राज्यातील विधानसभा निवडणुका जवळ आल्याने अजित पवार यांची टीम मतदारांपर्यंत पोहोचण्यासाठी सर्वतोपरी प्रयत्न करत आहे. उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी काल ‘दादाचा वादा – दादाचा वादा’ या पक्षाच्या नव्या प्रचार गीताचे अनावरण केले. २ मिनिट ४३ सेकंदाच्या या गाण्यात अजित पवार हे एक खंबीर नेते म्हणून दाखवण्यात आले आहेत, जे आपली आश्वासनं पूर्ण करण्याला महत्व देतात आणि आपल्या शब्दावर ठाम राहतात.
त्यांची व्यक्तिरेखा, स्वभाव आणि कामाच्या शैलीचं या गाण्यात वर्णन केलं आहे. गाण्याचे स्वर आणि बोल तरुण मतदारांना चांगलेच आवडलेले दिसत आहेत. महिला, शेतकरी, आदिवासी, युवक व इतर गटांसाठी राबविण्यात येणाऱ्या कल्याणकारी योजनांचीही माहिती यातून देण्यात आली आहे.
या व्हिडिओला लॉन्च झाल्यापासून एका दिवसात १ कोटींहून अधिक व्ह्यूज मिळाले आहेत. अजित पवारांच्या फेसबुक पेजवर २८ लाखांहून अधिक लोकांनी हा व्हिडिओ पाहिला, इन्स्टाग्राम अकाऊंटवर ४४ लाखांहून अधिक व्ह्यूज मिळाले आहेत. अजित पवारांच्या यूट्यूब चॅनलवर व्हिडिओला २४ लाखांहून अधिक व्ह्यूज मिळाले, ट्विटर अकाउंटवर हा व्हिडिओ २९ हजारांहून अधिक लोकांनी पाहिला आहे. पक्षाच्या अधिकृत फेसबुक पेजवर व्हिडिओला ८ लाखांपेक्षा जास्त, इंस्टाग्रामवर ११ लाख आणि यूट्यूबवर २ लाख व्ह्यूज मिळाले आहेत.