जत : शहरात अवैध शस्त्र बाळगल्या प्रकरणी शहरातीलच शिवाजी पेठेतील १९ वर्षीय विराज संजय पांढरे यास पोलिसांनी अटक केली आहे. पांढरे याच्याकडून एक पिस्तूल आणि दोन जिवंत काडतुसे जप्त करण्यात आले आहेत. त्याला जत न्यायलासमोर उभे केले असता पाच दिवसाची पोलीस कोठडी देण्यात आली. ही कारवाई शनिवारी दुपारी सव्वादोनच्या सुमारास करण्यात आली.
याबाबतची माहिती अशी, विराज पांढरे यांच्याकडे पिस्तूल व काडतुसे असल्याची माहिती गोपनीय सूत्रांकडून माहिती जत पोलिसांना मिळाली होती.
उपविभागीय पोलीस अधिकारी सुनील साळुंखे, पोलीस निरीक्षक सूरज बिजली यांच्या मार्गदर्शनाखाली जत गुन्हेप्रकटीकरण शाखेचे सहाय्यक पोलीस निरीक्षक बिराप्पा लातुरे पोलीस कर्मचारी नितीन पाटील, विनोद सकटे, श्रीनाथ एकशिंगे यांनी येथील स्मशानभूमीसमोर सापळा रचून विराजला ताब्यात घेतले. त्याच्याकडून एक पिस्तूल व दोन जिवंत काडतुसे असा ५१ हजाराचा अवैध शस्त्रसाठा जप्त करण्यात आला.