यळगूड (ता. हातकणंगले) येथील टायर पंक्चर दुकानदार गिरीष विश्वनाथ पिल्लई (वय ४७) यांचा खून त्यांचे दुकान हडपण्यासाठीच अजय दिलीप शिंगे याने दोन लाख रुपयांची सुपारी देऊन केला आहे. या प्रकरणी आणखी तिघांना अटक करण्यात आली आहे. अनिकेत ऊर्फ तुषार शामराव कांबळे (वय २४, रा. शाहूनगर), अजय दिलीप शिंगे (२३, रा. अंबिकानगर दोघेही रा. हुपरी) व आर्यन दत्तात्रय घुणके (२२, रा. मानेनगर रेंदाळ) अशी त्यांची नावे आहेत.
या तिघांनाही आज न्यायालयासमोर उभे केले असता रविवार (दि. ८) पर्यंत पोलिस कोठडी सुनावली आहे, अशी माहिती पोलिस उपअधीक्षक समीरसिंह साळवे व पोलिस निरीक्षक एन. आर. चौखंडे यांनी पत्रकार परिषदेत दिली.
ते म्हणाले, टायर पंक्चर दुकानदार गिरीष पिल्लई यांचा करण्यात आल्याचा बनाव संशयित आरोपींकडून करण्यात आला होता. याप्रकरणी नचिकेत कांबळे याला यापूर्वीच अटक करून एका अल्पवयीन मुलालाही ताब्यात घेतले होते. पोलिस कोठडीत असताना त्यांच्याकडे अधिक तपास करीत असताना हा प्रकार पुढे आला.