कोल्हापूर : कोल्हापुरातील एका रुग्णालयात काम करणाऱ्या महिलेकडे शरीरसुखाची मागणी करणाऱ्या डॉक्टरला महिलेच्या नातेवाइकांनी बेदम चोप देऊन पोलिसांच्या ताब्यात दिले. औद्योगिक वसाहतीमध्ये बसस्थानकावर थांबलेल्या शाळकरी मुलीचा पाठलाग करणाऱ्या तरुणास नागरिकांनी प्रसाद दिला. अशा घटना वारंवार घडत आहेत. लंपट, लिंगपिसाट नराधमांच्या वाईट नजरांचा महिलांसह तरुणी व शाळकरी मुलींना त्रास होत आहे; पण अब्रूच्या भीतीने त्या पुढे येऊन तक्रार करीत नाहीत. त्यामुळेच या वासनांधांचे धाडस वाढत आहे.
‘बेटी बचाओ, बेटी पढाओ’ असे म्हणणाऱ्या महाराष्ट्रात शाळकरी मुली, कॉलेज तरुणी आणि विवाहित महिलांना घरातून बाहेर पडणे मुश्कील झाले आहे. अल्पवयीन मुलींना विशेष करून टार्गेट केले जात आहे. कोलकाता, बदलापूर, कोल्हापुरातील शिये, सांगली, मुंबई येथील घटना खूपच संतापजनक आहेत. जनमानसातून याबद्दल तीव्र भावना व्यक्त केल्या जात आहेत.स्त्री ही कोणाची आई, पत्नी, बहीण, मुलगी असते; पण तिच्याकडे वासनांध नजरेने पाहणाऱ्यांची संख्या वाढत आहे. ओळखीच्या अथवा नातेवाइकातीलच लोकांकडून तिच्या शरीराशी खेळण्याचे प्रकार घडतात.
कोल्हापूर जिल्ह्यातील शिये येथील दहा वर्षांच्या बालिकेवर झालेला अत्याचार व खून हा तिच्या अगदी जवळच्या नातेवाइकानेच केला असल्याचे तपासात उघड झाले आहे.डॉक्टरी पेशाला काळीमा फासणारा प्रकार शनिवार, दि. २४ रोजी कोल्हापुरातील रंकाळा टॉवर परिसरात घडला. डॉक्टरने आपल्या रुग्णालयातील कर्मचारी महिलेची छेड काढून तिच्याशी असभ्य वर्तन केले. यामुळे महिलेने आपल्या नातेवाइकांना बोलावून डॉक्टरची धुलाई केली. या लिंगपिसाट डॉक्टरने आजपर्यंत असे अनेक प्रकार केल्याची चर्चा शहरात सुरू झाली आहे. सध्या तो पोलिसांच्या ताब्यात आहे.
सोशल मीडियाचा दुष्परिणाम
सोशल मीडियावरून व्हायरल होणारे व्हिडीओ, अश्लील व्हिडीओ, मेसेज यामुळे कामुकवृत्ती वाढते. १९ ते ४० वयोगटातील लोक असे साहित्य मोठ्या प्रमाणात बघत असतात. त्यामुळेच अत्याचाराच्या घटना वाढत असल्याचे दिसून येते. यावर निर्बंध लावण्याबाबत शासनाने विचार करण्याची गरज आहे.
घरी सांगितल्यास शाळा बंद
शाळकरी मुलींचा शाळेत अथवा शाळेतून घरी येताना विनयभंग, छेडछाड झाली तर त्या शक्यतो घरी सांगत नाहीत. कारण पालकांना या गोष्टी समजल्यावर तक्रार दाखल करण्याऐवजी पालक मुलीची शाळा बंद करण्याचा सल्ला देतात. त्यामुळे मुलींचे नुकसान होते. म्हणून मुली याबाबत काहीच बोलत नाहीत
येथे होते छेडछाड
शाळा, महाविद्यालय परिसर, चौक, बाजारपेठ, बसस्थानक, रेल्वे स्टेशन, गर्दीची ठिकाणे या ठिकाणी येणारे लोक महिलांसह तरुणींकडे टक लावून पाहणे, शिटी, टाळी वाजवणे, हाक मारून दुसरीकडे लक्ष देणे, दुचाकीवरून पाठलाग करणे, हॉर्न मोठ्याने वाजवणे, विनाकारण दंगा, हुल्लडबाजी करणे असे प्रकार घडतात.