सांगली :जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँकेची मंगळवार दि. २७ रोजी सर्वसाधारण सभा होणार आहे. यंदा बँकेला २०४ कोटी रुपयांचा ढोबळ नफा झाला आहे. मागील दोन सभेत शेतकऱ्यांसाठी ओटीएस योजना जाहीर झाली होती. यंदा बँकेचे अध्यक्ष मानसिंगराव नाईक कोणत्या योजनेची घोषणा करणार याकडे शेतकऱ्यांचे लक्ष आहे.
जिल्हा बँकेला मागील आर्थिक वर्षात मार्च २४ अखेर २०४ कोटी रुपयांचा ढोबळ नफा झाला आहे. सध्या बँकेकडे साडेसात हजार कोटींच्या ठेवी असून, ६ हजार ९५० कोटींचे कर्जवाटप आहे. चालू आर्थिक
वर्षात ९ हजार रुपयांच्या ठेवी, साडेसात हजार कोटी कर्जवाटप आणि एनपीए शून्य टक्के आणून अडीचशे कोटी नफ्याचे उद्दिष्ट ठेवले आहे. प्रत्येक तालुक्याला एक शाखा विस्तार तसेच मोबाईल बँकिंग सुविधाबाबतचा प्रस्ताव रिझर्व्ह बँकेकडे पाठवला आहे.
जिल्हा बँकेकडून सध्या २ लाखापर्यंत कर्जासाठी विमा उतरविला जातो आहे. यामध्येही नैसर्गिक मृत्यूचा समावेश नाही. जिल्हा बँकेच्या सर्वच प्रकारच्या कर्जासाठी आणि नैसर्गिक मृत्यूसाठीही विमा योजना लागू करावी, अशी कर्जदार शेतकऱ्यांची मागणी आहे.