळच्याच अनेक लोकांनी लुबाडले. त्यामुळे मतदानापूर्वीच चंद्रहार पाटील यांचा पराभव निश्चित झाला होता. त्यांचे ‘डिपॉझिट’ही राहणार नाही, असा अंदाज राजकीय विश्लेषकांनी व्यक्त केला होता. तो आता खरा ठरत आहे.
        दरम्यान चंद्रहार पाटील यांना निवडणुकीदरम्यान आर्थिक दृष्ट्या लुबाडणाऱ्यांनी आता आपले अंग काढून घेतले आहे. चंद्रहार यांना एकाकी पाडले आहे. महाविकास आघाडीच्या नेत्यांनी तर शेवटच्या दोन दिवसात उघडपणे अपक्ष उमेदवार विशाल पाटील यांचे काम करण्याचे आदेश कार्यकर्त्यांना दिल्याचे दिसून आले. त्यामुळे काँग्रेस – राष्ट्रवादीचे कार्यकर्ते विशाल पाटलांसाठी शेवटच्या चार दिवसात घाम गाळताना दिसून आले.
      आता मंगळवार दि. 4 जून रोजी सांगली लोकसभेचा निकाल आहे. 84 ईव्हीएम व 20 टपाली अशा 104 टेबलवर ही मतमोजणी होत आहे. या मतमोजणीसाठी 27 मे पर्यंत मतमोजणी प्रतिनिधी देण्याची मुदत होती. मात्र महाविकास आघाडीचे उमेदवार चंद्रहार पाटील यांनी या 104 टेबलसाठी मुदतीत मतमोजणी प्रतिनिधी दिले नसल्याची धक्कादायक बाब समोर आली आहे.
       त्यामुळे चंद्रहार पाटील यांनी निकालापूर्वीच पराभव स्वीकारला आहे का, अशी चर्चा मतदारसंघात रंगली आहे. दरम्यान चंद्रहार पाटील जिल्हाधिकाऱ्यांना भेटून मतदान प्रतिनिधी घेण्याची विनंती करणार असल्याचे समजते. 27 मे रोजी मतदान प्रतिनिधी देण्यास विलंब झाला. मात्र आता मतदान प्रतिनिधी यादी घेऊन सहकार्य करावे, अशी विनंती चंद्रहार पाटील जिल्हाधिकाऱ्यांना करणार असल्याची माहिती समोर येत आहे.

Leave A Reply

Your email address will not be published.

कॉपी करू नका.