सांगली : जिल्ह्याच्या ग्रामीण भागात पावसाने जोरदार हजेरी लावली असताना जलस्रोत दूषित होण्याचे प्रमाण वाढते आहे. जिल्ह्याच्या एक हजार १०२ ठिकाणचे पाण्याचे नमुने तपासले असता यातील केवळ सहा जलस्रोतांमध्ये दूषित पाणी आढळले. या ग्रामपंचायतींना पाणी शुद्धीकरणाबाबत जिल्हा परिषदेकडून नोटिसा दिल्या आहेत.
ग्रामीण भागातील जनतेला पुरवठा होणाऱ्या पाण्याचे नमुने दर महिन्यात जलसुरक्षकांमार्फत तपासले जातात. हे जलसुरक्षक नियमितपणे पाण्याचे नमुने घेऊन प्रत्येक तालुक्याला असणाऱ्या भूजल सर्वेक्षण विभागाच्या प्रयोगशाळेसह पब्लिक हेल्थ लॅबकडे तपासणीसाठी जमा करतात. त्यानंतर येणाऱ्या तपासणी अहवालाची माहिती जिल्हा परिषद आरोग्य विभागाला सादर करण्यात येते.
ग्रामीण भागात पिण्याचे पाणी, त्या पाण्याचा स्रोत दूषित होऊ नये, यासाठी प्रयत्न करण्यात येतात. पाणी शुद्धीकरणासाठी नियमित ब्लिचिंग पावडचा वापर केला जातो. पाण्यात २० टक्क्यांपेक्षा कमी क्लोरिन असल्यास ते पिण्यास योग्य नाही, असे कळविण्यात येते. विशेषतः पावसाळ्यात नवीन पाणी आल्याने पाणी दूषित होते. पावसाळ्यात बऱ्याचशा गावांचे पाणी दूषित होते.
या सहा गावांतील पाणी दूषित
ऑगस्ट महिन्यात घेतलेल्या एक हजार १०२ पाणी नमुन्यांपैकी जत तालुक्यातील सिंगणहळ्ळी, भिवर्गी, उमराणी, काराजनगी, रामपूर आणि मिरज तालुक्यातील बेडग या सहा गावांमधील पाणी नमुने दूषित आढळले आहेत.