‘स्पा सेंटर्स’ की अनैतिक धंद्याचे अड्डे ?
सध्या सर्वत्र मसाज पार्लर आणि स्पा सेंटर यांचे पेव फुटले असून या व्यवसायाच्या आडून अनैतिक धंदे चालत असत्याची अनेक प्रकरणे ठिकठिकाणी उघड होत आहेत. स्पा सेंटरच्या माध्यमातून वेश्या व्यवसाय चालत असल्याच्या अनेक तक्रारी दाखल झाल्यामुळे गुजरात पोलिसांनी कर्णावती आणि गांधीनगर भागातील स्पा सेंटर्सवर धाडी मारण्याची मोहीम हाती घेतली आहे. पैशाच्या मोबदल्यात परदेशी तरुणींना या अवैध व्यवसायात ढकलल्याचा तक्रारीही पोलिसांकडे दाखल करण्यात आल्या होत्या त्यामुळे गुजरात सीआयडी आणि गुन्हे शाखेचे अधिकारी यासंदर्भात जोरदार कारवाई करत आहेत. त्यातून अनेक परदेशी तरुणींना पोलिसांनी ताब्यात घेतले असून त्यांची कसून चौकशी चालू आहे. अशाच एका विदेशी युवतीच्या पासपोर्ट व्हेरीफिकेशनसाठी पोलीस ती राहत असलेल्या हॉटेलमध्ये गेले असता सदर युवतीने प्रचंड गोंधळ घातला. मद्याच्या नशेत असलेल्या या युवतीने पोलिसांनाही लाथा मारत मारहाण केली तसेच पोलिसांवर चप्पल फेकली. या घटनेचा व्हिडीओ सध्या सोशल मीडियावर प्रचंड व्हायरल होत असून नेटकरी त्या विदेशी युवतीला चांगलेच सुनावत आहेत. याप्रसंगी त्या युवतीच्या बहिणीनेही तिची साथ दिल्याचे सदर व्हिडिओमध्ये दिसून येत आहे. अखेर पोलिसांनी त्या दोघीनाही ताब्यात घेतले असून पोलीस त्या दोघींवर पुढील कारवाई करतीलच.
मागील काही महिन्यांत स्पा सेंटरच्या आडून चालणाऱ्या अनैतिक धंद्याबाबतच्या अनेक तक्रारी दाखल झाल्याने स्पा सेंटर्स नक्की लोकांच्या त्वचेच्या आरोग्यासाठी आहेत की अनैतिक धंदे चालवण्यासाठी असा प्रश्न आता निर्माण झाला आहे. स्पा सेंटर आणि मसाज पार्लर सारख्या गोंडस नावाखाली सर्वच शहरांमध्ये हे धंदे अव्याहतपणे सुरु आहेत. अनेक ठिकाणी हे सेंटर्स रात्री उशिरापर्यंत सुरु असतात. तेथे चालणाऱ्या अवैध धंद्यामुळे स्थानिक नागरिकांना प्रचंड त्रास सहन करावा लागतो. नागरिकांच्या तक्रारींच्या नंतर जागे होणाऱ्या पोलीस प्रशासनाला याबाबत खरंच काही ठाऊक नसते की हे सेंटर्स चालवणाऱ्या मालकांचे आणि आणि स्थानिक पोलिसांचे काही आर्थिक लागेबांधे असतात याबाबतही चौकशी केली जायला हवी. सर्वच स्पा सेंटर्स आणि मसाज पार्लरमध्ये अशा प्रकारच्या अनैतिक गोष्टी घडतात असे नाही; मात्र सध्या ज्या प्रमाणात एकामागोमाग एक घटना समोर येत आहेत त्यामुळे हे व्यवसाय प्रचंड बदनाम होऊ लागले आहेत हेही तितकेच सत्य आहे.