विधानसभेचा बिगुल वाजणार; मिनी मंत्रालयाचे काय होणार? | नगरपरिषदांवर अडीच वर्षांपासून प्रशासक
नागपूर : विधानसभेच्या निवडणुका दिवाळीनंतर होण्याची शक्यता आहे. पण, महापालिका, नगरपरिषदा व नगरपंचायतींच्या निवडणुका कधी होणार? असा प्रश्न आता उपस्थित केला जात आहे. नागपूर महापालिकेवर प्रशासक आहेत. तसेच जिल्ह्यातील १५ नगरपरिषदांपैकी ११ नगरपरिषदांवर अडीच वर्षांपासून प्रशासक आहे. अशीच परिस्थिती काही नगरपंचायतींची आहे. त्यामुळे मिनी मंत्रालयाच्या निवडणुका घ्या, अशी मागणीही स्थानिक नेते करू लागले असून, आतापासून काहींनी निवडणुकीची तयारी सुरू केली आहे.
राजकारणी वाट पाहून थकले लोकसभा निवडणुका झाल्यानंतर आता विधानसभा निवडणुकांचेही बिगुल वाजले आहे. मात्र, महापालिका, नगरपरिषदांच्या निवडणुका होत नसल्याने लोकप्रतिनिधी म्हणून लढण्यासाठी इच्छुक असलेले मात्र वाट पाहून थकले आहेत.
विधानसभा निवडणूक दिवाळीनंतर अपेक्षित विधानसभा निवडणुकांची रणधुमाळी सुरू झाली आहे. त्यानुसार आता दिवाळीनंतर या निवडणुका होणार आहेत. जिल्ह्यात सर्वच राजकीय पक्षांकडून त्यासाठी जोरदार मोर्चेबांधणी सुरू झाली आहे.