जत : आमदार विक्रमसिंह सावंत यांच्या अथक प्रयत्नांतून जत तालुक्यातील विकासाच्या कामांना गती मिळाली आहे. त्यांनी तालुक्याच्या विकासासाठी तब्बल २ कोटी ७८ लाख रुपयांचा निधी मंजूर करून आणला असून. मागील दोन दिवसांत मतदारसंघातील मुचंडी,देवनाळ,मेंढीगिरी,उमराणी,बिळूर,खिलारवाडी,वज्रवाड,येळदरी,सोरडी,कोळगिरी,व्ह्स्पेठ,माडग्याळ,सोन्याळ,उटगी,निगडी बु आदी गावांमधील विविध विकासकामांचे उद्घाटन आणि भूमिपूजन आ. सावंत यांच्या हस्ते करण्यात आले.
यामध्ये प्रादेशिक पर्यटन योजना, जिल्हा नियोजन समिती आणि स्थानिक विकास निधीच्या अंतर्गत मंदीर परिसरातील सभामंडप आणि भौतिक सुविधा, दर्गा आणि स्मारकांचे सुशोभीकरण तसेच रस्त्यांचे डांबरीकरण यासारख्या महत्त्वाच्या प्रकल्पांचे काम हाती घेण्यात आले आहे. यावेळी आमदार सावंत यांनी स्थानिक रहिवाशांच्या समस्यांचीही माहिती घेतली आणि त्यावर लवकरच तोडगा काढण्याचे आश्वासन दिले.
आमदार सावंत म्हणाले की मागील ३५ वर्षांत जितका निधी मिळाला नव्हता त्याच्या दुप्पट निधी आपण या पाच वर्षांत मिळवून दिला आहे. विरोधकांना टीका करायची असेल तर त्यांनी करावी पण आम्ही आपल्या कामातूनच उत्तर देऊ.असा टोला त्यांनी विरोधकांना लगावला.
यावेळी गावकऱ्यांनी आ. सावंत यांचे जोरदार स्वागत केले. पुष्पगुच्छ आणि हारांनी त्यांचा सत्कार करण्यात आला. हे स्वागत म्हणजे आपल्या कामाची पोचपावती आहे. अशी भावना त्यांनी व्यक्त केली. ते म्हणाले की आगामी काळात जत सारख्या दुष्काळी तालुक्याला नंदनवन बनवण्याचे आपले स्वप्न आहे असे आ.विक्रमसिंह सावंत म्हणाले.
यामुळे तालुक्यात विकासाच्या नव्या पर्वाची सुरुवात झाल्याची भावना नागरिकांमध्ये दिसून आली.