शासकीय कामात अडथळा,विद्यमान पंचायत समिती सदस्याविरोधात‌ गुन्हा दाखल

0



तासगाव : तासगाव पंचायत समितीचे भाजपचे सदस्य संतोष आठवले यांच्याविरोधात येथील पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल झाला आहे. कवठेएकंद आणि नागाव (कवठे) येथील येथील ग्रामसेवक कार्यालयीन वेळेत ग्रामपंचायतीमध्ये उपस्थित नसतात, असा आरोप करून आठवले यांनी शुक्रवारी पंचायत समितीच्या ग्रामपंचायत विभागास कुलूप ठोकून विस्तार अधिकारी, ग्रामसेवक आणि शिपायाला कोंडून घातले होते. याप्रकरणी शासकीय कामात अडथळा आणल्याचा ठपका ठेवून त्यांच्यावर गुन्हा दाखल करण्यात आला आहे. याबाबतची फिर्याद कक्ष अधिकारी मनोहर कोरडे यांनी दिली आहे.


     




याबाबत माहिती अशी : कवठेएकंद आणि नागाव (कवठे) येथील ग्रामसेवक आपल्या कार्यालयात शासकीय वेळेत हजर नसतात. वैद्यकीय रजेच्या नावाखाली ते इतरत्र फिरत असतात. पंचायत समिती सदस्यांचा ते फोन उचलत नाहीत, अशी तक्रार करून रजेच्या काळात या गावांना पर्यायी ग्रामसेवक द्या, अशी मागणी आठवले यांनी ग्रामपंचायत विभागाकडे केली होती. मात्र या विभागाने आपल्या मागणीकडे दुर्लक्ष केले, असा आरोप करून आठवले यांनी शुक्रवारी तीन विस्तार अधिकारी, एक ग्रामसेवक आणि एक शिपाई अशा पाच जणांना तासभर ग्रामपंचायत विभागात कोंडून घातले होते.


     



याचे पडसाद पंचायत समिती परिसरात उमटले. प्रशासन आठवले यांच्याविरोधात आक्रमक झाले. आठवले यांचा प्रशासनाला नेहमीच त्रास आहे, असा आरोप करून पंचायत समितीच्या अधिकारी आणि कर्मचाऱ्यांनी त्यांच्याविरोधात गुन्हा दाखल करण्याची मागणी केली.

Rate Card


     



मात्र जिल्हा परिषदेचे समाजकल्याण सभापती प्रमोद शेंडगे यांनी मध्यस्थी करून या वादावर पडदा टाकला होता. आठवले यांच्यासह प्रशासनाची समजूत काढली होती. त्यामुळे काल (शुक्रवारी) प्रशासनाने आठवले यांच्याविरुद्ध गुन्हा दाखल न करण्याची भूमिका घेतली होती.


      




मात्र आज प्रशासनाने घुमजाव करीत आठवले यांच्याविरोधात शासकीय कामात अडथळा आणल्याचा गुन्हा दाखल करण्याचे ठरवले. त्यानुसार कक्ष अधिकारी मनोहर कोरडे यांनी आठवले यांच्याविरुद्ध फिर्याद दिली आहे. फिर्यादीनुसार भा. द. वि. 186 आणि 342 नुसार आठवले यांच्याविरोधात गुन्हा दाखल झाला आहे.

Leave A Reply

Your email address will not be published.

कॉपी करू नका.