मी विधानसभा लढविणार नाही,आमदार सुधीर गाडगीळ यांची निवडणूकीतून माघार
सांगली :सांगलीतील भाजपचे गाडगीळ यांनी अनपेक्षितपणे विधानसभा निवडणूक न लढवण्याचा निर्णय जाहीर केला आहे. त्यामुळे भाजपच्या पदाधिकारी, कार्यकर्त्यांना जोरदार धक्का बसला आहे. गाडगीळ यांनी आपण पक्षाकडे उमेदवारी मागणार नाही, माझ्याऐवजी अन्य कार्यकर्त्याला संधी द्यावी, अशी विनंती पक्षाला करणार असल्याचे निवेदनात म्हटले आहे.
आ.सुधीर गाडगीळ यांनी मंगळवारी रात्री अचानक निवडणुकीच्या मैदानातून माघार घेत असल्याचे जाहीर केले. गाडगीळ यांनी प्रसिद्धीस दिलेल्या निवेदनात म्हटले आहे, सांगलीकर जनतेने दहा वर्षापूर्वी त्यांचा हक्काचा प्रतिनिधी म्हणून मला विधानसभेत पोहचवले. त्याआधीही आमचे गाडगीळ घराणे राष्ट्रीय स्वयंसेवक संघ परिवारातील संघटनांच्या माध्यमातून अनेक वर्ष समाजकारणात होतेच. मी ही भारतीय जनता पार्टीच्या सांगली शहर जिल्हाध्यक्षपदाची जबाबदारी काही वर्षसंभाळली होती. अनेक निवडणुकीत पक्षाने दिलेल्या जबाबदाऱ्यांचे पालन केले. २०१४ ला मला पक्षाने विधानसभेची उमेदवारी दिली. जनतेचा आशीर्वाद, कार्यकर्त्यांच्या मेहनतीमुळे मी विजयी झालो. मतदारसंघातील रस्त्यांची अनेक वर्ष दुरवस्था होती. यासाठी शासनाकडून निधी आणून विकास केला आहे.
प्रथम देश, नंतर पक्ष, शेवटी मी
आमदार सुधीर गाडगीळ निवेदनात म्हणतात, काही महिन्यांनी विधानसभेच्या निवडणुका जाहीर होतील. या निवडणुकीत पक्षाकडे उमेदवारी न मागण्याचा निर्णय मी घेतला आहे. राजकारणात कधी तरी थांबलं पाहिजे, या मताचा मी आहे. आमचा पक्ष सामान्य कार्यकर्त्यांच्या संघटनेतून बनला आहे. आमच्या संघटनेची कार्यपद्धती ‘प्रथम देश, नंतर पक्ष आणि सर्वात शेवटी मी’ अशी आहे. मला पक्षाने दोनदा विधानसभा उमेदवारीची संधी दिली. आता माझ्याऐवजी अन्य कार्यकर्त्यांना संधी द्यावी, असे माझं प्रामाणिक मत आहे. उमेदवारी मागणार नसलो तरी पक्षाचे काम यापुढेही करत राहणार आहे. पण आता मला विधानसभेची उमेदवारी नको, अशी विनंती मी पक्ष नेतृत्वाला केली आहे.
तोचि धन्य जनी पूर्ण समाधानी
करूनी अकर्ते होऊनियां गेले, तेणे पंथे चाले, तोचि धन्य तोचि धन्य जनी पूर्ण समाधानी’ अशी माझी या क्षणी भावना आहे. माझ्यावर मतदारांनी आणि पक्षाच्या कार्यकर्त्यांनी दाखविलेल्या विश्वासाबद्दल मी त्यांचा आभारी आहे. हे प्रेम असेच कायम राहील असा विश्वास आहे. भारतीय जनता पार्टी जो उमेदवार देईल त्यांना विजयी करणे हाच माझा निर्धार असणार आहे.
– आमदार सुधीर गाडगीळ, सांगली