नकोशा कॉल्सवर मोठी कारवाई | २.७५ लाख कमांक ब्लॉक
नवी दिल्ली: नको असलेले कॉल्स आणि नोंदणी नसलेल्या टेलिमार्केटिंग कंपन्यांविरुद्ध मोठ्या कारवाईत २.७५ लाख दूरध्वनी क्रमांक ब्लॉक करण्यात आले आहेत आणि ५० कंपन्यांच्या सेवा बंद करण्यात आल्या आहेत. दूरसंचार नियामक ट्रायने अलीकडेच घेतलेल्या कठोर भूमिकेचा भाग म्हणून ही कारवाई करण्यात आली आहे.
भारतीय दूरसंचार नियामक प्राधिकरणाने दूरसंचार कंपन्यांना नोंदणी नसलेल्या टेलिमार्केटिंग कंपन्यांना काळ्या यादीत टाकण्यास आणि त्यांचे नंबर ब्लॉक करण्यास सांगितले होते. बनावट कॉलमध्ये लक्षणीय वाढ नोंदवली आहे. या वर्षीच्या पहिल्या सहामाहीत नोंदणी नसलेल्या टेलिमार्केटिंग कंपन्यांविरुद्ध ७.९ लाखांहून अधिक तक्रारी दाखल करण्यात आल्या आहेत.
याला आळा घालण्यासाठी १३ ऑगस्ट २०२४ रोजी सर्व प्रवेश पुरवठादारांना कठोर सूचना जारी केल्या होत्या आणि नोंदणी नसलेल्या टेलिमार्केटिंग कंपन्यांवर तत्काळ अंकुश ठेवण्यास सांगितले होते. हे निर्देश लक्षात घेऊन दूरसंचार कंपन्यांनी बनावट कॉलसाठी दूरसंचार संसाधनांच्या गैरवापरावर कठोर कारवाई केली.
असे ट्रायने म्हटले आहे. ट्रायने ५० पेक्षा जास्त कंपन्यांना काळ्या यादीत टाकले आहे आणि २.७५ लाखांहून अधिक एसआयपी डीआयडी, मोबाईल नंबर, दूरसंचार संसाधने ब्लॉक केली आहेत. या पावलामुळे बनावट कॉल्स कमी होतील आणि ग्राहकांना दिलासा मिळेल, अशी अपेक्षा ट्रायने व्यक्त केली आहे.