सांगली : सन 2019 व 2021 मध्ये सांगली जिल्ह्यात मोठ्या प्रमाणात नद्यांना पूर आला होता. पुरामध्ये एकूण 104 गावे बाधित झाली होती. त्यामुळे पूरग्रस्त जनावरांना सुरक्षित ठिकाणी तात्पुरत्या स्वरूपात विस्थापित करण्यात आले होते. सन 2024 मध्ये हवामान खात्याने मुसळधार ते अतिमुसळधार पाऊस पडण्याची शक्यता वर्तविली असून सांगली जिल्ह्यासाठी अलर्ट जारी केला आहे. त्यामुळे आपत्कालीन सभेतील जिल्हाधिकारी तथा अध्यक्ष आपत्कालीन समिती सांगली यांच्याकडील सूचनांनुसार संभाव्य विस्थापित कराव्या लागणाऱ्या जनावरांकरिता तात्पुरत्या स्वरूपात उभारण्यात आलेल्या चारा छावणीमध्ये दाखल झालेल्या जनावरांना चारा, पशुखाद्य व मुबलक पाणी पुरविण्याकरिता सेवाभावी संस्था, उत्पादक, पुरवठादार यांच्याकडून पुढीलप्रमाणे दर्शविलेल्या चारा / मुरघास करिता दरपत्रके मागविण्यात आली आहेत.
या क्षेत्रामध्ये काम करणाऱ्या संस्थांनी दिनांक 8 ऑगस्ट 2024 पर्यंत शासकीय वेळेत बंदलिफाफ्यामध्ये चाऱ्याच्या प्रकारानुसार तालुकानिहाय वाहतुकीस जागा पोहोच प्रति टन याप्रमाणे दरपत्रके जिल्हा पशुसंवर्धन उपआयुक्त, सांगली यांचे कार्यालय डॉ. आंबेडकर रोड, पशुवैद्यकीय सर्वचिकीत्सालय आवार, मिरज या कार्यालयास टपालाने अथवा समक्ष सादर करण्याची दक्षता घ्यावी, असे आवाहन सहाय्यक आयुक्त पशुसंवर्धन डॉ. एम. बी. गवळी यांनी केले आहे.
अटी व शर्ती – छावणीत दाखल होणाऱ्या मोठ्या व लहान जनावरांना पिण्यासाठी पुरेशा प्रमाणात स्वच्छ पाणी उपलब्ध करुन देण्यात यावे. शासन निकषाप्रमाणे छावणीत दाखल झालेल्या प्रति मोठ्या व लहान जनावरांस प्रतिदिन वाळलेला किंवा हिरवा चारा व पशुखाद्य पुढीलप्रमाणे देण्यात यावे.
अ.क्र. | चाऱ्याचा प्रकार | मोठी जनावरे | लहान जनावरे |
1. | हिरवा चारा (मका, ऊस, ऊसाचे वाडे) | 18 किलोग्रॅम | 9 किलोग्रॅम |
2. | पशुखाद्य (आठवड्यातून 3 दिवस 1 दिवसाआड) | 1 किलोग्रॅम | 0.5 किलोग्रॅम |
किंवा | |||
1. | वाळलेला चारा (कडबा किंवा कडब्याची कुट्टी, वाळलेला चारा किंवा वाळलेले गवत) | 6 किलोग्रॅम | 3 किलोग्रॅम |
2. | पशुखाद्य (आठवड्यातून 3 दिवस 1 दिवसाआड) | 1 किलोग्रॅम | 0.5 किलोग्रॅम |
किंवा | |||
1. | मक्याचा मुरघास | 8 किलोग्रॅम | 4 किलोग्रॅम |
दरपत्रके सादर करताना ती मा. जिल्हा पशुसंवर्धन उपआयुक्त, सांगली डॉ. आंबेडकर रोड, पशुवैद्यकीय सर्वचिकीत्सालय आवार, मिरज यांच्या नावे करण्यात यावीत. दरपत्रके सादर करताना तालुकानिहाय चाऱ्याचा प्रकारानुसार प्रति टन दर व वाहतुकीसह जागा पोहोच पुरवठा करण्याचा दर स्वतंत्ररीत्या दर्शविण्यात यावा. चाऱ्याची भरणी व उतरणी करण्याचा खर्च पुरवठादार यांनी करण्याचा आहे. चारा पुरवठा करताना भरलेल्या गाडीचे वजन काटा पावती व मोकळ्या झालेल्या गाडीचे वजन काटा पावती सादर करणे बंधनकारक राहील. जी गाडी चारा वाहतुकीसाठी वापरलेली आहे त्या गाडीची कागदपत्रे (वाहन नोंदणी पत्र) सादर करणे बंधनकारक राहील. चारा पुरवठा आदेश दिल्यानंतर तात्काळ दिलेल्या मार्गानुसार चारा पुरवठा करावयाचा आहे. वाहतुकीचे दर हे गाडीच्या प्रकारानुसार व प्रादेशिक परिवहन अधिकारी यांनी निर्धारित केलेल्या दरानुसार अनुज्ञेय असतील. चारा निशुल्क दराने पुरवठादार/सेवा भावी संस्था / गोरक्षणासाठी कार्यरत संस्था तयार असल्यास त्यांनी सुध्दा आपली नावे व आपण पुरवठा करू इच्छिता अशा गावांची नावे कळवावीत. शासन निर्णयानुसार मक्याच्या मुरघासाची किंमत 6.50 रुपये पैसे / किलोग्राम एवढी निश्चित करण्यात आली आहे याची नोंद घेण्यात यावी.
विहीत मुदतीपेक्षा उशिराने प्राप्त होणाऱ्या दरपत्रकांचा विचार केला जाणार नाही. दरपत्रके मा. जिल्हा पशुसंवर्धन उपआयुक्त, सांगली यांचे कार्यालय डॉ. आंबेडकर रोड, पशुवैद्यकीय सर्वचिकीत्सालय आवार, मिरज यांच्या दालनात दिनांक 9 ऑगस्ट 2024 रोजी दुपारी 12 वाजता जिल्हास्तरीय समितीसमोर उघडण्यात येतील. अर्जाचा नमुना जिल्हाधिकारी कार्यालय सांगली च्या sangli.nic.in या संकेतस्थळावर उपलब्ध आहे. अधिकच्या माहितीसाठी मा. जिल्हा पशुसंवर्धन उपआयुक्त, सांगली डॉ. आंबेडकर रोड, पशुवैद्यकीय सर्वचिकीत्सालय, आवार, मिरज यांच्या कार्यालयाशी संपर्क साधावा, असे प्रसिध्दीपत्रकाव्दारे कळविण्यात आले आहे.