सांगली : ऑप्थॅमॅलॉजिस्ट सोशल असोसिएशन ऑफ सांगली यांच्याकडील जिल्हाधिकारी कार्यालयास प्राप्त निवेदनामध्ये डॉल्बी व लेझर लाईटमुळे मानवी शरीरावर (कान, डोळे, हृदय इत्यादी) गंभीर दुष्परिणाम होत असल्यामुळे त्यावर निर्बंध घालण्याबाबत मागणी केली आहे.
प्लाझमा, बीम लाईट, लेझर बीम लाईटच्या प्रखर प्रकाशामुळे मिरवणुकीमध्ये सहभागी झालेले व मिरवणूक पाहण्यास आलेली लहान मुले, वयोवृध्द, ज्येष्ठ नागरिक, सामान्य नागरिक यांच्या डोळ्यास इजा होवून त्यांच्या आरोग्यास धोका निर्माण होण्याची शक्यता आहे. या अनुषंगाने जिल्हादंडाधिकारी डॉ. राजा दयानिधी यांनी भारतीय नागरीक संरक्षण संहिता 2023 चे कलम 163(1) अन्वये प्राप्त झालेल्या अधिकारानुसार सांगली जिल्हा स्थलसिमा हद्दीत दिनांक 14 सप्टेंबर 2024 रोजी सकाळी 7 वाजल्यापासून ते दि. 18 सप्टेंबर 2024 रोजीचे 12 वाजेपर्यंत सांगली जिल्ह्यातील सर्व प्रकारच्या मिरवणुकामध्ये व्यक्ती, समुदाय, मंडळ यांच्यामार्फत प्लाझमा, बीम लाईट, लेझर बीम लाईटच्या वापरास प्रतिबंध केला असून या बाबीस बंदी घालण्यात आली असल्याचे आदेश जारी केले आहेत.
या आदेशाचे उल्लंघन करणाऱ्या व्यक्ती, समुदाय, मंडळ यांच्यावर पोलीस विभागाने आवश्यक ती कायदेशीर कारवाई करावी, असे आदेश जिल्हादंडाधिकारी डॉ. राजा दयानिधी यांनी जारी केले आहेत.