बिहारच्या सारण जिल्ह्यातील मढौरामध्ये, उलट्या आणि पोटदुखीची तक्रार घेऊन डॉक्टरकडे गेलेल्या एका मुलाला ऑपरेशननंतर आपला जीव गमवावा लागला आहे. हा डॉक्टर फ्रॉड असल्याचा आरोप कुटुंबीयांनी केला आहे. यूट्यूबवर पाहिल्यानंतर डॉक्टरने मुलाच्या पोटाचं ऑपरेशन केलं. ऑपरेशन दरम्यान त्याची प्रकृती चिंताजनक झाली. मुलाच्या मृत्यूनंतर डॉक्टर क्लिनिक बंद करून पळून गेला.
ही धक्कादायक घटना शुक्रवारी रात्री उशिरा मढ़ौरा पोलीस ठाण्याच्या हद्दीतील धर्मबागी मार्केटमध्ये असलेल्या गणपती सेवा सदनमध्ये घडली आहे. गोलू साह (१५ वर्षे) असे या मुलाचे नाव आहे. मुलाच्या मृत्यूनंतर कुटुंबीयांनी स्थानिक पोलिसांना याबाबत माहिती दिली. पोलिसांनी घटनास्थळी पोहोचून क्लिनिकची तपासणी केली. मुलाचा मृतदेह ताब्यात घेतला आणि पोस्टमॉर्टमसाठी छपरा सदर रुग्णालयात पाठवला. गोलू हा त्याच्या आई-वडिलांचा मोठा मुलगा होता. मुलाच्या मृत्यूनंतर संपूर्ण कुटुंबात हळहळ व्यक्त होत आहे. कुटुंबीयांनी सांगितले की, मुलाला आधी पोटासंबंधित त्रास होता.