तासगावातील ‘त्या’ महा ई केंद्रावर कारवाई होणार | तहसीलदारांचे संकेत : बोगस ईडब्ल्यूएस दाखला दिल्याचे प्रकरण

0
17

तासगाव : येथील महा-ई-सेवा केंद्रातून केंद्राच्या ईडब्लूएस दाखल्यासाठी बोगस प्रस्ताव देण्यात आला. या प्रस्तावावर कोणतीही खातरजमा न करता तहसील ऑफिसमधून सही करण्यात आली. मात्र ओबीसीमधील व्यक्तीला केंद्राचा ईडब्लूएस दाखला देता येत नाही, हा प्रकार चव्हाट्यावर आल्यानंतर तहसीलदार अतुल पाटोळे यांनी या प्रकरणाची गंभीर दखल घेतली. ज्या महा-ई-सेवा केंद्रातून या दाखल्यासाठी चुकीची कागदपत्रे अपलोड करण्यात आली, त्या महा-ई-सेवा केंद्रावर कारवाई करण्याचे संकेत तहसीलदार पाटोळे यांनी दिले आहेत.

 

आयएएस अधिकारी पूजा खेडकर यांनी बोगस दाखले घेऊन नोकरी मिळवल्याचे प्रकरण राज्यभर गाजत आहे. हे प्रकरण ताजे असतानाच तासगाव तहसीलमधून सावर्डे (ता. तासगाव) येथील श्रीधर रामचंद्र साळुंखे याला ओबीसीमधून केंद्राचे ईडब्लूएस सर्टिफिकेट देण्यात आले आहे. साळुंखे यांनी तासगावमधिल महा-ई-सेवा केंद्रातून दाखल्यासाठी अर्ज केला होता. मुळात ओबीसीमधील व्यक्तीला केंद्राचे ईडब्ल्यूएस प्रमाणपत्र मिळत नाही. हे माहीत असतानाही कुंभार यांनी साळुंखे यांची कागदपत्रे घेऊन बोगस प्रस्ताव तयार केला.

 

हा प्रस्ताव ऑनलाईन तहसील ऑफिसकडे सादर केला. तहसील ऑफिसमध्येही या प्रस्तावाची कोणतीही छाननी न करता त्याला मंजुरी देण्यात आली. तहसीलदार अतुल पाटोळे यांची डिजिटल सही या दाखल्यावर देण्यात आली. हा प्रकार अतिशय गंभीर आहे. ओबीसी प्रवर्गातील व्यक्तींना स्वतंत्र आरक्षण आहे. या व्यक्तींना केंद्राचे ईडब्लूएस प्रमाणपत्र कदापि मिळत नाही. मात्र महा-ई-सेवा केंद्र चालकांच्या मनमानी कारभारामुळे असे प्रमाणपत्र देण्याचा प्रयत्न झाला.

 

या प्रकाराची तहसीलदार अतुल पाटोळे यांनी गंभीर दखल घेतली आहे. संबंधित सेतूचालकावर कारवाई करण्याचे संकेत त्यांनी दिले आहेत.

Team Sanket Times

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here