सांगली : जन्मठेप भाेगताना ‘पॅरोल’वर जेलबाहेर आलेला आरोपी संजय प्रकाश माने (वय ३४, रा. चिंतामणीनगर झोपडपट्टी) याने एका अल्पवयीन मुलीवर बलात्कार केल्याची घटना उघडीस आली आहे.घटनेची माहिती मिळताच पोलिसांनी आरोपी मानेला अटक केली आहे.हा प्रकार समजताच पीडितेचे नातेवाईक आणि परिसरातील संतप्त नागरिक पोलिस ठाण्यासमोर जमले. शेकडोंचा जमाव जमला.
पोलिसांनी दिलेली माहिती अशी, आरोपी संजय माने याच्याविरुद्ध २०११ मध्ये खून आणि खुनी हल्ल्याचा गुन्हा दाखल आहे. या खुनात त्याला एप्रिल २०२३ मध्ये जन्मठेपेची शिक्षा झाली आहे. जन्मठेपेची शिक्षा भाेगणारा संजय हा काही दिवसांपूर्वी ‘पॅरोल’वर जेलबाहेर आला आहे. मागील महिन्यात त्याने परिसरातील एका १५ वर्षीय मुलीस जाळ्यात ओडण्याचा प्रयत्न करत ‘तू मला आवडतेस,’ असे म्हणून हात पकडला होता.संजयला घाबरलेल्या पीडित मुलीने हा प्रकार कोणाला सांगितला नव्हता. त्यानंतर संजय हा तिच्या काय मागावर असायचा.
शुक्रवारी रात्री साडेनऊच्या सुमारास पीडित मुलगी ही दुकानात पापड घेऊन परत येत असताना संजय याने ती घराजवळ आली असताना तिला बोलावले. ती जवळ येताच त्याने तिला घरात ओढून तिच्यावर लैंगिक अत्याचार केला. त्यानंतर तीला धमकावले.पीडित मुलीला त्रास होऊ लागल्यानंतर तिने आईला हा प्रकार सांगितला. त्यामुळे आई घाबरली. तिने तत्काळ संजयनगर पोलिस ठाणे गाठले.पोलीसांनी पीडित मुलीची तक्रार नोंदवून घेतली. आरोपी संजय याच्याविरुद्ध ‘पोक्सो’अंतर्गत गुन्हा दाखल करण्यात आला. दुपारी संजय याला पोलिसांनी ताब्यात घेतले आहे..