सांगली सिन्नर ते चिक्कोडी या आणखी एका राष्ट्रीय महामार्गासाठी भूसंपादनाच्या हालचाली जिल्ह्यात सुरू झाल्या आहेत. त्यासाठीचा प्रस्ताव रस्ते विकास महामंडळाने केंद्र – सरकारकडे पाठविला आहे. येत्या डिसेंबरपर्यंत त्यावर निर्णय होण्याची अपेक्षा आहे. राष्ट्रीय महामार्ग क्रमांक १६० अशी त्याची ओळख आहे.
या महामार्गाची घोषणा २०१७ मध्ये राजपत्रात करण्यात आली होती. त्यानुसार राज्यात ठिकठिकाणी त्याची 1 कामे सुरू आहेत. सांगली जिल्ह्यातील र महामार्गाच्या आराखड्याचे काम सध्या सुरू आहे. तो दुपदरी करायचा की चारपदरी? यावर विचारमंथन सुरू आहे. यापैकी फलटण ते विटा हा महामार्गाचा टप्पा दुपदरी केला जाणार असून, त्याला नुकतीच मंजुरी मिळाली आहे. या महामार्गावरील वाहतुकीचा अंदाज घेण्यासाठी गतवर्षी वाहन गणना करण्यात आली होती, ती समाधानकारक न झाल्याने काही महिन्यांपूर्वी पुन्हा एकदा गणना करण्यात आली.
कवठे एकंद (ता. तासगाव) व म्हैसाळ (ता. मिरज)येथील वाहनांची नोंद घेण्यात आली. त्यानुसार हा टप्पा चारपदरी करण्याचे निश्चित झाले आहे. प्राथमिक आराखड्यानुसार विटा ते म्हैसाळ हा मार्ग १०० फूट रुंद प्रस्तावित केला आहे. म्हैसाळजवळ महाराष्ट्र हद्दीपर्यंत तो केला जाईल. त्यापुढे चिक्कोडीपर्यंत कर्नाटक सरकारची जबाबदारी असेल. या कामासाठीच्या भूसंपादनाचा प्रस्ताव केंद्र सरकारला पाठविण्यात आला आहे.
असा असेल महामार्ग क्रमांक १६०
नाशिकमध्ये सिन्नरजवळ राष्ट्रीय महामार्ग क्रमांक ६० पासून त्याची सुरुवात होईल. शिर्डी, अहमदनगर, दौंड, फलटण, दहीवडी, विटा, तासगाव, मिरज (म्हैसाळ) असा प्रवास होईल. म्हैसाळमधून पुढे चिक्कोडीला आणि तेथून पुढे राष्ट्रीय महामार्ग क्रमांक ४८ ला जोडून संपेल.