विक्रमसिंह सावंतांविरुद्ध विरोधकांची वज्रमूठ जतची गरज  | – विलासराव जगताप

0
25
प्रकाशराव जमदाडे जनसंपर्क कार्यालयाचे उद्घाटन
जत : आमदार विक्रमसिंह सावंत यांनी मागील पाच वर्षात जतला लुबाडण्याचे काम केले आहे. गबाळं हाणणाऱ्यांच्या हाती पुन्हा आमदारकीची सुत्रे द्यायची नसतील तर, विक्रमसिंह सावंतांविरुद्ध विरोधकांची वज्रमूठ जतची गरज असल्याचे प्रतिपादन करत जतचे भाजपचे माजी आमदार विलासराव जगताप यांनी भाजपच्या चुकीच्या धोरणावरही सडकून टीका केली.

जिल्हा बँकेचे संचालक प्रकाश जमदाडे यांच्या प्रकाशराव जमदाडे जनसंपर्क कार्यालयाच्या उद्घाटनप्रसंगी विलासराव जगताप यांनी आपल्या खास शैलीत आ. सावंत यांच्यासह आ. गोपीचंद पडळकर व भाजपचा समाचार घेत भूमिका मांडली. यावेळी प्रकाश जमदाडे, माजी संचालक सरदार पाटील, प्रभाकर जाधव, रामण्णा जिवण्णावर, शंकर वगरे, आप्पासो नामद, श्रीपाद अष्टेकर, मंगलताई जमदाडे, देवयानी गावडे, आशाराणी नरळे, ममता तेली, शिल्पा पवार, सुनिता पवार,दिग्विजय चव्हाण, अभिजित चव्हाण आदी मान्यवर उपस्थित होते.

जतचे राजकारण कसे आहे हे लोकसभेच्या निवडणुकीत जिल्ह्याला कळले आहे. यातून भाजपने बोध घ्यायला हवा पण तसे होताना दिसत नाही. भाजपचे वरिष्ठ नेतेच जत विधानसभा निवडणूक लढविणाऱ्या इच्छुकांना भुलविण्याचे काम करत आहेत, जतमध्ये भाजपचे चार कार्यालये आहेत, एकमत नाही. जनसंपर्क कार्यालयाच्या उद्घाटन सोहळ्याला भाजप वरिष्ठ नेत्यांनी दांडी मारणे योग्य नाही.

भाजपने जे सध्या धोरण अवलंबले आहे ते लोकांना न पटल्याने लोकसभेत पराभव झाला ही वस्तुस्थिती आहे. भाजपला जतची जागा पुन्हा जिंकायची असेल तर सर्वांनी एकत्र येत आ. सावंत विरुद्ध सक्षम पर्यायच द्यावा लागेल व त्याच्या मागे सर्वांनी एकदिलाने उभा रहावे लागेल तरच आ. सावंत यांचा पराभव शक्य असल्याचे जगताप यांनी जाहीर व्यासपीठावरून सांगितले.
प्रास्ताविकेत माजी नगरसेवक मोहनभैय्या कुलकर्णी यांनी प्रकाश जमदाडे यांनी १९९१ पासून केलेल्या कामाचा उहापोह केला. प्रभाकर जाधव, कुंडलिक दुधाळ यांनीही आपले मनोगत व्यक्त करत भाजपमधील सर्वांनी एकत्र यावे, असे आवाहन केले. सूत्रसंचलन राजेंद्र माने यांनी केले तर आभार चंद्रकांत गुडोडगी यांनी मानले.
Team Sanket Times

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here