रोहित पाटलांची शिकार करण्याची भाषा करणाऱ्यांना जागा दाखवू | सुरेश पाटील : माजी खासदारांना घेतले शिंगावर : आम्ही मदत करूनही आमच्यावर विश्वासघाताचा आरोप
कवठेमहांकाळ : शिकार करायची असल्यास दोन पावले मागे यावे लागते. मात्र येणारी विधानसभा निवडणूक आपणाला जिंकायची आहे.प्रभाकर तुमच्यासाठी काम करत आहे. ज्यांना आजपर्यंत मदत केली त्यांनी लोकसभा निवडणुकीत विश्वासघात केला, अशी टीका माजी खासदार संजय पाटील यांनी तासगाव येथील दहीहंडी कार्यक्रमात केली होती. त्याला उत्तर देताना स्व. आर. आर. पाटील यांचे बंधू सुरेश पाटील चांगलेच आक्रमक झाले. माझ्या पुतण्याची शिकार करण्याची भाषा करणाऱ्यांना येत्या निवडणुकीत जागा दाखवू,असे म्हणत त्यांनी माजी खासदार संजय पाटील यांना अक्षरशः शिंगावर घेतले. दोन वेळेला आम्ही मदत करूनही आमच्यावर विश्वासघाताचा आरोप होत आहे, असेही ते म्हणाले.
राष्ट्रवादी शरदचंद्र पवार गटाचे युवा नेते रोहित पाटील यांनी तासगावसह कवठेमहांकाळ तालुक्यात कर्तव्य यात्रा सुरू केली आहे. गावागावात कर्तव्य यात्रेच्या निमित्ताने ते मतदारांचा आशीर्वाद घेत आहेत. या यात्रेची सांगता मळणगाव (ता. कवठेमहांकाळ) येथे झाली. या सांगता सभेत सुरेश पाटील बोलत होते.ते म्हणाले, तासगावमध्ये बोलताना काही नेते म्हणाले की, शिकार करायची असेल तर दोन पावले मागे सरकावे लागते.
येणारी विधानसभा निवडणूक आपणाला जिंकायची आहे. आपण ज्यांना मदत केली त्यांनीच लोकसभा निवडणुकीत विश्वासघात केला. मात्र तासगाव – कवठेमहांकाळ मतदार संघातील सर्व लोकांना माहित आहे की, नेमका विश्वासघात कोणी कोणाचा केला आहे. आम्ही कोणाबरोबरही गद्दारी केलेली नाही. गद्दारी तुम्ही केलेली आहे. कवठेमहांकाळ नगरपंचायतीच्या वेळेला कोणी गद्दारी केली. तासगाव पंचायत समिती पाडायचा कोणी प्रयत्न केला, असा सवालही सुरेश पाटील यांनी माजी खासदारांचे नाव न घेता विचारला.
ते म्हणाले, गद्दारी कोणी कोणासोबत केली हे सर्व जनतेला माहित आहे. गद्दारी कशी करावी, हे तुमच्याकडून शिकण्यासारखे आहे. कामे आणली की पळवायची. नगरपंचायत आणली की पळवायची, त्यामुळेच गेल्या लोकसभेवेळी तुम्हाला जितके मताधिक्य होते त्यापेक्षा यावेळेला घटले. लोकसभा निवडणुकीत तुमचे मताधिक्य का घडले, याचा विचार टीका करणारांनी करावा.
ते म्हणाले, आमचे कार्यकर्ते गप्प बसले म्हणूनच तुम्हाला गेल्यावेळेला मताधिक्य मिळाले होते. रोहित पाटील यांना टार्गेट केलेलं यापुढील काळात अजिबात सहन केले जाणार नाही. जशास तसे उत्तर दिले जाईल. आमची शिकार करण्याची भाषा करणाऱ्यांना ताणून – ताणून मारू. मतदारसंघातील स्वाभिमानी जनता तुमची शिकारीची भाषा खपवून घेणार नाहीत.
जनतेच्या अपेक्षा सार्थकी लावा : सुरेश पाटील यांचा रोहित पाटील यांना सल्ला
यावेळी सुरेश पाटील म्हणाले, तालुक्यात कर्तव्य यात्रा काढत असताना प्रत्येक गावातील वाडी वस्तीवर पोहोचण्याचे ध्येय ठेवून रोहित पाटील सर्व ठिकाणी पोहोचले आहेत. तुमच्याकडे लोकांचा पाहण्याचा दृष्टिकोन चांगला आहे. लोकांना तुमच्याकडून खूप अपेक्षा आहेत. या अपेक्षा तुम्ही सार्थकी लावा. या अपेक्षा फेल गेल्या, असे लोकांना कधी वाटू देऊ नका.